Thursday, May 2, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखबिहारचे पलटूराम

बिहारचे पलटूराम

सुकृत खांडेकर

बिहारमध्ये भाजपला सत्तेतून दूर करून नितीश कुमार यांनी जनता दल (युनायटेड), राजद, काँग्रेस, डावे पक्ष यांच्यासह सात पक्षांची महाआघाडी करून नवे सरकार स्थापन केले आहे. नितीश कुमार यांनी आठव्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊन एक देशव्यापी विक्रम निर्माण केला आहे. लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांना उपमुख्यमंत्रीपद देऊन नितीश कुमार यांनी नवा संसार थाटला आहे. काँग्रेस तर कधी भाजप, राजद तर कधी डावे पक्ष अशा परस्परविरोधी विचारसरणीच्या राजकीय पक्षांना बरोबर घेऊन गेली तीस वर्षे नितीश कुमार बिहारचे राजकारण खेळत आहेत. स्वत:ला कट्टर समाजवादी आणि लोकनायक जयप्रकाश नारायण यांचे पट्टशिष्य म्हणवून घेणारे नितीश कुमार यांनी सत्तेच्या राजकारणात कोणा-कोणाबरोबर सत्ता टिकविण्यासाठी कसरती केल्या, याचा आलेख पाहिला, तर असा सर्कसपटू देशात कुठे सापडणार नाही. जेव्हा त्यांनी भाजपबरोबर दुसऱ्यांदा तलाख घेण्याचा निर्णय घेतला व मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यावर थेट राबडी देवी यांच्या घरी जाऊन लालूप्रसाद यादव व तेजस्वी यादव यांच्याशी हातमिळवणी केली, तेव्हाच देशभरात पलटूराम अशी त्यांची प्रतिमा झळकली.

नितीश कुमार यांनी राजकारणात अनेक वेळा आपले मित्र व सत्तेतील भागीदार बदलले आहेत, पण मुख्यमंत्रीपदाची खुर्ची कायम ठेवली आहे. सन २०१३ मध्ये त्यांनी भाजपशी नाते तोडले तेव्हा नितीश कुमार म्हणाले, “मिट्टी में मिल जायेंगे, बीजेपी के साथ वापस नहीं जाएंगे।”

सन २०१७ मध्ये त्यांनी राजदशी संबंध तोडले तेव्हा ते म्हणाले, “मेरी अंतरात्मा ने उन लोगों के साथ रहने की अनुमती नहीं दी, जिनपर करप्शन के आरोप लगे हैं।” १० ऑगस्ट २०२२ रोजी त्यांनी महाआघाडी सरकारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यावर नितीश कुमार म्हणाले, “काही लोकांना (भाजप) वाटते की, विरोधी पक्ष संपुष्टात येईल. मात्र आम्ही आता (राष्ट्रीय पातळीवर) विरोधी पक्षात आहोत. तसेच २०१४ मध्ये (केंद्रात) आलेले २०२४ मध्ये राहतील का? आम्ही राहू न राहू, पण २०२४ मध्ये ते (भाजप) राहणार नाहीत. बिहारमध्ये पुन्हा एकदा चाचा – भतिजा सरकार सुरू झाले आहे.”

ज्या नितीश यांनी लालू परिवारावर जंगल राज म्हणून झोड उठवली होती, त्याच परिवाराला सोबत घेऊन त्यांनी भाजपच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे. भाजपबरोबर नाते तोडणे किंवा राजदबरोबर राजकीय मैत्री करणे, हे काही नितीश यांना नवीन नाही. जोड-तोड करताना नितीश यांचा सी फॉर्म्युला निश्चित असतो. जेव्हा भाजपबरोबर युती तोडायची असेल, तेव्हा कम्युनॅलिझम म्हणून आरोप करायचा आणि जेव्हा राजदशी नाते तोडायचे असेल तेव्हा करप्शन म्हणून हल्लाबोल करायचा. बहात्तर वर्षांचे नितीश कुमार इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग पदवीधर आहेत. १९८५ मध्ये ते सत्येंद्र नारायण सिन्हा यांच्या अध्यक्षतेखालील जनता दलाचे काम करीत होते व त्याच वर्षी ते हरनौतमधून प्रथम आमदार म्हणून निवडून आले. १९८९ मध्ये बिहार विधानसभेत विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी लालूप्रसाद यादव यांचे समर्थन केले होते. नितीश आणि लालू दोघेही एकमेकांना कॉलेज जीवनापासून ओळखतात. दोघेही जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनांत सहभागी असत. मार्च १९९० मध्ये लालू यादव बिहारचे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, तेव्हा नितीश यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. पण ही दोस्ती फार काळ टिकली नाही. त्या काळात जनता दलावर लालू यांचे नियंत्रण होते. १९९४ मध्ये नितीश यांनी लालू यांच्या विरोधात बंड केले.

लालू यादव यांची साथ सोडून त्यांनी जॉर्ज फर्नांडिस यांच्याबरोबर समता दलाची स्थापना केली. १९९६ मध्ये त्यांनी पहिल्यांदाच भाजपबरोबर हातमिळवणी केली व केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांच्या तेरा दिवसांच्या सरकारमध्ये मंत्री झाले. त्याच वर्षी लालू यादव व शरद यादव यांच्यात मतभेद झाले आणि लालू यांनी राष्ट्रीय जनता दलाची स्थापना केली.

