Sunday, May 19, 2024
Homeमहत्वाची बातमीअजित पवारांना भाजपासोबत येण्याची खुली ऑफर

अजित पवारांना भाजपासोबत येण्याची खुली ऑफर

राधाकृष्ण विखेपाटील यांनी केले आवाहन

अहमदनगर : महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार स्थापन होऊन सुमारे अडीच वर्षांचा कालावधी लोटला असला तरी, भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीची अजूनही आठवण काढली जातो. एवढेच नव्हे तर त्यावरून आरोप-प्रत्यारोपही होतात. मात्र, भाजपच्याच एका ज्येष्ठ नेत्याने अजित पवार यांना भाजपसोबत येण्याची खुली ऑफर दिल्याचे सांगितले जात आहे. तसेच अजित पवार यांनी भाजपसोबत येण्याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, असे आवाहनही या नेत्याने केले आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी अजित पवारांना पुन्हा भाजपसोबत येण्याचे आवाहन केले आहे. देवेंद्र फडणवीस हे उत्तम प्रशासक आणि स्ट्रेट फॉरवर्ड नेते आहेत. त्यांनी राज्यात लवकरात लवकर भाजपाचे सरकार आणावे. अजित पवारही स्पष्टवक्ते आणि शब्दाचे पक्के आहेत. त्यांनी पुन्हा आमच्यासोबत यावे, अशी खुली ऑफर दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संयमी आणि मितभाषी आहेत. पण त्यांनी चुकीच्या सल्लागारांची संगत सोडावी, असा सल्लाही विखे पाटलांनी दिला आहे. पुढील काळात मंत्री नव्हे तर विरोधी पक्षनेता व्हायला आवडेल, असेही ते म्हणाले आहेत. तसेच लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपत जाण्याचा निर्णय योग्य आणि आयुष्याला कलाटणी देणारा होता, अशी भावनाही व्यक्त केली. आमच्या राजकीय भूमिका वेगळ्या आहेत. राजकारणात अशी मतभिन्नता असतेच. आम्ही आमच्या वडिलांच्या विचाराने पुढे जात आहोत, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, घराणेशाहीवर बोलताना ते म्हणाले की, अनेक नेत्यांच्या पुढच्या पिढ्या राजकारणात आल्या आहेत. त्यातील अनेकांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. असे चांगले काम करणार्याला विरोध असायचे कारण नाही. पण अशा पद्धतीने राजकारणात आलेले लोक निष्क्रिय असतील तर समाजाचे नुकसान होते. त्यांना विरोध होणे साहजिक आहे. माझा मुलगा डॉ. सुजय याने राजकारणात यावे आणि खासदार व्हावे, ही त्याच्या आजोबांची इच्छा होती. त्यांनीच त्याला राजकीय मार्गदर्शन केले. त्यांच्यामुळेच तो राजकारणात आला, असेही विखे यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -