Home महामुंबई ठाणे ठाणे महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले!

ठाणे महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले!

0

ठाणे महापालिकेसह राज्यातील १० महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा बुधवारी दुपारी राज्याचे निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी केली. 

ठाणे- ठाणे महापालिकेसह राज्यातील १० महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा बुधवारी दुपारी राज्याचे निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी केली. त्यांच्या या घोषणेनंतर ठाण्यात अचारसंहिता लागू झाली आहे. ठाणे महापालिकेसाठी येत्या २१ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून २३ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांनी ख-या अर्थाने निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे.

ठाणे महापालिकेत सध्या एकूण १३० नगरसेवक असून मागील निवडणुकीत शिवसेनेचे सर्वाधिक ५४ नगरसेवक निवडून आले होते. दुस-या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ३४, नंतर काँग्रेसचे १८, भाजपा व मनसेचे प्रत्येकी ७, बसपाचे २, तर अपक्ष ८ नगरसेवक निवडून आले होते. यानंतर सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला भाजपा व अपक्षांची मदत घ्यावी लागली होती. मनसेनेही त्यावेळी शिवसेनेला पाठिंबा दिला होता.

मात्र त्यानंतरच्या काळात झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुका, त्यात भाजपाने राज्यात पटकावलेली मोठय़ा भावाची जागा, त्यातच शिवसेनेबद्दल असलेली नाराजी, कार्यकर्त्यांमधील गटबाजी, आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे आव्हान या सगळय़ात यंदा शिवसेनेचे पानीपत होण्याची शक्यता आहे.

यंदाची निवडणूक चार सदस्यीय पॅनेल पद्धतीने होणार असून अनेक प्रभागांचीही पुनर्रचना झाली आहे. त्यामुळे आधीच अनेकांनी इकडून तिकडे उडय़ा मारल्या असून आता ख-या अर्थाने उमेदवारांची पळवापळवी सुरू होणार आहे.

शिवसेना-भाजपाची अद्याप युती झालेली नसून ठाण्यापुरता वेगळा विचार झाल्यास ठाणेकरांना कलगीतु-याचा सामना बघयला मिळू शकतो. मात्र शेवटी हे दोन्ही पक्ष एकत्रच येणार असल्याने मतदार काँग्रेस-राष्ट्रवादीला पसंती देतील, याला सध्याचा फसलेला नोटबंदीचा निर्णय आणि त्यानंतर बदललेले वातावरण कारणीभूत ठरेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

युती झाल्यास बंडखोरीला उधाण

ठाणे महापालिकेत सध्या शिवसेना-भाजपा युतीची सत्ता असून यंदाच्या निवडणुकीत मात्र या पक्षांमध्ये अजूनही युती झालेली नाही. दुसरीकडे मुंबईत शिवसेना-भाजपाच्या नेत्यांची युतीसाठी बोलणी सुरू असली, तरी ठाण्यातील या दोन्ही पक्षांतील अनेक नेते यासाठी अनुकूल नसल्याचे समजते. त्यामुळे फक्त मुंबईत युती होणार आणि ठाण्यात दोन्ही पक्ष स्वतंत्र लढणार का? हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होऊ शकणार आहे.

या दोन पक्षांची येत्या निवडणुकीत युती होणार नाही, या बोलीवर दोन्ही पक्षांमध्ये अनेक प्रस्थापितांनी आणि इच्छुकांनी प्रवेश केला असून आता युती झाल्यास बंडखोरीला मोठय़ा प्रमाणात उधाण येणार आहे.

दोन्ही पक्षांची मते यात विभागली जाण्याची शक्यता असून यामुळे बंडखोरी शमवण्याचे प्रमुख आव्हान या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपापुढे असेल. तर युती न झाल्यास या दोन पक्षांमध्ये कडवी झुंज होईल, अशी शक्यता आहे.

असा असेल निवडणुकीचा कार्यक्रम

येत्या २७ जानेवारीपासून ३ फेब्रुवारीपर्यंत ठाणे महापालिका निवडणुकीचे उमेदवारी अर्ज सादर करता येणार असून ४ फेब्रुवारी रोजी अर्जाची छाननी होणार आहे.

७ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असून ८ फेब्रुवारी रोजी उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. याचवेळी मतदान केंद्रनिहाय मतदार यादीही प्रसिद्ध करण्यात येईल. यानंतर २१ फेब्रुवारी रोजी मतदान आणि २३ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version