सन २००० ते २०१० या काळात नितीश कुमार भाजपचे समर्थन घेऊन तीन वेळा मुख्यमंत्री झाले. दि. ३ मार्च २००० रोजी त्यांनी एनडीएचे समर्थन घेऊन मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण बहुमत सिद्ध करू न शकल्याने त्यांनी सात दिवसांतच म्हणजे १० मार्च रोजी राजीनामा दिला. नितीश कुमार यांची समता पार्टी २००३ मध्ये शरद यादव यांच्या जनता दलात विलीन झाली. नितीश यांनी भाजपबरोबर आपले नाते कायम ठेवले होते. विलीनीकरणानंतर जनता दल युनायटेडची स्थापना झाली व त्याचे प्रमुख नितीश बनले.

सन २००५ मध्ये नितीश यांनी भाजपशी युती करून विधानसभा निवडणूक लढवली. बहुमत मिळाले. २४ नोव्हेंबर २००५ रोजी ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. नितीश व भाजप यांचे नाते सतरा वर्षांनंतर २०१३ मध्ये संपुष्टात आले. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीकरिता एनडीएने पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून नरेंद्र मोदी यांचे नाव जाहीर केले आणि नितीश कुमार यांनी भाजपवर जातीयवादाचा आरोप करून भाजपशी काडीमोड घेतला. एनडीएचा नेता धर्मनिरपेक्ष असला पाहिजे, असे त्यांनी कारण दिले. त्यावेळी नितीश यांनी संघमुक्त भारताचे आवाहन केले होते व “मिट्टी में मिल जाएंगे, बीजेपी के साथ वापस नही जाएंगे…” अशी घोषणा दिली होती.

सन २०१३ मध्ये नितीश यांनी राजद व काँग्रेसला बरोबर घेऊन महाआघाडी स्थापन केली. पण मे २०१४ मध्ये त्यांनी राजीनामा दिला. सहा महिन्यांसाठी त्यांनी जीतन राम मांझी यांना मुख्यमंत्री बनवले होते. फेब्रुवारी २०१५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काही महिने अगोदर नितीश पुन्हा मुख्यमंत्री झाले. सन २०१५ मध्ये राजद व काँग्रेसशी हातमिळवणी करून त्यांना महाआघाडी स्थापन केली व २४३ पैकी १७८ जागा जिंकून बिहारचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी २० नोव्हेंबर २०१५ रोजी पाचव्यांदा शपथ घेतली. लालू यांचे पुत्र तेजस्वी उपमुख्यमंत्री झाले.

दोन वर्षांच्या आतच नितीश यांचे महाआघाडीतील घटक पक्षांशी बिनसले आणि २०१७ मध्ये महाआघाडी कोलमडली. तेव्हा नितीश कुमार यांनी राजदवर भ्रष्टाचाराचे जोरदार आरोप केले आणि पुन्हा भाजपशी घरोबा केला. आयआरसीटीसीच्या घोटाळ्यात मनी लाँड्रिंगमध्ये तेजस्वी यादव यांचे नाव पुढे आले. नितीश यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि चोवीस तासांत भाजपचा पाठिंबा घेऊन पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नितीश व भाजप यांची युती २०१९ पर्यंत ठीक होती. युतीने लोकसभेच्या ४० पैकी ३९ जागा जिंकल्या.

२०२० च्या विधानसभा निवडणुकांपासूनच भाजप व नितीश यांच्यात धुसफूस सुरू झाली. या निवडणुकीत भाजपशी युती करूनही जनता दल यूचे बरेच नुकसान झाले. २०१५ ला जनता दल यूचे ७१ आमदार होते. २०२० मध्ये ४३ निवडून आले. उलट भाजपची शक्ती वाढली. २०१५ मध्ये भाजपचे २१ आमदार होते, २०२० मध्ये ७४ निवडून आले. लालू यांच्या राजदचे ११५ आमदार विजयी झाले व राजद बिहारमध्ये नंबर १ चा पक्ष ठरला. वीस वर्षे मुख्यमंत्रीपदावर राहिलेल्या नितीश यांचा पक्ष राज्यात तिसऱ्या क्रमांकावर गेला. तरीही भाजपचे समर्थन घेऊन नितीश यांनी सातव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. निवडणुकीत रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग यांच्या नेतृत्वाखालील लोकजनशक्ती पक्षाने जनता दल यूच्या विरोधात प्रत्येक ठिकाणी उमेदवार उभा करून त्यांचे नुकसान केले. चिरागला भाजपने फूस दिली, असा आरोप जनता दल युने केला. जनता दल युनायटेड खच्ची करण्याचे कारस्थान भाजपने रचले आहे, असा आरोप पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष लल्लन सिंग यांनी केला आणि तेथून घटस्फोटाच्या ठिणग्या उडू लागल्या. ९ ऑगस्टला नितीश कुमार यांनी एनडीएशी काडीमोड घेतला व १० ऑगस्टला राजद, काँग्रेसला बरोबर घेऊन बिहारचे मुख्यमंत्री म्हणून आठव्यांदा शपथ घेतली.

sukritforyou@gmail.com
sukrit@prahaar.co.in

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -