Saturday, May 18, 2024
Homeसाप्ताहिककोलाजOld Hindi songs : ‘यार हमारी बात सुनो...’

Old Hindi songs : ‘यार हमारी बात सुनो…’

  • नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे

मागच्या शुक्रवारी होऊन गेलेल्या गुड फ्रायडेच्या पार्श्वभूमीवर राजेश खन्नाचा ‘रोटी’(१९७४) चित्रपट आठवला. कारण त्यातील एकेक गाणे येशू ख्रिस्ताच्या जीवनातील एका जगप्रसिद्ध प्रसंगावर बेतलेले होते.

‘रोटी’ ही खरे तर एका गुन्हेगाराची कथा होती. राजेश खन्ना आणि मुमताजच्या या सिनेमात खलनायक होता डॅनी! याशिवाय ओम प्रकाश, निरूपा रॉय, जगदीप, विजय अरोरा, असरानी, विजू खोटे, जीवन, पेंटल यांच्यासह जितेंद्रनेही ‘पाहुणा कलाकार’ म्हणून हजेरी लावली होती. सिनेमा लोकांना आवडलाही होता. इंग्रजीतील १९५९ सालच्या ‘फेस ऑफ अ फ्युजीटीव्ह’च्या कथेत अनेक बदल करून रोटी तयार झाला होता. पुढे त्याची ‘नेरम नडी कडू अकालीदी’ नावाने तेलुगू आवृत्तीही निघाली. त्यात एन. टी. रामाराव आणि मंजुळाने प्रमुख भूमिका केल्या होत्या.

कादर खान यांना रोटीचे संवाद लिहिण्यासाठी विक्रमी मानधन (त्यावेळी १ लाख २१ हजार रुपये) देण्यात आले. सिनेमाने मनमोहन देसाईंना गल्लाही जबरदस्त (त्यावेळचे ६ कोटी म्हणजे आजचे ४८० कोटी रुपये) मिळवून दिला होता. ‘रोटी’साठी त्या वर्षीचे ‘सर्वोत्कृष्ट चित्रपट संकलनाचे फिल्मफेयर पारितोषिक’ कमलाकर करकानी यांना मिळाले.

रोटीतील गाण्याच्या प्रसंगासारखी पार्श्वभूमी ‘लैला मजनू’(१९७८)चीही होती. त्यातले ‘हुस्न हाजीर हैं मुहब्बतकी सजा पानेको’ हे मदन मोहन यांनी संगीत दिलेले साहिरचे गाणे तर १९७७ साली बिनाका गीतमालाचे सरताज गीत ठरले होते.

या दोन्ही गाण्यात येशू ख्रिस्ताच्या काळाचे सामाजिक वातावरण, विशेषत: न्यायव्यवस्था दाखवली होती. येशू ख्रिस्त ज्या ज्यू धर्मात जन्मला त्यात वेगवेगळ्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा सांगितलेल्या होत्या. येशूची शिकवण मात्र ईश्वरी प्रेमाची आणि क्षमाशीलतेची होती. त्याच्या बिनशर्त क्षमा आणि निरपेक्ष प्रेमाच्या शिकवणुकीमुळे स्थानिक शास्त्री, पुरोहित चिंतेत पडले होते. त्यांचा खोट्या अध्यात्माचा धंदाच बंद पडू लागला होता. ते येशूवर संतापलेले होते, त्याला कसे संपवता येईल त्याची संधी ते शोधत होते. एकदा त्यांना आयतीच एक व्यभिचारी स्त्री सापडली. तत्कालीन यहुदी धर्मशास्त्राप्रमाणे अशा व्यक्तीला सर्व गावकऱ्यांनी तिचा जीव जाईपर्यंत दगडमार करून ठार करणे अशी कडक शिक्षा होती!

शास्त्री-पंडितांना माहीत होते की, करुणा आणि प्रेमाचा संदेश द्यायला जगात आलेला येशू तिला नक्की माफ करून सोडून देईल. मग आपण ‘त्याने धर्मशास्त्राचा अवमान आणि ईशनिंदा केली’ असे आरोप करून त्याच्यावर खटला भरू. अशा प्रकारे त्याला कायदेशीर मार्गानेच संपवता येईल अशी त्यांना आशा होती. पण येशूने वेगळाच मुद्दा काढला. तो म्हणाला, “या पापी स्त्रीला तुम्ही म्हणता ती शिक्षा योग्य आहे. तीच द्या. फक्त एक काम करा, ज्याने आजवर एकही पाप केले नाही त्याने हिला पहिला दगड मारावा! मग इतरांनी दगडमार करावा.” झाले, सगळीकडे शांतता पसरली! त्या स्त्रीच्या भोवतीची गर्दी ओसरू लागली.

