Home महाराष्ट्र कोकण मेवा कडक उन्हातही पावले रेंगाळतात वाळूत

कडक उन्हातही पावले रेंगाळतात वाळूत

0

गोवा या पर्यटन राज्याच्या तुलनेत सिंधुदुर्ग पर्यटनाच्या बाबतीत तसूभर अधिकच सरस असल्याने देशीविदेशी पर्यटक आता सिंधुदुर्गात वस्ती करताना दिसत आहेत. परीक्षांचा कालावधी संपल्याने आता पर्यटकांचा कोकणात येण्याचा ओढा वाढू लागला आहे. 

वेंगुर्ले- गोवा या पर्यटन राज्याच्या तुलनेत सिंधुदुर्ग पर्यटनाच्या बाबतीत तसूभर अधिकच सरस असल्याने देशीविदेशी पर्यटक आता सिंधुदुर्गात वस्ती करताना दिसत आहेत. परीक्षांचा कालावधी संपल्याने आता पर्यटकांचा कोकणात येण्याचा ओढा वाढू लागला आहे. सिंधुदुर्गातील बाजारपेठांमध्ये तसेच पर्यटन स्थळांकडे पर्यटकांची गर्दी दिसू लागली असून सर्वात जास्त पसंती पर्यटक समुद्रकिना-यांना देत असल्याचे चित्र दिसत आहे. सकाळी व सायंकाळी या दोन सत्रात समुद्रकिना-यावर पर्यटक समुद्रस्नानाचा आनंद लुटताना दिसत असून समुद्राच्या फेसाळणा-या लाटा पर्यटकांना भुरळ घालत आहेत. यामध्ये विदेशी पर्यटकही कमी नाहीत.

एप्रिल, मे हे दोन महिने कोकणात पर्यटकांनी फुलून जातात. मुंबईसह राज्यातील अन्य भागातील पर्यटक तसेच परदेशी पर्यटकही मोठया संख्येने कोकणातील नैसर्गिक सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटन सफरीवर येतात. सिंधुदुर्गातील गड, किल्ले यामध्ये सिंधुदुर्ग किल्ला, विजयदुर्ग किल्ला, यशवंत गड त्याचप्रमाणे धार्मिक स्थळे व पर्यटनस्थळे यांना पसंती असते.

मुलांच्या परीक्षा संपल्यावर पर्यटन म्हणून कुठे जायचे याचे नियोजन प्रत्येक घरात सुरू होते. बहुतांशी पर्यटक हे फिरण्यासाठी कोकणाचीच निवड करतात. कारण या कालावधीत आंबे, फणस, करवंदे, जांभूळ यावर ताव मारायला मिळतो. या अस्सल कोकणी मेवा मिळविण्यासाठी कोकणातून यावे लागेल. या भागात फिरताना व कोकणी मेव्याचा आनंद घेत असतानाच निळ्याशार समुद्र किना-यावर फेसाळणा-या लाटावर सवार होण्याचा मोह आवरत नाही.

कोकणातील किना-यांवर फिरायला येणारे पर्यटक समुद्रात आंघोळ केल्यावाचून मागे परतत नाहीत. रुपेरी वाळूत व सुरूंच्या बनात फिरताना पर्यटकांना वेगळा अनुभव येथे अनुभवता येतो. पर्यटकांचा ओढा आता मोठया प्रमाणात कोकणाकडे वळू लागला असून प्रत्येक ठिकाणी आता पर्यटकांची गर्दी दिसू लागली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हयाच्या निसर्ग सौंदर्याची चर्चा आता सर्वदूर पसरली असल्याने वेंगुर्लेतील पर्यटन हंगामालाही यावर्षी सोनेरी झळाळी लाभेल अशी शक्यता आहे. त्याची कल्पना आत्तापासूनच येणा-या पर्यटकांमुळे येऊ लागली आहे. फेसाळणारा गर्दनिळा, विस्तीर्ण समुद्र, चंदेरी वाळूच्या, माडा-सुरुच्या बनांनी नटलेल्या किनारपट्टया, नद्या, खाडया आणि डोंगरकपारीतून निसर्गसौंदर्याची मुक्त उधळण करणारी सृष्टी यामुळे वेंगुर्लेसह जिल्हयात हजारो पर्यटक भेट देऊ लागले आहेत. येथील आदरातिथ्याने तृप्त झालेल्या असंख्य पर्यटकांना या भागात पर्यटन सफरीवर आपल्यासह मित्रपरिवाराला घेऊन येण्यास नक्कीच आवडते. या भागातील पर्यटन स्थळांची व समुद्रकिना-यांची त्यामुळेच देशपातळीवर चर्चा आहे. अशा कारणांमुळेच मोठया संख्येने यावर्षी पर्यटकांची संख्या वाढेल, यात शंका नाही. गोव्यातील अनेक विदेशी पर्यटकही आता वेंगुर्लेत दिसू लागल्याने वेंगुर्लेतही आता पर्यटन विकासाची पहाट होऊ लागल्याचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे.

