Home टॉप स्टोरी उरण नौदल परिसरात ५ संशयित अतिरेकी

उरण नौदल परिसरात ५ संशयित अतिरेकी

0

उरण येथे चार ते पाच शस्त्रधारी संशयितांना पाहिल्याचा दावा दोन शाळकरी मुलांनी आणि काही नागरिकांनी केला आहे.

उरण- उरण शहर परिसरात गुरुवारी सकाळी लष्करी गणवेशातील चार संशयित सशस्त्र अतिरेक्यांना पाहिल्याची खबर शाळकरी मुलांनी दिल्यानंतर पोलीस, एनएसजी, फोर्स वन, नौदलाचे मार्कोस कमांडो पथक, वायुदल आणि सुरक्षा यंत्रणांनी दिवसभर मोठी शोध मोहीम हाती घेतली होती.

मात्र रात्री उशिरापर्यंत या चार अतिरेक्यांचा ठावठिकाणा लागला नव्हता. उरण परिसरातील नौदल तळ, ओएनजीसी, जेएनपीटी आदी महत्त्वाची ठिकाणे लक्षात घेऊन हायअ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईसह कोकणपट्टयातील सागर किना-यांवरही अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असून नौदल आणि सीमा सुरक्षा दलांच्या पथकांना सतर्क करण्यात आले आहे.

पाकिस्तानी अतिरेक्यांनी नुकताच उरी येथे केलेला हल्ला, त्यानंतर भारताचा प्रत्युत्तराचा इशारा, उभय देशांमधील वाढता तणाव, दहशतवादी हल्ल्याची शक्यता या पार्श्वभूमीवर देशातील सर्व सुरक्षा यंत्रणांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साडेसहाच्या सुमारास उरण एज्युकेशन सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ या अनोळखी व्यक्ती रेंगाळत होत्या. कुंभारवाडा रोडकडून शाळेकडे येणा-या एका दहावीतील विद्यार्थिनीने, ‘अपना प्रथम टारगेट ओएनजीसी सेकंड टारगेट स्कूल’ असे त्यांचे संभाषण ऐकले.

भयभीत झालेल्या या मुलीने तत्काळ शाळेतील शिक्षकांना या व्यक्तींची माहिती दिली. या व्यक्तींसाठी शोधाशोध सुरू झाली. मात्र तोपर्यंत या व्यक्ती गायब झाल्या होत्या. अकरावीच्या काही विद्यार्थ्यांनीही, उरण मोरा रस्त्यावरून बोरी नाक्याजवळ डोंगराकडे काही संशयित व्यक्ती जाताना दिसल्याचे सांगितल्यावर, हे प्रकरण गांभीर्याने घेत उरण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र भानुशाली यांनी तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली. यानंतर नवी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी उरण एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत जाऊन विद्यार्थ्यांकडून याबाबतची माहिती घेतली.

प्रारंभी हे मॉक ड्रील असल्याची शक्यताही व्यक्त होत होती. मात्र त्याला कुठल्याही यंत्रणेने दुजोरा दिला नाही. शाळेतील एका विद्यार्थ्यांने एक अनोळखी व्यक्ती तर, अन्य विद्यार्थ्यांनी चार अनोळखी संशयित व्यक्ती पाहिल्याचे सांगितल्यावर हे प्रकरण गंभीरपणे घेत शोधसत्र सुरू झाले.

हे अतिरेकी समुद्री मार्गाने आले असल्याची शक्यता लक्षात घेत किनारी भागातही कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवाय मच्छीमार आणि स्थानिकांना संशयास्पद हालचाली दिसल्यास तातडीने पोलिसांना माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नौदलाच्या हेलिकॉप्टरद्वारे संपूर्ण उरण परिसरात पाहणी सुरू असून या संशयास्पद इसमांचे गूढ कायम आहे.

उरणचे महत्त्व

उरण हा रायगड जिल्ह्यातील मुंबईपासून जवळ असलेला महत्त्वाचा विभाग असून याठिकाणी नौदलाचा तळ, ओएनजीसी अशी महत्त्वाची आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने संवेदनशील ठिकाणे आहेत. शिवाय जेएनपीटी हे महत्त्वाचे बंदरही येथून जवळ आहे. यामुळेच देशाच्या प्रमुख सुरक्षा यंत्रणा येथे दाखल होऊन समन्वयाने तपास करीत आहेत.

उरणमध्ये घबराट

या घटनेची माहिती उरण परिसरात वाऱ्यासारखी पसरल्यावर अनेक पालकांनी आपल्या मुलांना शाळेतून घरी सुखरूप आणण्यासाठी शाळा, कॉलेज परिसरात एकच गर्दी केली होती. अनेक शाळांनी वर्ग सोडून दिले.

व्हॉट्सअ‍ॅपवरून हे वृत्त सर्वदूर पसरल्यामुळे अन्य भागांतील मंडळीही, उरण परिसरातील नागरिक, नातेवाईक, मित्रांशी संपर्क साधत होते. उरण न्यायालय हे यूएसच्या शाळेजवळ येत असल्याने वकील, अशिलांनी गुरुवारी न्यायालयात जाणेही टाळले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version