Home महामुंबई ठाणे स्थानक परिसरातून फेरीवाल्यांचे पलायन

ठाणे स्थानक परिसरातून फेरीवाल्यांचे पलायन

0

ठाणे रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांची वाट अडवून दुकाने थाटणा-या फेरीवाल्यांनी अचानक पलायन केल्याचे शुक्रवारी पाहायला मिळाले.

ठाणे- ठाणे रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांची वाट अडवून दुकाने थाटणा-या फेरीवाल्यांनी अचानक पलायन केल्याचे शुक्रवारी पाहायला मिळाले. एलफिन्स्टन स्थानकामध्ये घडलेल्या चेंगराचेंगरीच्या प्रकारानंतर रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांना सर्वानी कोंडीसाठी जबाबदार धरले. त्यानंतर स्थानकाबाहेरील फेरीवाल्यांवर कारवाईसुद्धा करण्यात आली. राज ठाकरे यांनीही मुंबईतील मोर्चासमोर केलेल्या जाहीर वक्तव्यात फेरीवाल्यांना निर्वाणीचा इशारा दिला. त्याचा परिणाम म्हणून की काय स्थानक परिसरात शुक्रवारी तुलनेने शुकशुकाट दिसून आला होता.

एरव्ही फेरीवाल्यांमुळे गजबजलेली असणारी अनेक ठिकाणे फेरीवाले गायब झाल्यानंतर भकास दिसत होती. डोंबिवली, ठाणे यांसारख्या गर्दीच्या स्थानकांच्या आजूबाजूचा परिसर आणि पादचारी पूल हा फेरीवाल्यांनी वेढलेला असायचा. अरुंद जागा आणि त्यामध्ये फेरीवाल्यांचे बस्तान यामुळे गर्दीच्या वेळी प्रवाशांना होणारा नाहक त्रास तूर्तास टळला आहे. ठाणे स्थानकाच्या सॅटिसच्या पुलाखाली फेरीवाल्यांची वर्दळ असायची. पुस्तके, पाकीट, गजरा, सुगंधी द्रव्य अशा अनेक वस्तू विकणारे हे फेरीवाले अनेक वेळा त्याच ठिकाणी स्वत:च्या खाण्या-पिण्याची आणि स्वयंपाकाची सोयसुद्धा करतात.

त्यामुळे प्रवाशांना फक्त अरुंद जागेचाच नाही, तर घाणीचासुद्धा त्रास सहन करावा लागत होता. डोंबिवली स्थानकाच्या कल्याण दिशेकडील रेल्वे मार्गावरील पादचारी पुलाचा वापर नागरिकांकडून अधिक प्रमाणात होतो. अरुंद पूल आणि फेरीवाल्यांचे बस्तान यामुळे या पुलाचा वापर करणा-या नागरिकांना प्रचंड त्रास होतो. फेरीवाल्यांना हटविल्यामुळे प्रवासांना वाढीव जागा मिळाली आहे. हकालपट्टी केलेल्या फेरीवाल्यांची वापसी होऊ नये, यासाठी रेल्वे सुरक्षाबलाच्या अधिका-यामार्फत विशेष काळजी घेण्यात येत आहे. रेल्वे सुरक्षाबलाचे अधिकारी स्थानक परिसरात जागोजागी फेरफटका मारतानाचे चित्र सर्वच महत्त्वाच्या स्थानकांमध्ये दिसून येत असून गर्दीचा मुकाबला करण्यासाठी त्यांना कसरत करावी लागत आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version