Home टॉप स्टोरी अस्वस्थ नेत्यांची भेट

अस्वस्थ नेत्यांची भेट

0

भाजपला शह देण्यासाठी ‘मातोश्री’चा उंबरठा ओलांडून उद्धव ठाकरेंनी ‘सिल्व्हर ओक’च्या पाय-या झिजविल्या. त्याचवेळी त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचीही भेट घेऊन भाजपला खिजविण्याचा प्रयत्न केला.

मुंबई- शिवसेनेचे अस्वस्थ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी १० दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. खुद्द पवारांनीच या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यामुळे भाजपला शह देण्यासाठी आता शिवसेनेने नवी चाल खेळल्याचे बोलले जात आहे. राज्यातील सत्तेत राहायचे की नाही याबाबत उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांशी चर्चा केली, मात्र पवारांनी त्यांना, ‘आधी तुम्ही तुमचा निर्णय घ्या, नंतर आमची भूमिका जाहीर करू’ असे स्पष्ट केले.

दरम्यान, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांचा संभाव्य मंत्रिमंडळ प्रवेश, निर्णय घेताना विश्वासात घेतले जात नसल्याबद्दलची शिवसेना नेत्यांची खदखद, आदी कारणांमुळे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे अस्वस्थ असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच त्यांनी सत्तेत राहून अनेक दिवसांपासून सरकारविरोधात टीकेची राळ उठविली आहे. सरकारमधून बाहेर पडण्याचा तसेच आमचे मंत्री खिशात राजीनामे घेऊन फिरत असल्याचा वारंवार इशारा देऊनही शिवसेनेकडे सत्तेतून बाहेर पडण्याचे धाडस नाही. या पार्श्वभूमीवर अन्य पक्षांची साथ मिळवून काय करता येऊ शकते याची चाचपणी शिवसेनेचे नेतृत्व करीत आहे. त्याचाच भाग म्हणून उध्दव ठाकरे यांनी खा. संजय राऊत यांना सोबतीला घेत ‘मातोश्री’चा उंबरठा ओलांडून पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’च्या पाय-या झिजविल्या. त्याचवेळी त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचीही भेट घेऊन भाजपला खिजविण्याचा प्रयत्न केला.

उद्धव ठाकरे-शरद पवार भेटीच्या वृत्तामुळे राजकीय भूकंप होणार नसला तरी वातावरण ढवळून निघणार आहे. ‘मला असे वाटतेय की, सरकारमध्ये राहण्याची उद्धव यांची मानसिकता राहिलेली नाही’, असे अत्यंत सूचक वक्तव्य पवारांनी मंगळवारी अनौपचारिक चर्चेत केले. भाजपला दूर ठेवून पक्षवाढीसाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यामुळे ते सरकारमधून बाहेर पडतील, अशी शक्यताही पवार यांनी व्यक्त केली.

‘आम्ही सत्तेतून बाहेर पडल्यास राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय असणार?’ अशी विचारणाही उद्धव ठाकरेंनी पवारांकडे केली. त्यावेळी पवार म्हणाले की, ‘२०१४ मध्ये जेव्हा निवडणुका झाल्या त्यावेळी गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आम्ही पाठिंबा दिला होता. पण काही दिवसांपूर्वीच आम्ही जाहीर केले होते की, शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तरी आम्ही भाजपला पाठिंबा देणार नाही’ असे पवार यावेळी म्हणाले.

पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांमध्ये राजकारणातील सद्य परिस्थितीबद्दल चर्चा झाली. भाजप शिवसेनेवर कुरघोडी करण्याची एकही संधी गमावत नाही. काही दिवसांपूर्वीच उद्धव यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली होती. आतापर्यंत मातोश्रीवर अनेक राजकीय पक्षांचे नेते भेटीसाठी जात होते. मात्र, उद्धव यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची परंपरा मोडत ‘मातोश्री’ बाहेर विविध पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. तर, शिवसेनेच्या नेत्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची चर्चा सुरू असते. त्या पार्श्वभूमीवर उद्धव यांनी पवार यांची भेट घेतल्याचे समोर आल्याने चर्चेला उधाण आले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी सुमारे दीड-वर्षाचा कालावधी राहिला आहे. त्याच्या तयारीसाठी भेट झाली की मध्यावधी निवडणुकांसाठी भेट झाली यावरही चर्चा झडत आहेत.

नारायण राणेंचा मंत्रिमंडळ प्रवेश यावरून शिवसेनेने भाजपविरोधी धार वाढवली आहे. राणेंचा मंत्रिमंडळ प्रवेश होऊ नये यासाठी शिवसेनेने बरेच प्रयत्न केले होते. पण मुख्यमंत्री राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशावर ठाम आहेत. त्यामुळे आता शिवसेनेने थेट शरद पवारांची भेट घेऊन भाजपला धक्का देण्याची तयारी केली असली तरी सत्तेतून बाहेर पडण्याचे धाडस दाखविण्याची शक्यता कमी असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

उध्दव यांच्या अस्वस्थतेचे कारण..

भाजप हा विविध पातळ्यांवर शिवसेनेला कमजोर करत असल्याची शिवसेनेची भावना आहे. नारायण राणे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता वाढली आहे. राणे यांची मंत्रीमंडळात वर्णी लागली तर त्यांच्यासोबत शिवसेनेच्या मंत्र्यांना मंत्रिमंडळ बैठकीत बसावे लागेल. राणेंचा सत्तेत सहभाग झाला तर शिवसेनेची कोंडी करण्याचा भाजपच्या प्रयत्नांना बळ मिळेल. त्यामुळे राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाऊ नये यासाठी दबाव म्हणून ही उद्धव ठाकरे यांची खेळी असू शकते. शिवसेना सत्तेत राहूनही भाजपविरोधात आंदोलन करत आहे. ते भाजपला सहन होत नाही. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील दुरावा दिवसागणिक वाढत आहे.

दोन्ही नेते वैफल्यग्रस्त

शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांची भेट म्हणजे वैफल्यग्रस्त नेत्यांची भेट असल्याची टीका भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केली आहे. ते म्हणाले की, या दोन नेत्यांची भेटीत नेमक्या कोणत्या स्थितीची खातरजमा केली हे समजत नाही. या भेटीचा सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही. सरकारला कोणताही धोका नाही. फडणवीस सरकार आपला कार्यकाल निश्चितपणे पूर्ण करेल, असा विश्वासही भंडारी यांनी व्यक्त केला.

शिवसेना कमकुवत

आतापर्यंत शिवसेना पक्षप्रमुखांना भेटण्यासाठी विविध पक्षाचे नेते ‘मातोश्री’चा दरवाजा ठोठावत होते. मात्र उध्दव ठाकरे यांच्या कार्यकाळात शिवसेना कमकुवत झाल्याने पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. राज्यात आणि मुंबई भाजप वरचढ होऊ लागल्याने आणि शिवसेनेची डाळ शिजत नसल्याने सेनेचे नेते आणि पक्षप्रमुख अस्वस्थ आहेत. त्यामुळेच उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा उंबरठा ओलांडून भाजपविरोधकांच्या गाठीभेटी घेत आहेत. शरद पवार आणि ममता बॅनर्जीची भेट ही त्याची उदाहरणे आहेत.


शिवसेना एक नंबरचा घाबरट पक्ष

शिवसेना हा एक नंबरचा घाबरट पक्ष आहे. मी मंत्रिमंडळात प्रवेश केला तरी शिवसेना सत्ता सोडणार नाही, अशी खरमरीत टीका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांनी मंगळवारी केली. दरम्यान, पुढच्या काही दिवसांतच मंत्रिपदाची शपथ घेईन, असा विश्वासही त्यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केला. नोटाबंदीवरून सुरू असलेल्या आंदोलनावर टीका करताना नारायण राणेंनी काँग्रेसमध्ये आता आक्रमकता उरली नसल्याचा टोला लगावला. काँग्रेसने कितीही संघर्ष केला तरी गुजरातमध्ये भाजपाचाच विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हिंदुत्वाला तिलांजली?

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावर शिवसेनेला मोठे केले. याच मुद्यावर त्यांनी भाजपशी दोस्ताना केला. त्यांच्या पश्चात मात्र त्यांचे वारसदार हिंदुत्वाला तिलांजली देत असल्याचे चित्र आहे. ज्या पक्षांनी शिवसेनेला जातीयवादी म्हणून हिणवले त्याच राष्ट्रवादी आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेण्याचा सपाटा उध्दव यांनी लावला आहे. दुसरीकडे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचेही गुणगान शिवसेनेकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे विरोधक म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेण्याची शिवसेनेची रणनीती असू शकते. मात्र तसे झाले तर शिवसेनेने हिंदुत्वाला तिलांजली दिली असेच म्हणावे लागेल.


काय होऊ शकते?

उद्धव ठाकरे भाजप विरोधी मोट बांधली जाते का याची चाचपणी करीत असल्याची चर्चा?आहे.

भाजप विरोधकांना एकत्र करून सरकार स्थापन करायचे झाल्यास शिवसेना ६२, राष्ट्रवादी ४१ आणि काँग्रेस ४२ असे १४५ संख्याबळ होऊ शकते.

दुसरीकडे भाजपचे १२२, अपक्ष व इतर १६ आमदार एकत्र आले तरी भाजपला आणखी ७ आमदारांची गरज भासणार आहे.

मात्र महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांना काँग्रेस आणि शिवसेनेतील काही आमदारांची साथ असल्याने देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला कोणताही धोका संभवत नाही, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version