Home टॉप स्टोरी महापौर शिवसेनेचा, गजर मोदीचा

महापौर शिवसेनेचा, गजर मोदीचा

0

महापौरपदी शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर निवडून आले, तरी भाजपाच्या सदस्यांनी नरेंद्र मोदींच्या जय घोषाने सभागृह दणाणून सोडले. 

मुंबई- मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीतून भाजपाने माघार घेतल्यामुळे शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर यांची तर उपमहापौरपदी हेमांगी वरळीकर यांची निवड झाली. भाजपाच्या सदस्यांनी शिवसेनेच्या उमेदवारला मतदान केल्याने महाडेश्वर यांना १७१ मते मिळाली. तर काँग्रेसचे उमेदवार विठ्ठल लोहकरे यांना केवळ ३१ मते मिळाली.

महापौरपदी शिवसेनेचा उमेदवार निवडून आला, तरी भाजपाच्या सदस्यांनी नरेंद्र मोदींच्या जय घोषाने संपूर्ण सभागृह दणाणून सोडले. त्यामुळे महापौर शिवसेनेचे आणि आवाज भाजपाचा अशी परिस्थिती महापालिकेत पहायला मिळाली.

मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपाने एकमेकांच्या विरोधात रान उठविले होते. एकमेकांवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. भाजपाने महापौरपदाची निवडणूक लढविण्यासाठी फोडाफोडीही करून पाहिली. त्यामुळे महापौर कुणाचा होणार याबाबत कमालीची उत्सुकता ताणली गेली होती. अखेर महापौरपदासाठी आवश्यक असणारे संख्या बळ जुळविण्यात यश येणार नाही, असे दिसताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापौरपदाच्या निवडणुकीतून भाजपा माघार घेत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे शिवसेनेचा महापौर होणार हे निश्चित झाले होते. आज महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाने शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान केले. तर राष्ट्रवादी काँग्रेस, सपा, एमआयएमचे नगरसेवक तटस्थ राहिले. मनसेचे नगरसेवक गैरहजर होते.

महापौर म्हणून महाडेश्वर यांची निवड जाहीर होताच भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी कमळाच्या फुलांचा हार घालून नवनिर्वाचित महापौरांचे अभिनंदन केले. त्यानंतर भाजपाच्या सदस्यांनी आपलाच महापौर निवडून आल्याच्या थाटात ‘नरेंद्र मोदी जिंदाबाद’ ‘मोदी मोदी मोदी’ अशा घोषणांनी सभागृह दणाणून सोडले. त्यामुळे महापौर शिवसेनेचा आणि गजर मोदींचा अशी परिस्थिती पहायला मिळाली. महापौर पदाच्या निवडणुकीतून पळ काढावा लागल्याचे अपयश झाकण्यासाठीच भाजपाने शिवसेनेपेक्षा मोठा आवाज केला असल्याची चर्चा महापालिका परिसरात ऐकायला मिळत होती.

दरम्यान उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या हेमांगी वरळीकर या विजयी झाल्या. त्यांना एकूण १६५ मते मिळाली, तर ५ मते बाद ठरली. त्यांनी काँग्रेसच्या उपमहापौरपदाच्या उमेदवार विन्नी डिजूझा यांचा पराभव केला.

उद्धव ठाकरे यांचा भाजपाला टोला!

मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर विजयी झाल्याची घोषणा झाल्यानंतर शिवसेनेच्या वतीने मोठा विजय उत्सव साजरा केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांचे आभार मानताना भाजपाला टोला लगावला. सत्ता, संपत्तीचा वापर करून शिवसेनेला हरविण्याचा प्रयत्न झाला. परंतु शिवसैनिक आणि मुंबईकरांनी त्यांना त्यांची जागा दाखविली, अशा शब्दात त्यांनी भाजपाला फटकारले.

[EPSB]

शिवसेनेचे महापौरपदाचे उमेदवार महाडेश्वर अडचणीत »

मुंबई महापौरपदासाठी शिवसेनेच्या वतीने उमेदवारी अर्ज भरलेले विश्वनाथ महाडेश्वर अडचणीत आले आहेत. … [/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version