पूर्वी पर्यटनदृष्टया फार प्रकाशझोतात नसलेल्या वेंगुर्लेत अलीकडच्या काळात मात्र पर्यटकांची गर्दी मोठया प्रमाणात दिसून येते. भौगोलिकदृष्टया परिपूर्ण असलेल्या वेंगुर्लेत सर्वाधिक समुद्रकिनारपट्टया आहेत. विविध ठिकाणी लहान-मोठया नदी, नाले, तलाव, धरणेही आहेत. लहानमोठया हिरव्यागर्द डोंगरांमुळे वेंगुर्लेच्या सौंदर्याला अधिकच बहर आलेला आढळतो. वेंगुर्ले तालुका पर्यटनाच्या दृष्टीने आज ब-यापैकी विकसित होताना दिसतोय. जगाच्या नकाशावर इतिहासाची साक्ष देणारा महत्त्वाचा दुवा म्हणूनही वेंगुर्लेची ओळख आहे.

वेंगुर्लेत रेडी, शिरोडा-वेळागर, आरवली, मोचेमाड, मूठ, नवाबाग, वायंगणी, कोंडुरा, हरिचरणगिरी, कालवीबंदर, खवणे, निवती, कोचरे, किल्ले निवती, भोगवे आदी किनारपट्टया असून या सर्वच किनारपट्टया पर्यटकांनी गजबजल्या आहेत. रेडी येथील स्वयंभू द्विभुज गणपतीला तर असंख्य पर्यटक तथा भाविकांची गर्दी होते. रेडीतील ऐतिहासिक यशवंत गड, माऊली मंदिर, समुद्र किनारपट्टी व खाण उद्योग ही ठिकाणे देखील पर्यटकांना आकर्षित करत आहेत. गोव्यातील तेरेखोल हे गाव रेडीलाच लागूनअसल्याने गोव्यात येणारे असंख्य विदेशी पर्यटक रेडीच्या समुद्र किना-यावर गर्दी करू लागले आहेत.

गोव्यातून अनेक विदेशी पर्यटक चांगली सोय व सुविधा यासाठी वेंगुर्लेत येणे पसंत करू लागले आहेत. शिरोडा-वेळागर येथे आता पर्यटकांची ब-यापैकी वर्दळ होऊ लागल्याने या किना-यावर अनेक बीच रिसॉर्टची निर्मिती झाली आहे. स्वच्छ व विस्तीर्ण अशी समुद्र किनारपट्टी वेंगुर्लेला लाभली असल्याने अनेक पर्यटकांना वेंगुर्लेचा हा समुद्र मोहित करू लागला आहे.

आत्तापर्यंत वेंगुर्लेच्या या सृष्टीसौंदर्याकडे कुणाचे फारसे लक्ष गेले नव्हते. मात्र नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा घोषित केल्यानंतर हळूहळू वेंगुर्लेकडे अनेकांच्या नजरा वळू लागल्या. आपलं नैसर्गिकपण अद्यापही टिकवून असलेल्या वेंगुल्र्यात पर्यटकांना आवश्यक असलेल्या अन्य भौतिक सुविधाही आता उपलब्ध हात असल्याने अनेक पर्यटक वेंगुर्लेत यऊ लागले आहेल. काही महिन्यापूर्वी पर्यटकांना राहण्यासाठी तारांकित व्यवस्था वेंगुल्र्यात नव्हती. मात्र ही उणीव आता पूर्णपणे दूर झाली आहे. एकूणच पर्यटनदृष्टया वेंगुर्ले आता स्वयंपूर्ण होऊ लागले असल्याने यावर्षी पर्यटनाचा हंगाम हाऊसफुल्ल राहील, अशी चिन्हे आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version