Sunday, May 19, 2024
Homeकोकणरायगडडोंगर पायथ्याखालील रहिवाशांना नोटिसा

डोंगर पायथ्याखालील रहिवाशांना नोटिसा

संरक्षक भिंतीसाठी निधी नसल्याचा कर्जत न. प. चा कांगावा; लोकप्रतिनिधी, नगरसेवकांचे दुर्लक्ष

कर्जत (वार्ताहर) : कर्जत नगर परिषदेने शहरातील सात इमारती आणि जीर्ण झालेली चाळ आणि मुद्रे, भिसेगाव आणि गुंडगे येथील टेकडी खाली राहणाऱ्या रहिवाशांनी घर सोडून अन्य ठिकाणी स्थलांतर होण्याची नोटीस बजावली आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. गुजराथी इमारत, डागा बिल्डिंग, इंद्रस, पिंपुटकर वाडा, भुसारी चाळ, सिकंदर चाळ, तेलवणे बिल्डिंग या इमारती आणि चाळींना नोटीस बजावल्या आहेत. मुद्रे येथील डोंगर पायथ्याशी राहणाऱ्या २७ घरांना नोटीस बजावली, तर गुंडगे येथील ४३, भिसेगाव येथील २४ घरांना नोटीस काढून घर सोडण्यास सांगितले आहे.

२०२० मध्ये पूर आला होता त्यावेळेस नागरिकांनी नगर परिषद प्रशासनाकडे टेकडीलगत संरक्षक भिंत उभारण्याची मागणी केली होती. नगरसेवक सोमनाथ ठोंबरे यांनी मासिक सभेत टेकडीलगत संरक्षक भिंत उभारण्याचा ठराव घेतला होता. मग नगर परिषदेने त्या ठरावाचे केले काय? असा सवाल नागरिक विचारत आहे.

भिसेगाव येथील नागरिकांनी नगर परिषदेचे लक्ष्मण माने यांच्याशी संवाद साधला, तर सांगण्यात आले की, आमच्याकडे निधी नाही. ज्यांना भिंत पाहिजे त्यांनी निधी उपलब्ध करून द्या. बांधकाम नगर परिषद करेल. नगर परिषदेने १४० घरे टेकडी पायथ्याशी आहेत. अशांना नोटीस बजावली आहे. दरड/माती कोसळून घराचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी घर सोडून अन्य ठिकाणी राहण्याची व्यवस्था करावी अन्यथा जीवितहानी झाल्यास नगर परिषद जबाबदार नसेल असे पत्र आपत्तीग्रस्त असणाऱ्यांना दिल्याने नगर परिषदेने हात वरती केले आहेत.

अंधाधुंद कारभाराकडे आमदारांचे दुर्लक्ष

नगर परिषद प्रशासन, लोकप्रतिनिधी विकासाच्या नावाखाली लाखोंची उधळपट्टी करतात. नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविल्या जात नाहीत. याकडे आमदार थोरवे यांनी लक्ष घातले पाहिजे, अशी मागणी नागरिक करीत आहे.

स्थानिक नगरसेवकांना समस्या माहीत असूनही त्यांनी ते सोडविणे क्रमप्राप्त होते. मात्र न. प. च्या लोकप्रतिनिधी आणि नगरसेवकांच्या अंतर्गत वादामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळणे हे लोकप्रतिनिधींना कितपत योग्य वाटते. – पूजा कांबळे (गुंडगे)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -