Sunday, May 19, 2024
Homeब्रेकिंग न्यूजAjit Pawar : भाषणे देऊन पक्ष वाढत नाही आणि नेत्यांचे कान भरून...

Ajit Pawar : भाषणे देऊन पक्ष वाढत नाही आणि नेत्यांचे कान भरून पद मिळत नाही

अजित पवारांचे कार्यकर्त्यांना चिमटे, सल्ला आणि टोले

कर्जत : रोखठोक विधानांनी कायम चर्चेत राहणारे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कर्जत येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) चिंतन शिबिरावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना लाखमोलाचा सल्ला दिला. यावेळी त्यांनी नवतरुण कार्यकर्त्यांना कानपिचक्या देत संघटनावाढीसाठी खोचक टोलेही लगावले.

राष्ट्रवादी युवतीमध्ये समन्वय साधण्याची गरज आहे. वाद नाहीत तर मतभेद आहेत. एकत्र घेऊन बसण्याची गरज आहे. आदिती तू पुढाकार घेऊन युवतींना एकसंघ ठेवण्याचे काम कर. महिला म्हणून तू कॅबिनेटमध्ये प्रतिनिधित्व करतेय. निधी कमी पडत असेल तर मला सांग, असे म्हणत दादांनी महिला कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले.

राष्ट्रवादीमुळे जी पदे मिळाली आहेत त्याचा वापर सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी करावा. युवक आणि विद्यार्थी संघटनेला सांगायचे आहे की, एका महिन्यात पदाधिकारी नियुक्त करा. डिसेंबरच्या अखेरपर्यंत जिल्हा, तालुका, सर्व सेलचे पदाधिकारी नेमले पाहिजेत. तसे नाही झाले तर ३१ तारखेनंतर नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी लागेल, असा सज्जड दमही अजित पवार यांनी दिला.

तसेच जे खरोखरच काम करतायेत अशांना पद द्या, जे काम करणार नाहीत त्यांना काढण्याची नामुष्की माझ्यावर येऊ देऊ नका. बेंबीच्या देठापासून ओरडणारे, नुसती घोषणा देऊ नका. बुथवरची कामे करा. आपला वॉर्ड, गाव आपल्यासोबत असले पाहिजे तर आपल्याला समाज मानतो. काही गोष्टी नाही पटल्या तरी त्या पटवून घ्यावा लागतात, अंगवळणी पाडाव्या लागतात, असे त्यांनी यावेळी सांगितले.

पहिल्या फळीतील नेत्यांचे कान टोचताना त्यांनी सांगितले की, वेळ कमी असल्याने जास्तीचे काम माझ्यासकट सर्वांना करावे लागणार आहे. आपल्या परिचयातील गणेशोत्सव मंडळे, शिक्षक, फेरीवाले, पत्रकार, माथाडी संघटना, विविध जातीच्या संघटना, कामगार संघटना अशा समाजातील सर्व घटकांशी आपला संबंध आला पाहिजे. सोशल मीडियाचा पुरेपूर फायदा करुन घेतला पाहिजे. संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी बैठक घेऊन संघटना वाढीसाठी प्रयत्न करा. मुंबईतील कार्यालयात फ्रंटलचे अध्यक्ष दिसतात. राज्यात फिरताना दिसत नाही. तिथे कार्यालयात काय काम आहे? संघटनेच्या लोकांनी आठवड्यातून एखाद दिवस आले कार्यालयात तर चालेल. पण एरवी राज्यात फिरा. विविध सामाजिक संस्थांना आपल्या पक्षाशी जोडण्याचे काम करा.

केवळ भाषणे देऊन पक्ष वाढत नाही. पक्ष आपला विचार करतोय हे सर्व घटकांना वाटले पाहिजे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष नियमित कार्यालयात उपस्थित असले पाहिजे. पदाधिकाऱ्यांनी लोकांमध्ये मिसळले पाहिजे. पक्षाच्या प्रदेश कार्यालयात बसून नेत्यांचे कान भरणाऱ्या महाभागांना बऱ्याचदा नेते बळी पडतात. दरबारी प्रवृत्तीच्या महाभागांनी त्यांना दिलेले काम करावे. कार्यकर्त्यांमुळेच पक्ष चालतो ही बाब पदाधिकाऱ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. पदाधिकाऱ्यांना जी जबाबदारी दिलीय, जे क्षेत्र, विभाग दिलाय तिथेच काम करावे, सर्वच ठिकाणी लक्ष देण्याची गरज नाही. साध्या भाषेत सांगायचे झाले तर नाक खुपसण्याचे काम करू नका. ज्याला संधी दिलीय त्याला काम करू द्या, असा इशारे वजा दम अजित पवार यांनी पदाधिका-यांना दिला.

तसेच फ्रंटल अध्यक्ष हे ज्या समाजाचे आहेत त्याच समाजातील नावे महत्त्वाच्या पदांसाठी ते सूचवत असल्याचे लक्षात आले आहे. कृपा करून तसे करू नका. शाहू, फुले, आंबेडकर, सर्वधर्म समभाव, वेगवेगळ्या घटकांना प्रतिनिधित्व देण्याचे काम राष्ट्रवादीने केले. जबाबदार पदाधिकाऱ्यांनी सर्वसमावेशक असले पाहिजे. पक्षांतर्गत जातीचे लॉबिंग अजिबात खपवून घेतले जाणार नाही. गाव तिथे राष्ट्रवादी, घर तिथे झेंडा यासाठी काम केले पाहिजे. प्रभाग तिथे राष्ट्रवादी, चौक तिथे झेंडा ही आपली जबाबदारी आहे. आपला मूळ पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आहे. मला अध्यक्षपदाची जबाबदारी दिलीय ती मी सांभाळतोय. निवडणूक आयोग, कोर्टकचेरी सुरू राहील तिथे कुणी लक्ष द्यायची गरज नाही. तुम्ही तुमचे काम करा, असे तो म्हणाले.

मला छक्केपंजे करता येत नाही. मी फार स्पष्टवक्ता आहे मला कुणालाही नाउमेद करायचे नाही. जे असेल दूध का दूध, पानी का पानी. आमचेही चुकले आहे. काम करणारा माणूस चुकतो, काम केलेच नाही तर चुकत नाही. आम्ही १०० कामे केली तर त्यात काही चुकीचे होईल. चुकीचे काम लक्षात आल्यानंतर तिथे दुरुस्ती करावी लागते. त्यात स्वत:चा काही कमीपणा नाही. रोज नवीन शिकण्याचा प्रयत्न करा, असा सल्लाही त्यांनी दिला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -