Home टॉप स्टोरी महाराष्ट्राचे तुकडे करण्याची भाषा सहन करणार नाही!

महाराष्ट्राचे तुकडे करण्याची भाषा सहन करणार नाही!

0

राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार आल्यापासून स्वतंत्र विदर्भाचा विषय जिवंत करण्यात आला आहे. 

मुंबई- राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार आल्यापासून स्वतंत्र विदर्भाचा विषय जिवंत करण्यात आला आहे. इथे अखंड महाराष्ट्राचे मंत्री म्हणून अधिकार भोगायचे आणि दुसरीकडे महाराष्ट्र तोडायची भाषा करायची हे चालणार नाही. ज्यांना वेगळया विदर्भाची भूमिका घ्यायची असेल त्यांनी अगोदर मंत्रीपदाचे राजीनामे द्यावेत, असा खणखणीत आवाज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी विधान परिषदेत गुरुवारी सरकारला दिला.

महाराष्ट्र आमची अस्मिता, स्वाभिमान आणि जीवनमान आहे. त्याचे तुकडे करण्याची भाषा सहन केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. महाराष्ट्रातून विदर्भ वेगळा करून स्वतंत्र राज्य करावे, अशा प्रकारचे एक लाख ईमेल केंद्र सरकारला पाठविण्यात आले आहेत. या विषयावर चर्चा व्हावी यासाठी काँग्रेसचे सदस्य शरद रणपिसे यांनी नियम २८९ अन्वये प्रस्ताव दिला होता. त्यावर बोलताना नारायण राणे म्हणाले की, अखंड महाराष्ट्र ही आमची अस्मिता आहे.

१०५ हुतात्म्यांनी बलिदान दिल्यानंतर हा महाराष्ट्र आम्हाला मिळालेला आहे. परंतु राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार आल्यापासून वेगळया विदर्भाचा विषय जाणीवपूर्वक जिवंत केला जात आहे.

सत्तेवर आलेले सरकार अखंड महाराष्ट्राचे आहे. या सरकारकडून अखंड राज्याच्या हिताचे संरक्षण होण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. मात्र सरकारमधीलच काही लोक महाराष्ट्र तोडण्याची भाषा करीत आहेत. हे घटनाबाह्य आहे. राज्यातील जनतेने तुम्हाला सत्तेवर बसविले आहे. तुम्हाला विदर्भाचा काय विकास करायचा असेल तो खुशाल करावा, त्याला कुणीही आक्षेप घेणार नाही. परंतु सत्तेवरही राहायचे आणि महाराष्ट्र तोडायची भाषा करायची, हे योग्य नाही.

ज्यांना अशी भाषा करायची असेल त्यांनी अगोदर मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. यानिमित्ताने एकच सांगतो, महाराष्ट्र आमची अस्मिता आहे, अभिमान आहे आणि जीवनमान आहे. महाराष्ट्र तोडण्याची भाषा कोणी करीत असेल तर ती सहन केली जाणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र अखंड राहावा, ही श्रींची इच्छा आहे, असेही राणे यांनी ठणकावून सांगितले. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, भाई जगताप, शरद रणपिसे यांनीही या विषयावर आपली मते मांडली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version