कारण ‘पहिला दगड फक्त निष्पाप व्यक्तीनेच मारावा’ हे वाक्य काही कुणा ढोंगी धर्मगुरूने उच्चारलेले पोकळ शब्द नव्हते. ते प्रत्यक्ष ईशपुत्राच्या मुखातून निघालेले दैवी वचन असल्याने ते ऐकल्यावर लोक भारवल्यासारखे झाले. त्यांना काही सुचेना. ‘आपण तर लहानपणापासून अनेक पापे केली आहेत’ हे त्यांना प्रथमच जाणवले! मग त्या स्त्रीला ठार मारण्यासाठी त्यांनी आणलेले दगड एकेकाच्या हातातून आपोआप गळून पडू लागले. शेवटी सर्वजण निघून गेल्यावर येशू तिला म्हणाला, “मुली, शांतीने जा. यापुढे पाप करू नको.”

याच प्रसंगाचे नाट्यमय चित्रीकरण ‘रोटी’त मनमोहन देसाईंनी केले होते. गाणे राजेश खन्नाच्या तोंडी दिलेले असल्याने किशोरदानी ते त्यांच्या दमदार आवाजात समरसून गायले. लक्ष्मी-प्यारेंच्या संगीताने गाण्याच्या आशयाचे गांभीर्य, त्या प्रसंगातली उदासीनता वगैरे सगळे उडून गेले आणि ते एक रंजक, लोकप्रिय फिल्मी गाणे बनले.

‘यार हमारी बात सुनो,
ऐसा इक इंसान चुनो,
जिसने पाप ना किया हो,
जो पापी ना हो.’

आनंद बक्षीजींनी आपण एका धार्मिक बोधकथेचे रूपांतर गाण्यात करत आहोत हा विचार बाजूला ठेवून आपल्याला एक लोकप्रिय होऊ शकणारे फिल्मी गीत लिहायचे आहे हे लक्षात घेतल्याने त्यांनी मूळ आशय सोपा आणि सुलभ करून टाकला. श्रोत्याला विचारात पाडणारे त्यांचे निवेदन होते की, ‘कुणी चतुर असेल तर कुणी साधाभोळा, पण आपल्या सर्वांकडूनच काही ना काही पाप, कधी ना कधी घडलेलेच आहे. चतुर सुटून जातो, साधाभोळा सापडतो आणि चूक मान्यही करून टाकतो. पण एखादा स्वत:ची ही नैसर्गिक स्खलनशीलता मान्य न करता चांगला उपदेश करणाऱ्यावरच चिडतो, स्वत:ला कायम निर्दोष समजतो.

कोई है चालाक आदमी,
कोई सीधा सादा
हममेसे हर एक है पापी,
थोड़ा कोई ज़्यादा
हो कोई मान गया रे, कोई रूठ गया
हो कोई पकड़ा गया, कोई छूट गया
यार हमारी बात सुनो,
ऐसा एक बेईमान चुनो…

मूळ प्रसंगाशी दुवा जोडून ठेवायचा असल्याने पुढच्या ज्या ओळी येतात त्या बायबलमधील प्रसंगाचे दृश्य डोळ्यांसमोर उभे करतात. राजेश खन्ना म्हणतो, ‘चला, आपण सगळे मिळून या पापिणीला शिक्षा देऊयात. फक्त एक पथ्य पाळू की पहिला दगड तो मारेल ज्यांनी आपल्या आयुष्यात कधीच पाप केलेले नसेल.’

इस पापनको आज सजा देंगे,
मिलकर हम सारे
लेकिन जो पापी न हो,
वो पहला पत्थर मारे.
शेवटच्या कडव्यातला विचार हा रोटीतले हे गाणे केवळ मनोरंजन नाही याची साक्ष देतो. त्यात गीतकाराने येशूच्या शिकवणुकीतून नेमका विचार आजच्या काळासाठी सोपा करून मांडला आहे. खरे तर तोच त्या गाण्याचा खरा आशय आहे. माणसाने कुणाबद्दल काही मत बनवण्यापूर्वी, मनातल्या मनात का होईना त्याचा न्याय करण्यापूर्वी, अंतर्मुख व्हायला हवे. आपणच जर अनेक गोष्टीत दोषी असू तर आपल्याला इतरांचे दोष काढण्याचा, त्यांचे न्यायाधीश होण्याचा, काय अधिकार? हा तो विचार!

हो पहले अपने मन साफ़ करो रे,
फिर औरोंका इंसाफ करो.
यार हमारी बात सुनो,
ऐसा इक नादान चुनो…
जिसने पाप ना किया हो,
जो पापी ना हो.

हिंदी गीतकारांनी आपल्या भांडारात काय काय भरून ठेवले आहे ते पाहणेही कधी मोठे रंजक आणि बोधप्रदही ठरते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -