Friday, May 17, 2024
Homeमहत्वाची बातमी‘गाथा’ उत्सवाच्या निमित्ताने...

‘गाथा’ उत्सवाच्या निमित्ताने…

  • मायभाषा: डॉ. वीणा सानेकर

भाषा व साहित्याची गरज केवळ त्यांचा अभ्यास करणाऱ्या लोकांना असते, असा गैरसमज असतो. पण कल्पना, विचार, ऊर्जा यांची गरज सर्वांना असते व साहित्यातून ही पुंजी नक्कीच मिळते. आपण उत्सवप्रिय असतो. हे उत्सव साहित्याशी संबंधित असले, तर त्यांना साकार करताना काय नवे करता येईल? खरे तर खूप काही… पण त्याकरिता कल्पकता हवी. असेच कल्पक आयोजन सोमैया विद्याविहार व स्टोरी टेलर्स असोसिएशन यांनी मिळून केले.

हा उत्सव कथाकथनावर आधारित आहे. या उत्सवाचे महत्त्व म्हणजे नावीन्यपूर्ण पद्धतीने केले गेलेले आयोजन. विणकामाच्या कथा, स्वयंपाक घरातील कथा, रागकथा, वादनकथा, पोवाडा व भारुड रूपांतील कथा, लोककथा, कळसूत्री खेळातून कथा अशा विविध कथनरूपांचा समावेश या उत्सवात झाला आहे. या उत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त कथनकार डाॅन याशिस्की, सीता ब्रांड यांसारखे कथनकार सहभागी झाले. विदेशातही सीता या नावाचे किती आकर्षण आहे. शीळ वाजवणे, विविध प्रकारचे आवाज, त्यांचे चढ-उतार, आरोह-अवरोह, विराम, संवाद या सर्वांचा उपयोग कथनशैलीमध्ये करून समोरच्या प्रेक्षकांना धरून ठेवता येते. संपदा कुलकर्णी-जोगळेकर या मराठी अभिनेत्रीने सादर केलेली ‘आभाळ’ ही स्वरचित कथा प्रभावी होती. हेलन केलर आणि तिच्या शिक्षिकेच्या सुंदर नात्यावर प्रकाश टाकणारी ही कथा मातीत रुजणाऱ्या अंकुरासारखी आश्वासक ठरली. तरुण व ज्येष्ठ असे दोन्ही कथाकार या उद्घाटन सत्रात होते.

नव्या पिढीचे घटस्फोटासारखे निर्णय व त्याकडे पाहण्याचे जुन्या पिढीचे दृष्टिकोन या विषयावरची बंगाली वातावरणातली कथा तरुणांना आवडून गेली. पती-पत्नीच्या नात्याचे कितीतरी कंगोरे विविध भाषांतील कथांमधून व्यक्त झाले आहेत.
आयुष्यातील नि नात्यातील असे हे रंग कथनरूपांमधून साकार होतात. महाभारत, रामायण नि पुराणांमधील कथा आजही आपल्याला भुरळ घालतात. जुन्या गाण्यांमधले एक गीत या दृष्टीने मनोहर आहे.

भरजरी गं पितांबर दिला फाडूनी
द्रौपदीसी बंधू शोभे नारायण…
सुभद्रा कृष्णाची पाठची बहीण
विचाराया गेले नारद म्हणोन…

आचार्य अत्रे दिग्दर्शित ‘श्यामची आई’ या राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या चित्रपटातील हे गीत कृष्णकथेतील एक सुंदर प्रसंग
कथन करते. ‘प्रेमाचं लक्षण भारी विलक्षण’ हे या गीतातील शब्द या गीताला एका उंचीवर नेऊन ठेवतात. ‘गाथा’ या उत्सवानिमित्ताने कथारूपांचे विविध फेर मनात आकार धरू लागले आहेत. हा उत्सव आज मुंबईकर रसिकांचे आकर्षण ठरतो आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -