Home महामुंबई शिवसेनेचे महापौरपदाचे उमेदवार महाडेश्वर अडचणीत

शिवसेनेचे महापौरपदाचे उमेदवार महाडेश्वर अडचणीत

0

मुंबई महापौरपदासाठी शिवसेनेच्या वतीने उमेदवारी अर्ज भरलेले विश्वनाथ महाडेश्वर अडचणीत आले आहेत. 

मुंबई- मुंबई महापौरपदासाठी शिवसेनेच्या वतीने उमेदवारी अर्ज भरलेले विश्वनाथ महाडेश्वर अडचणीत आले आहेत. महाडेश्वर यांनी नियबाह्य पद्धतीने दुस-याचे घर हडप केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून त्याचा निकाल लागेपर्यंत महाडेश्वर यांना महापौरपदाची निवडणूक लढवण्यास मनाई करावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीत विश्वनाथ महाडेश्वर प्रभाग क्र. ८७ येथून निवडून आले आहेत. याच प्रभागातील साईप्रसाद गृहनिर्माण संस्था या इमारतीत ते राहतात. महाडेश्वर यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार महेंद्र पवार यांनी महाडेश्वर यांच्या निवडीला आक्षेप घेतला आहे. महाडेश्वर यांनी गजानन पंडित यांचे घर बेकायदा बळकावल्याचा त्यांनी आरोप केला आहे.

महाडेश्वर यांनी मात्र आपण हे घर लाटलेले नाही, तर त्या घरात आपण भाडयाने राहात असल्याचे सांगितले आहे. घर मालक पंडित यांनी मात्र म्हाडेश्वर यांचा दावा फेटाळून लावला आहे. पंडित म्हणाले की, माझी पत्नी आजारी असताना मी महाडेश्वर यांच्याकडून पावणेचार लाख रुपये उसणे घेतले होते. त्या पैशांतच त्यांनी माझे घर बळकावले आहे. महाडेश्वर जर भाडयाने त्या घरात राहतो, असे म्हणत असतील तर त्यांनी भाडयाने राहात असल्याबाबतचा पुरावा द्यावा, असेही पंडित म्हणाले.

अपक्ष उमेदवार महेंद्र पवार यांनी विश्वनाथ महाडेश्वर यांच्याविरोधात तक्रारही दाखल केली होती. उच्च न्यायालयाने हे प्रकरण लघुवाद न्यायालयात दाखल करण्यास सांगितले असून, तिथे येत्या २३ तारखेला सुनावणीस येणार आहे. किमान तोपर्यंत तरी महाडेश्वरांना महापौरपदाची निवडणूक लढवू देऊ नये, अशी मागणी महेंद्र पवार केली आहे.

दरम्यान याबाबत महाडेश्वर यांनीही स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप चुकीचा आहे. निवडणूक आयोगाला शपथपत्रात याबाबत सर्व माहिती दिली आहे. ‘मी आता ज्या घरात राहतो आहे, ते घर माझं स्वत:चं नाही,’ असं शपथपत्रात स्पष्ट लिहिलं आहे, असेही विश्वनाथ महाडेश्वर म्हणाले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version