Saturday, May 18, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सFake documents : बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने पॅथॉलॉजी लॅब

Fake documents : बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने पॅथॉलॉजी लॅब

  • गोलमाल : महेश पांचाळ

कुठल्याही मोठ्या आजाराचे निदान करायचे असल्यास पॅथॉलॉजी लॅबमधून विविध चाचण्या करण्याचा सल्ला डॉक्टराकडून दिला जातो. आपणही डोळे बंद करून संबंधित लॅबकडे जाऊन चाचण्या करून घेतो; परंतु ही पॅथॉलॉजी लॅब पात्रताधारक तंत्रज्ञांकडून चालवली जाते की नाही, याचा विचार कोणी करत नाही. मात्र, आता हा विचार करण्याची आता वेळ आली आहे. पॅथॉलॉजी लॅब सुरू करणासाठी बनावट कागदपत्रे तयार करून देणाऱ्या राज्यस्तरीय टोळीचा नुकताच पर्दाफाश पॅरामेडिकल कॉन्सिल आणि मुक्त विद्यापीठाने केला आहे.

सन २०२०-२१ मध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात शिक्षण घेत यवतमाळ, ठाणे, जळगाव, अहमदनगर, मनमाड अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या २० विद्यार्थ्यांनी पॅथॉलॉजी लॅब सुरू करण्यासाठी आवश्यक असणारे बीएससी एमएलटी आणि डीएमएलटी या पदव्यांचे मुक्त विद्यापिठाच्या नावाचे बनावट मार्कशीट, सर्टिफिकेट तयार केले. लॅब सुरू करण्याची मान्यता घेण्यासाठी पॅरामेडिकल कॉउन्सिलकडे अर्ज केला होता. संबंधित कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी काऊन्सिलने मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे विचारणा केली, त्यावेळी असे विद्यार्थी मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेत नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले.

संबंधित विद्यार्थ्यांची नोंदणी नसल्याचे विद्यापीठाने ई-मेलद्वारे स्पष्ट केले. पॅरामेडिकल कौन्सिलने ९ मे २०२२ रोजी विद्यापीठाला तक्रार दाखल करण्यास सांगितले. तत्कालीन कुलगुरू प्रशांत पाटील यांनी चौकशी समिती नेमली. या चौकशी समितीने ३० डिसेंबर २०२२ रोजी दिलेल्या अहवालानुसार हे विद्यार्थी विद्यापीठात नोंदणीकृत नसल्याचे आढळून आले. तसेच कायमस्वरूपी नोंदणी क्रमांक, गुणपत्रिका, पदवी प्रमाणपत्र, लेटरहेडही बनावट असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या कागदपत्रांवर तत्कालीन उपप्राचार्य जयवंत खडतळे यांच्या सह्या आहेत; परंतु ते २९ जानेवारी २०२१ रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. तसेच चौकशी समितीने दिलेल्या निवेदनानुसार त्या स्वाक्षऱ्या त्यांच्या नाहीत, ही बाब पुढे आली. बोगस पदव्या मिळालेल्या २० विद्यार्थ्यांना मुक्त विद्यापीठाचे वकील अॅड. लाड यांनी मे आणि जून २०२३ मध्ये कायदेशीर नोटीस बजावली, तेव्हा त्यापैकी १३ जणांनी ही कागदपत्रे तयार करणाऱ्यांची नावे उघड केली. एकाने दिलेल्या उत्तरात संशयिताचे नाव नाही. उर्वरित सहा जणांनी नोटीसला उत्तर दिलेले नाही, असे विद्यापीठाकडून कळविण्यात आले. विद्यापीठाने त्रिसदस्यीय चौकशी समिती स्थापन केली. या चौकशीत विद्यापीठचे बनावट सही, शिक्के याच्या माध्यमातून बनावट गुणपत्रक, प्रमाणपत्रक तयार केल्याची बाबही उघडकीस आली. ही बनावट कागदपत्रे कोणाकडून घेतली याबाबतीत चौकशी सुरू केली असता साधारण १४ जणांची नावे चौकशीत समोर आली आहेत. त्यापैकी नागपूरचा गौरव शिरसकर, सातारचा रमेश होनामोरे, अहमदनगरचा अशोक सोनवणे आणि नांदगावचा संजय नायर यांचा समावेश असून या चौघांविरोधात नाशिक तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितांच्या तपासासाठी नाशिक पोलिसांचे स्वतंत्र पथक तयार करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे ज्या २० विद्यार्थ्यांच्या नावे बनावट कागदपत्र तयार करण्यात आले आणि ज्या चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांचा आणि विद्यापीठाचा आजवर कधीच संबंध आला नसल्याचा विद्यापीठाचा दावा केला आहे. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांच्या नावाचे सही, शिक्के संशयित एजंटपर्यंत कसे पोहोचले, हासुद्धा निर्माण झाला आहे. पॅरामेडिकल आणि मुक्त विद्यापीठाच्या सतर्कतेमुळे एक गुन्हा उघडकीस आला आहे. विद्यापीठातील कोणी या कारस्थानात गुंतले आहे का?, असा संशयही व्यक्त केला जात असून त्या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे.

आता प्रमाणपत्र तयार करताना विशेष खबरदारी घेतली असून क्यूआर कोड, बार कोडसह १५ वेगवेगळे सुरक्षेचे मापदंड नवीन प्रमाणपत्रांना देण्यात आले आहेत. त्यामुळे खोटे दाखले प्रमाणपत्र तत्काळ उघडकीस येण्यास मदत होईल. मात्र इतरही विद्यापीठातून अशा स्वरूपाचे बनावट कागदपत्र तयार करण्यात आले असतील, तर त्याचा तपास व्हावा या उद्देशाने गुन्हा दाखल करण्यात आल्याने तपासात काय निष्पन्न होते, याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे.

maheshom108@gmail. com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -