Saturday, May 4, 2024
Homeसाप्ताहिककिलबिलपरोपकारी विठू

परोपकारी विठू

  • कथा : प्रा. देवबा पाटील

हिंमतपूर गावामध्ये अतिशय गरीब असा विठू नावाचा एक मुलगा होता. घरची परिस्थिती गरिबीची असल्याने विठूला लहानपणापासूनच छोटी-मोठी कामे करावी लागत. आपल्या शिक्षणाकरिता तो दररोज सकाळी आपल्या गावच्या आजूबाजूच्या रानशिवारात जायचा. रानातील कवठं, बेल, चिंचा, चारोळी, जांभळं, बेहडा, बिब्याची फुले, गोडंबी, बोरं, पेरू, करवंदं, सीताफळं असा ऋतूनुसार असलेला रानमेवा, रानफळे गोळा करायचा व ती जवळच्याच नांदगाव शहरात विकून त्यातून आलेल्या पैशांवर शाळेचा खर्च भागवित असायचा.

रानफळे विकून आलेल्या पैशांतून त्याने प्रथम नवीन हारा विकत आणला. नंतर शाळेची फी भरली. हळूहळू त्याची वह्या-पुस्तकांची सोय होऊ लागली. त्याने दप्तरही विकत आणले, पण शाळेच्या गणवेषाची समस्या अजून काही सुटली नव्हती.

त्यासाठी त्याला दररोज शाळेत शिक्षा सहन करावी लागे. एकदा असाच हिवाळ्याच्या दिवसात सकाळी विठू रानातून बोरं घेऊन त्या रस्त्याने परत येत असताना त्याला एका झोपडीतून एका बाईचा कण्हण्याचा आवाज आला. त्याने कण्हण्याचा कानोसा घेतल्यानंतर झोपडीत कोणीतरी बाई आजारी असावी, असा कयास त्याने आपल्या मनाशी बांधला. तो तसाच आपला डोक्यावर असलेला बोरांचा हारा घेऊन त्या झोपडीत गेला. तेथे एक म्हातारी एका फाटक्या गोधडीवर पडलेली होती व जोरजोराने कण्हत उसासे सोडत होती.

आपल्या मनाशी काहीतरी विचार करीत विठूने आपला बोरांचा हारा डोक्यावर घेतला व झोपडीतून बाहेर पडला. तो तेथून सरळ शहरात न जाता प्रथम आपल्या घरी आला. त्याने फुले विकून जमा केलेले आपले बचतीचे पैसे आपल्या खिशात टाकले व पुन्हा हारा उचलून नांदगावला गेला. बोरं विकून झाल्यानंतर तो तिथल्याच एका दवाखान्यात गेला. त्याने डॉक्टरला आजीबाईच्या आजाराबद्दल सांगितले व काही औषधी-गोळ्या देण्याची विनंती केली.

डॉक्टरांनी विठूला म्हातारीसाठी काही गोळ्या व औषधी दिली. त्या आजारी म्हातारीला काहीतरी खायला देऊनच कशा प्रकारे द्यायच्या ते नीट समजावून सांगितले. विठूने आल्या खिशातील बचतीचे पैसे डॉक्टरांना दिले व औषधे घेऊन आपल्या गावाला परत आला. विठूने आपल्या घरी येताबरोबर एका पालवात चटणी-भाकरी बांधली व ती घेऊन म्हातारीकडे आला. त्याने म्हातारीला भाकरी खाऊ घातली. पाणी प्यायला दिले. आपल्या हाताने व्यवस्थित औषधी गोळ्या दिल्या. आपण मात्र उपाशीच शाळेत गेला. हे सर्व केल्याने विठूला शाळेत जाण्यास जरा उशीरच झाला. त्यामुळे शिक्षकांचा राग अनावर झाला. त्यांनी विठूचे काहीएक न ऐकता विठूच्या प्रत्येक हातावर सपासप दोन दोन छड्यांचा प्रसाद दिला. संध्याकाळी आपल्या आईला त्याने म्हातारीच्या आजाराची गोष्ट सांगितली व तिच्यासाठी एक भाकरी जास्तीची रांधण्यास सांगितले. आईने आनंदाने एक भाकरी टाकून त्याला दिली व ती घेऊन त्या दिवशी संध्याकाळीसुद्धा विठू त्या म्हातारीकडे गेला. तिला भाकरी खाऊ घातली, नीट औषधपाणी दिले नि अंधार पडता-पडता आपल्या घरी परत आला.

घरी आल्यानंतर सा­ऱ्यांचे जेवण झाल्यानंतर त्याने आपल्या बचतीचे सारे पैसे म्हातारीच्या औषध पाण्यात खर्च झाल्याचे आपल्या आई-बाबांना सांगितले व गणवेषाबद्दल शाळेत मार बसल्याचेही सांगितले. आईने विठूची समजूत घातली. त्याने आपले दप्तर घेतले व अभ्यासाला बसला.

तीन-चार दिवसांत म्हातारी खडखडीत बरी झाली. ती रोज सकाळी विठूला बोरं जमा करू लागण्यासाठी त्याच्यासोबत मदत करायला येऊ लागली. विठूने त्या म्हातारीसाठी दुसरे एखादे हलके काम शोधण्याचा विचार सुरू केला नि त्याला तसे कामही सापडले.

एके दिवशी विठूने त्या म्हातारीला कापसाच्या वाता वळायला सांगितले. तिच्या झोपडीत तिच्या मजुरीचा आलेला थोडा फार कापूस होताच. तिने त्याच्या वाता वळायला सुरुवात केली आणि विठूने त्या रविवारला नांदगावला नेऊन विकल्या. आपल्या गावी आल्यावर विठूने वातांचे पैसे म्हातारीला नेऊन दिले.

अशा रीतीने तो दर रविवारी म्हातारीला सहकार्य करू लागला. त्या सुरेखशा वातांची जसजशी मागणी वाढू लागली तसतशा एकट्या म्हातारीच्या वाता कमी पडू लागल्या. विठूने तिला तिच्या शेजारच्या तीन-चार म्हाता­ऱ्या बायांची मदत घ्यायला सांगितले. अशा रीतीने विठूच्या सहकार्याने त्या चार-पाच म्हाता­ऱ्यांना उद्योग मिळाला नि ते सारे विठू नाही म्हणाला तरी त्याच्या शिक्षणाला मदत करू लागले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -