Share
  • प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ

सहज शक्य असेल तर साहित्य क्षेत्रातील कोणत्याही गोष्टीला उगाचच ‘नाही’ म्हणायचे नाही, अशी मनाला सवय करून घेतली आहे. या सवयीचा एक फायदा असा होतो की, एखाद्या विषयावरचा आपला अभ्यास नसेल तर तो आपल्याला विस्तृतपणे करता येतो आणि त्या क्षेत्रातील आपले ज्ञान वाढते.

लॉकडाऊनच्या काळात एका संस्थेचा फोन आला आणि त्यांनी विचारले की, तुम्हाला ‘अवयव दान’ या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या एका महिलेची मुलाखत घ्यायची आहे. माझ्या मताप्रमाणे नाही म्हणण्याचे काही कारण नव्हतेच! अवयव दानासंबंधी माहिती शोधायला सुरुवात केली. एकदा माहिती मिळाली की, त्याप्रमाणे प्रश्न विचारणे सोपे जाईल, असे वाटले. फोनवर मला कोणाशी तरी बोलताना माझ्याकडे काम करणाऱ्या बाईने ऐकले आणि ती म्हणाली, ‘हे बघा वहिनी… आजकाल हे अवयव दान वगैरे जे आहे ते अगदी चुकीचं आहे.’

मी चमकून विचारले, ‘काय म्हणालीस?’

‘म्हणजे मेल्यावर आपल्या शरीरातले भाग काढून घेतात ना…’

‘हं… मग त्याचं काय?’

‘नाही मेल्यावर असा नाही काढू द्यायचा शरीराचा भाग.’

‘का गं?’

‘पुढच्या जन्माच्या वेळेस तो भाग आपल्या शरीराच्या आत राहत नाही.’

‘काय?’

‘हो म्हणजे शरीर त्या भागाशिवाय स्वर्गात जातं ना… मग नवीन जन्म होताना त्या भागाशिवायच नवीन शरीर जन्माला येतं.’

‘अगं दोन मुलांची आई ना तू…?’

मी तिला अभ्यासलेली सविस्तर माहिती दिली. ती जन्मल्यापासून अर्ध्या तासापूर्वीपर्यंत तिचे जे मत होते ते इतके बदलले की, ती मला म्हणाली, ‘मलाही माझे अवयव दान करायचे आहेत. शरीरचं दान करायचं आहे.’

या स्वानुभवातून मला हे सांगायचे आहे की, अनेक चांगल्या गोष्टी चांगल्या प्रकारे समोरच्या माणसाला पूर्णपणे पटतील अशा सांगितल्या, तर त्याचे विचार बदलतात. इतकी महत्त्वाची अवयव दानाची माहिती अजून तरी भारतामध्ये प्रत्येक माणसापर्यंत पोहोचत नाही आहे. अवयव दानाविषयी जागरूकता निर्माण होण्यासाठी अधिक प्रमाणात कार्यक्रम राबवले जात नाहीत. काही टीव्हीवरच्या जाहिराती किंवा एखाद-दुसरा सिनेमा, काही पत्रिका (पम्प्लेट्स)वरील जाहिराती वा एका दुसरा कार्यक्रम याशिवाय या विषयावर जेवढी चर्चा व्हायला हवी किंवा प्रत्येक माणसापर्यंत ही गोष्ट पोहोचायला हवी तशी ती पोहोचत नाहीये. त्यासाठी काही ठोस उपक्रम खरोखरी राबवायची गरज आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे अवयव दान करणे सोपे आहे. साक्षीदारांसमोर ‘अवयव दान पत्र’ सही करून ते पत्र आपण आपल्या सोबत ठेवू शकतो. जेणेकरून आपल्याला कोणते अवयव दान करायचे आहेत किंवा पूर्ण शरीर दान करायचं आहे ते आपण लिहून ठेवू शकतो किंवा आपल्या अत्यंत जवळच्या व्यक्ती हे आपण मेल्यानंतर सांगू शकतात की यांना अवयव दान करायचे होते!

आपण किडनी, डोळे, अन्नाशय, स्वादुपिंड, यकृत, हाडे, इतकेच काय तर हृदय व काही पेशींचेही प्रत्यारोपण करू शकतो. आपल्या माघारी कितीतरी माणसांना आपण जीवदान देऊ शकतो.

जोवर आपल्या अत्यंत जवळच्या माणसाला ‘अवयव’ मिळण्याची आवश्यकता निर्माण होत नाही तोपर्यंत आपण या अवयव दानाचे महत्त्व जाणू शकत नाही! म्हणूनच अगदी शालेय विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिक संघापर्यंत सर्व गटातील माणसांसाठी ‘अवयव दान जागरूकता मोहीम’ राबवण्याची गरज आहे. सातत्याने एखादी गोष्ट आपल्या कानावर पडत गेली की, आपले मनसुद्धा त्या गोष्टीसाठी तयार होते. अवयव दान नेमकं कोणाला करता येते, केव्हा करता येते, कोणता अवयव मृत्यूच्या आधी आणि मृत्यूच्या नंतर आपल्याला दान करता येतो, कोणत्या आजारपणात आपण अवयव दान करत नाहीत, कोणत्या संस्था अवयव दान या कार्यासाठी काम करतात, कोणते कार्यकर्ते यासाठी काम करतात ही सगळी माहिती आपल्याला गुगल गुरूकडून सहज मिळते. ती आपण अधूनमधून घेत राहिली पाहिजे. कमीत कमी मेल्यानंतर तरी आपल्याला आपल्या शरीराची किंवा शरीरातल्या अवयवांची काहीही आवश्यकता नाही, हे लक्षात जाणून घेऊन नुसतंच त्याची जळून राख करण्याऐवजी अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवता येईल, त्यांना नवजीवन देता येईल हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे.

‘मरावे परी कीर्तिरूपे उरावे’ या उक्तीप्रमाणे अवयव दानाच्या बाबतीत आपण म्हणू शकतो, ‘मरावे परी अवयव दानरूपे उरावे!’

pratibha.saraph@gmail.com

Recent Posts

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, दिनांक ४ मे २०२४.

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण एकादशी शके १९४६. चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा. योग ऐद्र. भारतीय…

2 hours ago

पाकिस्तानला काँग्रेसचा पुळका

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून भाजपा व भाजपाच्या मित्रपक्षाच्या उमेदवारांचा…

5 hours ago

नियोजनबद्ध कचरा व्यवस्थापन

मिलिंद बेंडाळे, पर्यावरण अभ्यासक कचरा किंवा कचरा व्यवस्थापन ही देशातील मोठी समस्या आहे. दिल्ली, मुंबईसारख्या…

5 hours ago

मतदान जनजागृती काळाची गरज

रवींद्र तांबे दिनांक २० एप्रिल, १९३८ रोजी इस्लामपूर येथे केलेल्या भाषणात भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार…

6 hours ago

MI vs KKR: १२ वर्षांनी वानखेडेवर कोलकाताचा विजय

मुंबई: मुंबईच्या वानखेडे मैदानावर आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना रंगला होता.…

7 hours ago

Narendra Modi : बंगालचे नाव तृणमुलमुळे खराब झाले!

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल कोलकाता : संदेशखालीमध्ये काय घडत आहे हे टीएमसीच्या नेत्यांना…

8 hours ago