Saturday, May 18, 2024
Homeमहत्वाची बातमीप्रवाशांना ‘बाप्पा’ पावला, रेल्वेतच मिळणार तिकीट

प्रवाशांना ‘बाप्पा’ पावला, रेल्वेतच मिळणार तिकीट

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कागदाचा वापर कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पुढाकार घेतला असून तिकीट पर्यवेक्षकांना अत्याधुनिक ‘एचएचटी’ मशीन्स (हॅन्ड हेल्ड टर्मिनल) देण्यात येत आहे. त्यामुळे आता चार्ट तयार झाल्यानंतरही प्रवाशांना आरक्षित तिकीट मिळणार आहेत. सध्या मध्य रेल्वेच्या १२ मेल-एक्स्प्रेसमध्ये ही सुविधा सुरू झाली असून उर्वरित ११२ गाड्यांमध्येही लवकरच ही सोय उपलब्ध केली जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला आहे.

मुंबई विभागाने कागदाचा वापर कमी करत डिजिटल उपकरणांच्या वापरावर भर दिला आहे. त्यानुसार विभागाने रेल्वे बोर्डाकडे ‘एचएचटी’ मशीनची मागणी केली होती. त्यानुसार मुंबई विभागाला २१९ मशीन्स उपलब्ध झाले आहेत. सध्या मध्य रेल्वेच्या एलटीटी-मडगाव डबलडेकर, एलटीटी-एर्नाकुलम दुरांतो एक्स्प्रेस, एलटीटी-प्रयागराज दुरांतो एक्स्प्रेस, पंचवटी एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन आणि सीएसएमटी-हजरत निजामुद्दिन एक्स्प्रेसमध्ये एचएचटी सुविधा सुरू करण्यात आली. अनेक प्रवाशांनी त्याचा फायदाही घेतला. त्यामुळे मध्य रेल्वेच्या इतर गाड्यांमध्येही ‘एचएचटी’ मशीन वापरण्याची तयारी सुरू असून ११२ गाड्यांमध्ये वापर करण्यासंदर्भात प्रस्ताव रेल्वे मुख्यालयाकडे पाठवण्यात आला आहे.

कागदाची बचत करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून रेल्वेकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. २०१२ मध्ये रेल्वेने तिकीट आरक्षित केल्यानंतर मोबाईलवर आलेला एसएमएस हा अधिकृत तिकीट म्हणून घोषणा केली होती. तसेच हा एसएमएस डिलिट झाल्यास ओळखपत्र दाखवून ५० रुपयांच्या दंडासह प्रवास करता येत होता. त्यांनतर २०१८ मध्ये रेल्वेने लांब पल्ल्यांच्या रेल्वेला रिझर्व्हेशन चार्ट चिकटवणे बंद केले. त्यापाठोपाठ आता अत्याधुनिक ‘एचएचटी’ यंत्रणा आल्याने कागदाचा वापर आणखी कमी होणार आहे.

लांबपल्ल्याची रेल्वे सुटण्याच्या १५ मिनिटांपूर्वी या मशीनमध्ये रिझर्व्हेशन चार्ट डाऊनलोड करावा लागेल. हे मशीन रेल्वे आरक्षण केंद्राच्या क्रिस सर्व्हरशी जोडलेले असणार आहे. त्यामुळे त्यातील सर्व अपडेट रेल्वे विभागाकडे पोहोचणार आहे. प्रतीक्षा यादी किंवा आरएसी निश्चित झाल्यानंतर कोणत्या प्रवाशाला रिकामी सीट देण्यात आली, त्याची सर्व माहिती या मशीनमध्ये आणि क्रिस सर्व्हरकडे असेल. तसेच नियमानुसार तिकीट पर्यवेक्षक मर्जीतील प्रवाशांला सीट देऊ शकत नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -