Monday, May 20, 2024
Homeसाप्ताहिककोलाजNostalgic songs : सखी मंद झाल्या तारका...

Nostalgic songs : सखी मंद झाल्या तारका…

  • नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे

चित्रपट कथालेखक, संगीत दिग्दर्शक, निवेदक, चित्रकार आणि गीतकार अशा विविध भूमिका लीलया पार पाडलेल्या सुधीर मोघे यांनी जशी सिनेगीते लिहिली तशीच अनेक भावगीतेही लिहिली. अगदी कमी शब्दांत खूप आशय प्रकट करणे हे त्यांच्या रचनांचे वैशिष्ट्य होते. ते जो विषय निवडत त्याचे अगदी उत्कट चित्र आपल्या शब्दांतून उभे करत असत.

एखाद्या जीवलगाची प्रतीक्षा करावी लागणे ही खरे तर एक शिक्षाच असते. त्यात पुन्हा ती प्रतीक्षा जर प्रिय सखीची असेल, तर शिक्षा फारच कठोर वाटते. सुधीरजींनी एका भावगीतात या भावावस्थेचे फार सुंदर वर्णन केले होते. सुधीर फडके यांनी गायलेल्या त्या गाण्याला संगीत होते राम फाटक यांचे आणि रसिकांना आजही पाठ असलेल्या त्या गीताचे शब्द होते –
सखी मंद झाल्या तारका,
सखी मंद झाल्या तारका,
आता तरी येशील का?

म्हणजे हा प्रियकर तिची वाट कालपासूनच पाहतो आहे. या लांबलेल्या प्रतीक्षेत मध्ये रात्र आली, ती उलटून गेली, पहाट झाली. रात्रभर ज्या चांदण्यांकडे पाहत त्याने तिची सवाट पाहिली त्या चांदण्याही पहाटेच्या संधीप्रकाशामुळे फिक्या वाटू लागल्या तरीही ती आली नाही! आणि मुख्य म्हणजे याचे वाट पाहणे काही सरले नाही, मिलनाची आस मिटली नाही! अजूनही अंधुकशी आशा आहेच की ती येईल. म्हणून तो विचारतोय, ‘आता तरी येशील का?’

तू भेटणार म्हणून जी रात्र मला मधुर वाटत होती ती किती सावकाश निघून गेली. किती एकाकीपणात मी अवघी रात्र काढली. आता हा शेवटचा प्रहर राहिला आहे. तू आता आलीस तरी त्या सगळ्याला अर्थ प्राप्त होईल. माझे वाट पाहणे व्यर्थ ठरणार नाही, तू येच –
मधुरात्र मंथर देखणी,
आली तशी गेली सुनी…
हा प्रहर अंतिम राहिला,
त्या अर्थ तू देशील का?

तुझ्या प्रतारणेचा माझ्या प्रेमावर काहीच परिणाम झालेला नाही. अजून माझे प्रेम तर आहे तसेच आहे आणि तुझ्या प्रीतीचे गीत मी अजून गुणगुणतोच आहे. ‘तू त्याचा सूर होशील ना? येशील ना?’ अशी त्याची आर्त
विनवणी आहे-
हृदयात आहे प्रीत अन्
ओठांत आहे गीतही…
ते प्रेमगाणे छेडणारा,
सूर तू होशील का?

मी ज्या सुखाची इच्छा केली ते मला मिळाले आहे. माझ्या जीवनात तू सोडून सगळे व्यवस्थित आहे. मात्र जर तूच नसशील, तर त्या सगळ्याला काहीच अर्थ नाही. तुझी उणीव इतर सर्व सुखांना व्यर्थ ठरवते आहे. तू येशील तरच माझे जीवन पूर्ण होईल. सखी अजून तरी ये ना –
जे जे हवे ते जीवनी,
ते सर्व आहे लाभले…
तरीही उरे काही उणे,
तू पूर्तता होशील का?
होशील का?

त्याची हाक किती उत्कट आहे, किती आतून आली आहे ते सांगताना तो म्हणतो, ‘आता तुझ्या प्रतीक्षेत मला मृत्यू जरी आला तरी मी त्याला क्षणभर थांबायला सांगेन. हे जग सोडून जाताना तुला निदान एकदा तरी भेटूनच जावे अशी माझी इच्छा आहे. मृत्यूही माझे ऐकून थोडा वेळ थांबेल, पण तू येशील ना? येच!
बोलावल्यावाचूनही,
मृत्यू जरी आला इथे,
थांबेल तो ही पलभरी…
पण सांग तू येशील का?
येशील का?

ही प्रेमातील उन्मादाची ही अवस्था म्हणजे उर्दूतील ‘जुनून’. प्रियेची किंवा प्रियकराची वाट पाहण्याबाबत ती अनेक हिंदी सिनेगीतातून व्यक्त झाली आहे. जाँ निसार अख्तर निर्माते असलेल्या ‘बहुबेगम’मध्ये असेच एक गाणे होते. गीतकार होते शायर-ए-आझम साहीर लुधियानवी आणि संगीत होते रोशन यांचे. रफीसाहेब आणि लतादीदींनी गायलेल्या त्या नितांत सुंदर गाण्याचे शब्द होते –
हम इंतज़ार करेंगे
तेरा क़यामततक
खुदा करे कि क़यामत हो,
और तू आए…

जगाच्या अंतापर्यंतही भेट झाली नाही तरी मी तुझी वाट पाहीन. पण परमेश्वराने दया करावी आणि असे व्हावे की मी तुझ्या उशिराबद्दल तुझी तक्रार करत असावे आणि अचानक तूच समोर यावास –
न देंगे हम तुझे इलज़ाम बेवफ़ाईका,
मगर गिला तो करेंगे तेरी जुदाईका…
तेरे खिलाफ़ शिकायत हो, और तू आए…
खुदा करे के कयामत हो, और तू आए…

मी तुला दोष देणार नाही. प्रेमाची रीत मी पाळेनच. उर्दूत ‘आलम-ए-रुखसत’ म्हणजे जगातून कायमचे निघून जाणे. मी जेव्हा जगाचा निरोप घेत असेन तेव्हा तरी काही चमत्कार व्हावा अन तू समोर यावेस –
ये ज़िंदगी तेरे कदमोंमें डाल जाएंगे,
तुझीको तेरी अमानत सम्भाल जाएंगे,
हमारा आलम-ए-रुखसत हो, और
तू आए…

ही प्रेमिकांच्या मनाची नेहमीची विचित्र उलघाल? बघा. एकीकडे तिच्यासाठी जीवन सोडून देण्याची तयारी आहे पण दुसरीकडे तिच्याच भेटीच्या आशेची ज्योत लुकलुकतेच आहे!
बुझी-बुझीसी नज़रमें तेरी तलाश लिये,
भटकते फिरते हैं हम,
आज अपनी लाश लिये,
यही ज़ुनून, यही वहशत हो,
और तू आए…

मी तुझ्या शोधात जणू स्वत:चे प्रेत घेऊनच फिरतो आहे. मनात एक भयकारी जिद्द आहे. ती तशीच रहावी आणि शेवटी तरी तुझी भेट व्हावी! परंतु भेट काही होत नाही. प्रेमाची परीक्षा
सुरूच राहते तसतसा प्रेमाचा निखारा अजूनच
पेटू लागतो –
ये इंतज़ार भी एक इम्तिहां होता है
इसीसे इश्क़का शोला जवां होता है
ये इंतज़ार सलामत हो, और तू आये…

तो म्हणतो, ‘मी डोळ्यांत तुझ्या भेटीच्या आशेचे दिवे लागून वाट पाहत असावे. माझी प्रार्थना ईश्वराने ऐकावी आणि तू प्रकटावेस!’
बिछाए शौक़से, ख़ुद बेवफ़ाकी राहोंमें,
खड़े हैं दीपकी हसरत लिए निगाहोंमें,
क़बूल-ए-दिलकी इबादत हो,
और तू आए…

जुन्या काळी प्रेमाची व्याख्याच वेगळी होती. प्रेम म्हणजे स्वत:ला कुणाला तरी समर्पित करणे, ‘देवून टाकणे’, आयुष्यभरच्या साथीची खात्री देणे, ७ जन्माच्या सोबतीचे वचन देणे अशी होती. तेव्हा कोणतीच नाती, प्रेमाचे संबंध हल्लीसारखे ‘ब्रेकेबल’ ‘निगोशिएबल’ नव्हते. तसेही जे माणसाच्या मनात असते तेच त्याच्या साहित्यात, कलाकृतीत उतरते! ती मानसिकता बदलली, तर साहित्यही बदलते.

म्हणून जोवर माणसाच्या मनात प्रेम निर्माण करणारी देवाची यंत्रणा शाबूत आहे, कार्यरत आहे तोवर प्रेमिकांच्या अशा भेटी, त्यानंतरचे असे वेदनादायी विरह आणि पुनर्भेटीची अमर प्रतीक्षा सुरूच राहणार!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -