Home टॉप स्टोरी सिन्हा यांचा भाजपवर पुन्हा हल्लाबोल

सिन्हा यांचा भाजपवर पुन्हा हल्लाबोल

0

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांचे नोटाबंदीनंतर आता जीएसटीवरुन मोदी सरकारवर हल्ले सुरुच आहेत.

नवी दिल्ली- भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांचे नोटाबंदीनंतर आता जीएसटीवरुन मोदी सरकारवर हल्ले सुरुच आहेत. नोटाबंदीच्या परिणामांची शहानिशा न करताच जीएसटी लागू करण्याची घाई केली, असा हल्लाबोल यशवंत सिन्हा यांनी गुरुवारी केला. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत आपण आपल्या म्हणण्यावर ठाम असल्याचे यशवंत सिन्हा यांनी सांगितले.

अर्थव्यवस्था कमकुवत झाली आहे यामध्ये काही दुमत नाही. आम्ही नेहमी युपीएला जबाबदार धरत होतो. मात्र आता जेव्हा सत्तेत येऊन ४० महिने झाले आहेत, त्यानंतरही आधीच्या सरकारला जबाबदार धरले जाऊ शकत नाही’, असे ते म्हणाले.

त्याआधी कालच सिन्हा यांनी नोटाबंदी म्हणजे मंदीच्या आगीत तेल ओतण्यासारखे असल्याचे सांगत मोदी सरकारला खडे बोल सुनावले होते. तसेच अरुण जेटली हे ‘सुपरमॅन’ आहेत, असे समजून वित्त मंत्रालयासह चार मोठ्या खात्यांचा कार्यभार त्यांच्याकडे देण्यात आला. परंतु कामाच्या प्रचंड बोजामुळे जेटली वित्त मंत्रालयास न्याय देऊ न शकल्याने त्यांनी देशाची अर्थव्यवस्था खड्ड्यात घातली, अशी सडेतोड टीका सिन्हा यांनी केली होती.

माजी केंद्रीय वित्तमंत्री राहिलेले सिन्हा पंतप्रधान मोदींच्या राजवटीत अडगळीत गेले आहेत. ‘इंडियन एक्स्प्रेस’ या इंग्रजी दैनिकात, ‘आता मला बोलायलाच हवे,’ या शीर्षकाने लेख लिहून सिन्हा यांनी अर्थव्यवस्थेची सद्य:स्थिती व ही अवस्था का आली, यावर परखड भाष्य केले आहे.

अगोदरच्या सरकारला आपण दोष देऊ शकत नाही, कारण आपल्याला पुरेपूर संधी मिळाली आहे, असे त्यांनी या लेखात म्हटले आहे. अर्थव्यवस्था कमकुवत असताना नोटाबंदीचा निर्णय घेण्याची काही गरज नव्हती. अजून नोटाबंदीचे परिणाम समोर आले नसताना घाईघाईने जीएसटी लागू करणे हा दुसरा धक्का होता, अशी टीका सिन्हा यांनी केली आहे.

आधी नोटाबंदी केली. त्यातून सावरत नाही तोच जीएसटी लागू करण्याची घाई केली. सरकार एकापाठोपाठ एक असे झटके देत आहे, ज्यामुळे अर्थव्यवस्था कमकुवत झाली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून तर विकासदर सातत्याने घटत आहे, असे सिन्हा म्हणाले.

मी जीएसटीचा समर्थक होतो. परंतू केंद्र सरकारला घाई लागली होती, त्यामुळे त्यांना जुलैमध्येच अंमलबजावणी करायची होती. पण आता जीएसटी अपयशी ठरत आहे’, अशी टीका यशवंत सिन्हा यांनी केली. तुम्ही काँग्रेसचे अर्थमंत्री सोडलेत, तर सातवेळा अर्थसंकल्प मांडणार मी एकमेव आहे. आज देशातील जनतेला रोजगार हवा आहे, पण ज्या कोणाला विचारावे तो म्हणतो रोजगार उपलब्ध नाही, असेही यशवंत सिन्हा म्हणाले.

जर एक जुलैऐवजी एक ऑक्टोबरपासून जीएसटी लागू केला असता, तर कोणते आभाळ कोसळले असते? असा प्रश्नही त्यांनी सरकारला विचारला आहे. मुळात नोटाबंदीच्या झटक्यातून सावरण्यासाठी वेळ मिळाला असता तर त्यामुळे जीएसटीचा ताण तितकासा जाणवला नसता, असेही सिन्हा यांनी या लेखात नमूद केले आहे.

इतकेच नाही तर मी जीएसटीची रचना आणि टॅक्स दर याबाबत बोलतच नाही, असेही सिन्हा म्हणाले असून त्यांनी एका अर्थी विरोधकांच्या म्हणण्याला दुजोराच दिला आहे. यापूर्वी राहुल गांधी यांनी जीएसटीच्या टॅक्स दरावरुन सरकारवर टीका केली होती.

निवडणूक प्रचारात थापा पचतात. पण एका रात्रीत अर्थव्यवस्थेला उभारी येईल, अशी जादुची कांडी कोणाकडेही नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपर्यंत अर्थव्यवस्था बाळसे धरू शकत नाही. अत्यंत कडवट भाषेत समारोप करताना सिन्हा लिहितात, की आपण गरिबी फार जवळून पाहिली, असे पंतप्रधान सांगतात. त्यांच्याप्रमाणेच सर्व भारतीयांनाही गरिबीचे चटके बसावेत, यासाठी त्यांचे वित्तमंत्री (जेटली) जिवाचे रान करीत आहेत!

यशवंत सिन्हा यांच्या वक्तव्याला शत्रुघ्न सिन्हा यांचा पाठिंबा

दरम्यान, यशवंत सिन्हा यांच्या या वक्तव्याला आता भाजपमधूनच पाठिंबा मिळू लागल्याने पक्षाची चांगलीच अडचण होण्याची शक्यता आहे. यशवंत सिन्हा यांचे वक्तव्य हे अत्यंत योग्य असल्याची प्रतिक्रिया भाजपचे नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी दिली आहे.

देशाच्या आर्थिक स्थितीचे यशवंत सिन्हा यांनी योग्य वर्णन केले आहे आणि यातून देशाचे कारभारी काही धडा घेतील अशी अपेक्षाही शुत्रघ्न सिन्हा यांनी व्यक्त केली आहे.

नरेंद्र मोदींनी पक्षापेक्षा राष्ट्र महत्वाचे आहे असे वक्तव्य केले होते. त्याच अर्थाने यशवंत सिन्हा यांच्या वक्तव्याकडे बघितले जाईल अशी अपेक्षाही शत्रुघ्न सिन्हा यांनी व्यक्त केली आहे.

नोटाबंदी आणि जीएसटी या दोन्ही निर्णयामुळे आधीच टीकेचे धनी झालेले मोदी सरकार यामुळे चांगलेच अडचणीत आले आहे. यशवंत सिन्हांच्या टीकेवर प्रश्नांचा भडीमार झाल्याने राजनाथसिंह आणि रविशंकर प्रसाद यांची बुधवारी भंभेरी उडाली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version