Saturday, May 18, 2024
Homeसाप्ताहिककोलाजकुटुंबव्यवस्था नि बदलत्या समाजाचा आढावा घेणारे ‘पाची पांघरुणे’

कुटुंबव्यवस्था नि बदलत्या समाजाचा आढावा घेणारे ‘पाची पांघरुणे’

ज्योत्स्ना कोट-बाबडे

उमाकांत वाघ यांच्या ‘पाची पांघरुणे’ या पुस्तकाचे प्रकाशन आणि अक्षरजुळणी मयुरेश प्रकाशन यांनी केली आहे. तसेच समर्पक असे मुखपृष्ठ दीपक गावडे यांनी चितारले आहे. या पुस्तकात आपल्याला विविध प्रकारचे लेख वाचायला मिळतात. हे पुस्तक म्हणजे लेखकाच्या लहानपणापासूनच्या आठवणींचा सुंदर प्रवास आहे. या पुस्तकामध्ये लेखक आपल्या वैयक्तिक जीवनातील तसेच नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील आठकवडे हे आपले गाव नि तेथील राहणीमान तसेच वंजारी समाजातील जीवनाच्या वैशिष्ट्यांबाबत व्यक्त झाले आहेत. यातील सर्व लेख त्यांनी त्यांच्या ‘आपले स्मार्ट मित्र’ या साप्ताहिकात एक-एक करून मांडले होते. ते आता पुस्तकरूपाने लेखकाने वाचकांसमोर मांडले आहेत. त्याचा घेतलेला हा थोडक्यात आढावा.

उमाकांत वाघ हे एक ज्येष्ठ पत्रकार असून गेली अनेक वर्षे लेखन क्षेत्रात आहेत. पत्रकारिता, लेखन, प्रकाशन क्षेत्र तसेच कवी म्हणून ते आपल्या कार्यक्षेत्रात चौफेर कामगिरी करीत आहे. ‘पाची पांघरुणे’ या त्यांच्या पुस्तकात त्यांनी विविध प्रकारच्या दैनंदिन ग्रामीण, शहरी, शेतकरी कुटुंब या घटनांवर आधारित ४६ लेख लिहिले आहे. ग्रामीण आणि शहरी जीवनातील फरक, रूढी-परंपरा यांबद्दल लेखकाने लिहिले आहे.

या पुस्तकाच्या पहिल्याच भागात ‘मनो-वेदना ग्रामीण जीवनाची’ हा लेख दिला आहे. त्यात आपल्याला पाहायला मिळते की, यात त्यांनी त्यांच्या गावातील रस्ते, घरे, राहणीमान, समाजजीवन याबद्दल प्रकर्षाने वर्णन केले आहे. तसेच या लेखात त्यांच्या आजी-आजोबांचे गाव दाखवले आहे. त्यांचे आजोबा एकेकाळी प्रतिष्ठित शेतकरी तसेच सामाजिक कार्यकर्ते म्हणून नाशिक जिल्ह्यात मागच्या काही पिढ्यांपासून परिचित प्रस्थ होते. ‘डोंगरे वसतिगृह-नाशिक पायाभरणी संस्थात्मक वाटचाली’ या दुसऱ्या लेखात शेती करून लोक आपला प्रपंच चालवत आलेले असतात; परंतु समाजजीवन बदलत्या रूपात असताना घरातील मंडळी शेती करून आपल्या मुलांना शिकवतात आणि ते नोकरी-धंद्यासाठी मुंबईकडे जातात. नंतर त्यांचे लग्न झाले की, जमत असल्यास बायका-पोरांसह मुंबईत स्थायिक होतात किंवा भाड्यावर खोली घेऊन कसे राहतात, हे मार्मिकपणे मांडण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे खेड्यापाड्यांतील लोक कोणत्याही धार्मिक कार्यासाठी नाशिक शहरातील पंचवटी या अत्यंत धार्मिक महत्त्व असलेल्या रामकुंडावर येतात. एरवी कधी शहराकडे न येणारा खेड्या-पाड्यातला हा माणूस अशा नात्या-गोत्यातील धार्मिक कार्यासाठी या तीर्थस्थळी आवर्जून उपस्थित राहतो. टोपी, टॉवेल किंवा नात्यातील महिलेला साडी-चोळी जवळचे भाऊबंदांना उपरणे देण्याची पद्धत आहे, असे विविध प्रसंग सुख-दुःखाच्या ठिकाणी कशा प्रकारे साजरे केले जातात, याचे वर्णन लेखकाने ‘तीर्थाच्या ठिकाणी सुख-दुःखाचा मेळा’ या लेखात केले आहे. जगण्याचा आर्थिक स्तर काहीही असो, गावाकडे एक मात्र आनंदाची बाब सर्वत्र ठिकाणी बघायला मिळते ती म्हणजे सणाचा आनंद.

सणवार म्हणजे बायाबापड्यांना चांगले-चुंगले कपडे घालून घरादारात सणासाठी मिरविताना पाहण्याचा तसेच लहान मुलांनाही सणांचा आनंद घेताना पाहणे आैरच. गुढीपाडवा असो की अक्षय्य तृतीया या दिवशी घरात गोडधोड पदार्थ बनवले जातात. अशा वेळी आर्थिक परिस्थिती व इतर अडचणी बघितल्या जात नाहीत. त्यावेळेला घरात वरण, भात, भजी, कुरड्या, खीर, पुरणपोळी, गुळवणी, शिरा असा काही बेत करून अनेक पदार्थ हौसेने केले जातात.

विविध प्रकारचे सण असतील, तर चतुःश्रृंगी देवीची ओटी भरणे, खेड्यावर असेल, तर गावातल्या लहान टेकडीवर असलेल्या खंडोबाच्या मंदिरात दर्शनाला जाणे साग्रसंगीत देवाची पूजा करणे हे सर्व सणावाराला केले जाते. असे विविध प्रसंग, परंपरा लेखकाने ‘गावाच्या सणाची गोडधोड खाण्याची मजाच आगळी’ या लेखातून मार्मिकपणे मांडले आहेत.

अशा प्रकारे उमाकांत वाघ यांनी ‘पाची पांघरुणे’ या पुस्तकातील अनेक लेखांच्या संग्रहात शेतकरी, त्यांचे राहणीमान, रुढी-परंपरा, सुख-दुःख अशा बाबतीतले विविध प्रकारचे आपले अनुभव मार्मिकपणे रेखाटले आहेत. वाघ यांच्या या खिळवून ठेवणाऱ्या लेखांतून वाचकांना ग्रामीण जीवनाचे रहस्य समजून घेता येईल. कुटुंबव्यवस्था व ग्रामीण जीवनाचे आकर्षण असलेल्या प्रत्येकाच्या संग्रही असावे, असे हे वाचनीय पुस्तक आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -