Saturday, May 18, 2024
Homeसाप्ताहिककिलबिल'निसर्गाची शाळा' कविता आणि काव्यकोडी

‘निसर्गाची शाळा’ कविता आणि काव्यकोडी

  • कविता : एकनाथ आव्हाड

निसर्गाची शाळा

फाल्गुन ,चैत्रात
फुलून येतो वसंत
पानापानांत चैतन्य
नसे सृष्टीला उसंत

वैशाख, ज्येष्ठात
ग्रीष्माचा तडाखा
त्यातही गुलमोहर
हसतो सारखा

आषाढ, श्रावणात
पावसाच्या सरी
शेत डोलते झोकात
सुख येते घरोघरी

भाद्रपद, आश्विनात
शरदाचे चांदणे
शोभिवंत आकाश
गाई सुरेल तराणे

कार्तिक, मार्गशीर्षात
हेमंताचा गारवा
हुरडा, शेकोटीला चला
सांगे अवखळ पारवा

पौष, माघात
शिशिराचे आगमन
पानगळीनंतर झाडाचे
उमलते पान पान

प्रत्येक ऋतूचा
आहे महिमा वेगळा
नाना रूपांतून भरे
इथे निसर्गाची शाळा

काव्यकोडी : एकनाथ आव्हाड

१) लाल आणि पांढरे
असे याचे दाणे
पोपटाचे हे फार
आवडीचे खाणे

माणसांसाठी नेहमीच
उपयोगी ठरलेले
माणकांसारख्या दाण्यांनी
कोण आतून भरलेले?

२) बळकट पाय त्याचे
त्याला शोभून दिसे
खूप खूप वेगाने
तो धावत असे

पंख असूनही नाही
उडत आकाशी
आकाराने सर्वांत मोठा
हा कोणता पक्षी?

३) जेव्हा फिरतो गरगर
घर करतो गार
आळशासारखा बसतो तेव्हा
घाम फुटतो फार

तीन पाय असूनही
पळत जेव्हा नाही
खडखड बोलून कोण
लक्ष वेधून घेई?

उत्तरे :- 

१) डाळिंब

२) शहामृग

३) पंखा 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -