Saturday, May 4, 2024
Homeताज्या घडामोडीनाताळ, नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर हॉटेल्स, रिसॉर्ट, फार्महाउसना नोटिसा

नाताळ, नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर हॉटेल्स, रिसॉर्ट, फार्महाउसना नोटिसा

नाशिक: कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा ओसरल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर आले असल्याने नाताळ , नववर्षाचे स्वागत यामुळे शहर व जिल्ह्यातील हॉटेलांमध्ये मोठा जल्लोष होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून , कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्यात येणार आहे . त्यासाठी जिल्ह्यातील हॉटेल्स रिसॉर्ट, फार्महाउस व इतर पर्यटन क्षेत्रांना नोटिसा बजावण्यात येतील, असे पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असून, जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या ४००च्या जवळपास आहे. जनजीवन पूर्वपदावर आल्याने आर्थिक चक्रही वेगवान झाले आहे. त्यातच वर्षअखेरीस नाताळ व थर्टीफर्स्ट निमित्त हॉटेल, रिसॉर्ट , फार्महाउस , पर्यटन स्थळांवर बऱ्याच मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होणार आहे.

मात्र , राज्यात ओमायक्रॉनचा धोका वाढत असल्याने कोरोना संसर्गनियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी खबरदारी घेणे, हा एकमेव पर्याय आहे. मात्र गर्दीत सोशल डिस्टन्स, मास्कचा वापर , स्वच्छता या नियमांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. ही शक्यता ओळखून पोलिस अधीक्षक पाटील यांनी कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक नियमांचे पालन करून नववर्ष स्वागत पार्ट्यांचे आयोजन करण्यास हरकत नसल्याचे सांगितले आहे. मात्र, गर्दी झाल्यास व कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक असलेल्या नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रासह इतर ठिकाणी आयोजित होणाऱ्या पार्ट्यांमध्ये नियम पालनाची जबाबदारी आयोजक , हॉटेल व रिसॉर्ट व्यवस्थापकांची आहे. त्याचप्रमाणे ड्रंक अॅण्ड ड्राइव्हचे प्रकार टाळण्यासाठी वाहतूक पोलिस, स्थानिक पोलिसांसह मुख्यालयाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने बंदोबस्ताचे नियोजन केले जात आहे. या प्रकरणी हॉटेल व रिसॉर्ट व्यवस्थापकांसह पार्ट्यांचे आयोजन होऊ शकतील, अशा संभाव्य ठिकाणांच्या व्यवस्थापकांसह आयोजकांना याबाबतच्या नोटिसा धाडण्यात आल्या आहेत .

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -