Sunday, May 19, 2024
Homeसाप्ताहिककोलाजखेळता नेटके दशावतारी

खेळता नेटके दशावतारी

वर्षातील ठरावीक दिवशी किंवा काळाने सिंधुदुर्गामध्ये धार्मिक उत्सव साजरे होत असतात. देवतेचे पूजन, दर्शन, पालखी, मिरवणूक यांबरोबरच भजन, कीर्तन, प्रवचन यांचे क्रम ठरलेले असतात. किंबहुना, हे धार्मिक प्रबोधन करणारी मंडळी पिढ्यान् पिढ्या गावांतील देवस्थानांमधून वार्षिक हजेरी लावत असतात. ग्रामदैवतांच्या नावाने होणाऱ्या यात्रांचा प्रमुख हेतू हा धार्मिक असला तरीही त्याला सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक असेही पैलू अप्रत्यक्षरीत्या जोडलेले असतात. यात्रांच्या निमित्ताने भरणाऱ्या बाजारात ग्रामीण पातळीवर उत्पादित होणाऱ्या वस्तूंची खरेदी-विक्री होते, स्थानिक कारागिरांकरिता त्या उत्पन्नाचा स्त्रोत ठरतात. गावोगावच्या जत्रा, वार्षिकोत्सव विविध कलांची, त्यात सहभागी कलावंतांची लोकरंगभूमी असते. देवतेसमोर, मंदिराच्या प्रांगणात सादर होणाऱ्या विविध कला म्हणजे एकप्रकारे देवतासंतुष्टीकरण असल्याचे म्हटले जाते. यापैकीच एक कला म्हणजे दशावतार. सिंधुदुर्ग आणि दशावतार हे अनन्यसाधारण असे समीकरण आहे. देवगड, वेंगुर्ला, मालवण, कुडाळ, सावंतवाडी तालुक्यांमध्ये दशावतार सादर केले जातात.

कार्तिक शुद्ध द्वादशी ते महाशिवरात्र याच काळामध्ये दशावतार कला सादर करण्याची परंपरा आहे. तळकोकणामधून गावोगावच्या विविध दशावतारी मंडळींचे पूर्वापार चालत आलेले पेटारे जत्रांसाठी बाहेर पडतात. श्यामजी नाईक – काळे आणि गोडबोले या कीर्तनकारांनी कर्नाटकातील “यक्षगान” या लोककलेवरून १७२८ साली सिंधुदुर्गामध्ये दशावतार खेळ आणले, असे म्हटले जाते. मात्र दशावतार या लोककलेवर मूलभूत संशोधन करणाऱ्या डॉ. तुलसी बेहेरे यांच्या मते दशावतार लोकनाट्य त्याहीपूर्वी सिंधुदुर्गामध्ये अस्तित्वात होते. चिं. कृ. दीक्षित यांच्या “आडिवऱ्याची महाकाली” या पुस्तकात रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील आडिवरे गाव हे दशावतारी खेळाची मूळ भूमी असल्याचा संदर्भ येतो. त्याहीपूर्वी समर्थ रामदास स्वामी लिखित दासबोध ग्रंथाच्या सहाव्या अध्यायामध्ये “खेळता नेटके दशावतारी, तेथे येती सुंदर नारी, नेत्र मोडिती कळाकुसरी, परी अवघे धटिंगण” असा संदर्भ येतो. दशावतारी खेळ सोळाव्या शतकात अस्तित्वात होते, याचा हा वाङ्मयीन संदर्भ मौलिक समजला जातो.

मुकुंदराज, ज्ञानेश्वरांच्या काळापासून नट – नटणे, दशावताराची सोंगे आणणे, संपादणी करणे या प्रकारचे प्राचीन वाङ्मयातील उल्लेख दशावताराची प्राचीनता सांगतात, असे मत डॉ. भालचंद्र आकलेकर नोंदवतात. या लोककलेच्या प्राचीन पुराव्याव्यतिरिक्त दशावतार खेळाच्या निर्मिती आणि सादरीकरणामागील मूळ हेतूचे रहस्य अद्याप अनुत्तरित आहे. विष्णूच्या दशावतारांचे रंगावतरण या खेळांमधून होत असले तरीदेखील प्राचीन किंवा मूळ खेळामधील युद्धस्वरूप आज प्रचलित दशावतारातून पाहायला मिळत नाही, असे अभ्यासपूर्ण निरीक्षण डॉ. आकलेकर यांनी नोंदवलेले आहे.

देवळी, लिंगायत, गुरव आणि सुतार समाजातील कलावंत ही कला सादर करीत असत. कालौघात अन्य समाजातील कलावंतदेखील यात सहभागी होऊ लागलेले दिसतात. दशावतार खेळ तत्कालीन वैष्णव संप्रदायाने सांगितलेला भक्तिमार्ग, विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्याचे रंजनपर माध्यम म्हणून सादर होत असावेत. ‘निरुक्त’ या वैदिक शब्दांच्या व्युत्पत्ती कोशामध्ये यास्काचार्यांनी व्याप्तीच्या अंगाने ‘विष्’ या शब्दापासून ‘विष्णू’ शब्दाची व्युत्पत्ती सांगितलेली आहे. ‘विश किंवा विष्’ शब्दाचा अर्थ ‘प्रवेश करणे,’ असा अर्थ आदी शंकराचार्यांनी ‘व्यापक’ अशा अर्थी वर्णिलेला आहे, तर सायणाचाऱ्यांनी ऋग्वेदातील विष्णुसुक्ताच्या व्याख्येमध्ये ‘विष्णू’ या शब्दाचा अर्थ ‘सर्वव्यापी’ सांगितलेला आहे. त्याचे हे ‘सर्वव्यापकत्व’ दहा अवतारांतून स्पष्ट होते. विष्णूला जगाचा नियंता, पालनकर्ता म्हटले जाते. त्याही अंगाने पाहिले असता उत्पत्ती ते लय यामधील सर्व काळांवर, लोकां (त्रिलोक) वर त्याचेच प्रभुत्व असल्याचे अधोरेखित होते.

ऋग्वेदामध्ये विष्णूला ‘बृहच्छशरीर’ अर्थात ‘विशाल देहधारी’ असं म्हटलेलं आहे. कुरुक्षेत्रावर अर्जुनाला गीता सांगताना कृष्णाने घडवलेलं विराट रूपदर्शन असो किंवा बाळकृष्णाने मुख उघडून यशोदेला घडवलेलं विश्वदर्शन असो किंवा वामनावतारामध्ये तीन पावलांमध्ये तिन्ही लोकांना व्यापून टाकणे असो, या सर्व कृती व्यापकत्व किंवा सर्वव्यापी या अर्थाच्या विविध छटाच आहेत. त्यामुळे स्वाभाविकच कलांवर वैष्णव संप्रदायाचा प्रभाव अधिक गडद असल्याचे सांगता येईल.

सिंधुदुर्गातल्या जत्रांमधून रंगणारी कीर्तन प्रवचने समाजाच्या आत्मीक आणि नैतिक अंगाची जोपासना करणारी तर कलेच्या माध्यमातून लोकरंजन करणारे खेळे, संगीतादी कला या संस्कृतीच्या संरचनेतल्या आधारभूत अशा संस्था होत्या आणि आहेतही. यांचा उपयोग सामाजिक समतोल राखण्यासाठी जसा झाला तसाच तो धर्मप्रचार आणि प्रसारासाठी, अप्रत्यक्षपणे मूल्यशिक्षणाच्या दृष्टीनेही झाला. शिवाय सिंधुदुर्गामध्ये ‘सीमा बांधणे’ असं जे म्हटलं जातं त्याचा एक अर्थ ‘मर्यादा घालून देणे’ असाही होतो. त्या मर्यादा एकूणच मानवी आचार-विचार-व्यवहार, नीती नियम इ. सगळ्यासाठी अपेक्षित होत्या. त्याकरिता ईश्वरी अवतार कथांच्या सादरीकरणातून, भजन कीर्तनादी कार्यक्रमांतून, रूढी विधानांतून ईश्वरी सत्तेचा धाक दाखवणे सामाजिक संतुलनाच्या दृष्टीने आवश्यक होते. या सर्व पार्श्वभूमीवर दशावतार हा निव्वळ कलाविष्कार राहत नाही, तर लोकप्रबोधनाचंही, लोकजागराचं माध्यम ठरतो.

देवदेवतांच्या उत्सवाप्रसंगी विशिष्ट तिथीला हे खेळ सुरू होतात. रात्रभर रंगणाऱ्या या खेळातील कलावंत खेळ सुरू होण्यापूर्वी पेटाऱ्याची पूजा करतात. दशावतारी खेळाचे साहित्य, विविध मुखवटे, वेशभूषा असा सारा रंगभूमीवरील श्रीमंती ऐवज सांभाळणारा हा पेटारा पूर्वी बांबूपासून तयार केला जाई. या सगळ्यांची पूजा म्हणजे प्रत्यक्ष रंगदेवतेची पूजा असते. भरताच्या नाट्यशास्त्रानुसार पूर्वरंग आणि उत्तररंग अशा दोन भागांत सादर होणाऱ्या या खेळाची सुरुवात गणेशाच्या, शंकराच्या स्तुतीने होते. पूर्वरंगामध्ये रिद्धी सिद्धी, भटजी, संकासूर, सरस्वती, ब्रह्मा, विष्णू यांचे प्रवेश तर उत्तररंगामध्ये रामायण – महाभारतातील कथा साकारल्या जातात. दशावतारी खेळाच्या लिखित संहिता फारशा अस्तित्वात नाहीत. त्यामुळे मौखिक परंपरेने चालत आलेल्या या खेळातील कलावंतांनी रंगभूषेला सुरुवात करण्यापूर्वी कोणते कथानक अभिनित करायचे आहे, याची आयत्यावेळी कल्पना दिली जाते आणि त्यानुसार खेळातील प्रत्येक पात्र, व्यक्तिरेखा स्वतःचे संवाद स्वतः तयार करतात. ‘खेळिया’ असे एक विशेषण कलावंतांना दिले जाते. लौकिक जगातील व्यक्ती आणि लोकरंगभूमीवर त्याच व्यक्तीने साकारलेली व्यक्तिरेखा – पात्र या परस्पर भिन्न व्यक्ती आहेत.

दरवेळेस विविध पात्रांच्या माध्यमातून कलावंत प्रेक्षकांना, रसिकांना आपल्या कलेद्वारे खेळवत असतो. काही काळासाठी तो प्रत्यक्षातील ताणांपासून त्यांना मुक्त करत (विरेचन) कलेच्या माध्यमातून एकाच वेळेस आनंद आणि संदेश दोन्ही देत असतो. भरताच्या नाट्यशास्त्रात रसनिष्पत्ती विभाव, अनुभाव, व्यभिचारी तसंच स्थायी भाव यांच्या संयोगातून होते, असं सांगितलेलं आहे. दशावतार लोककलेचा आविष्कार मानवी भाव भावनांच्या विभ्रमांचे नेटके रंग रसिकांना दाखवतो.

-अनुराधा परब

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Previous article
Next article
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -