Home संपादकीय अग्रलेख ..तरच बुवा-बाबांचे स्तोम कमी होईल

..तरच बुवा-बाबांचे स्तोम कमी होईल

0

संसार सागरात घुसमटणा-याला विचारांचा जीवनप्रकाश देणारा माणूस देवासमान वाटतो. म्हणूनच तो त्याला देवमाणूस किंवा बाबा म्हणतो. त्याची कीर्ती चारही दिशांना पसरू लागली की, त्या बाबाकडे अनेकांचा ओघ लागतो.

म्हणजे या संसार सागरात घुसमटणारी माणसे किती आहेत याची कल्पना येते. ही माणसे खरोखरच पिचलेली असतात का, हा संशोधनाचा विषय होऊ शकेल. देवळात श्रीमंत आणि गरीब, राव आणि रंक सारेच घंटा बडवत असतात, मूर्तीपुढे हात जोडून उभे असतात आणि सुखासाठी परमेश्वराची आराधना करत असतात. पण सुख म्हणजे नक्की काय हे मूर्तीपुढे हात जोडून राहणा-यांना कळत नाही. माणूस कंगाल असला तरी तो दु:खी असतो आणि लक्ष्मी पाणी भरत असली तरीही तहानलेला असतो. ‘जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना ते तू शोधूनी पाहे’ असे म्हटले आहे ते त्यामुळेच. एखाद्यापुढे भैतिक सुखे हात जोडून उभी असली तरी तो समाधानी नसतो.

मूर्तीपुढे तासन्सात उभे राहून ती बोलत नाही, त्यामुळे काही उपायही सापडत नाही. फक्त काही चमत्कार होईल या आशेवर असतो. त्यामुळे संसारात व्यापलेली आणि सुखाच्या शोधात असलेली माणसे एखाद्या बाबाने लावलेल्या जाळ्यात सहज गुरफटली जातात आणि त्याची अंकित होऊन राहतात. सामान्य माणसांपासून अगदी उच्चासनावर विराजमान झालेल्या नेत्यापर्यंत सारेजण बुवा-बाबाच्या भजनी लागतात, त्याच्या तालावर नाचू लागतात. त्यात इतकी तल्लीन होतात की, आपले सर्वस्व गमावून बसतात. जेव्हा ते भानावर येतात तेव्हा फार उशीर झालेला असतो. सुखाच्या शोधात असलेले अनेकजण अधिक कफल्लक होऊन जातात. त्यांच्यासारखाच असलेला एखादा कफल्लक मग त्या बुवा-बाबाची सगळी लफडी बाहेर काढतो तेव्हा त्याचे खरे रूप समाजाला कळते. डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमित रामरहीम याचा साधूचा अंगरखा असाच फाडला गेला आणि त्याचे खरे रूप कळले तेव्हा तो तुरुंग नावाच्या आ‘श्रमात’ वीस वर्षे खडी फोडायला गेला. मात्र त्यानंतरही डोळे विस्फारतील असे कारनामे आता समोर येत आहेत.

आपल्याला अंतज्र्ञान असल्याचे भासवणारा हा भोंदू बाबा टीव्हीवर बीभत्स दृश्ये पाहत असतानाच हातात पिस्तूल घेऊन बसण्यामागचे कारण आता उघड झाले आहे. त्याच्या गुहेपासून साध्वींच्या आश्रमापर्यंत गुप्त मार्ग सापडला असून त्याच्या बाजूलाच आणखी दोन कृत्रिम बोगदे सापडले आहेत. शिवाय स्फोटके बनवणा-या कारखान्यात एके-४७ बंदुकीच्या काडतुसांचे काही रिकामे बॉक्सही सापडले. एका बाबाला या सर्वाची काय गरज, असा प्रश्न कोणालाही पडणारच. त्याचे उत्तर डेराकडून लखनौ येथील वैद्यकीय महाविद्यालयाला दान केलेल्या १४ मृतदेहांत दडलेले आहे. या मृतदेहांचे सापळे बोलू लागतील तेव्हा या राम रहीमवर ‘हे राम’ म्हणण्याचीच पाळी येईल हे निश्चित.

या पार्श्वभूमीवर आखाडा परिषदेने देशभरातील १४ बाबांची यादी जाहीर करून ते भोंदू असल्याचे जाहीर केले आहे. उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या कार्यकारिणीने या बाबांविरोधात देशव्यापी बहिष्कार घालण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. बाबा गुरमित राम रहीम, आसाराम बापू, नारायण साई, राधे माँ, निर्मल बाबा, सच्चिदानंद गिरी, ओम बाबा, इच्छाधारी भीमानंद, स्वामी असीमानंद अशा कथित बाबा-महाराजांचा यात समावेश आहे. शिवाय आखाडा परिषदेने आता ‘संत’ ही उपाधी देण्यासाठी एक प्रक्रिया निश्चित करण्याचा ठराव केला आहे. जेणेकरून भविष्यात राम रहीमसारख्या बाबांना या उपाधीचा गैरवापर करता येणार नाही.

काही जणांच्या वाईट कृत्यांमुळे सर्वच धर्मगुरूंकडे संशयास्पद दृष्टीने पाहिले जात असल्याची भावना सध्या हिंदू संतांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे परिषदेने संत ही उपाधी देण्यासाठी एक प्रक्रिया निश्चित  करण्याचे ठरवले आहे. यापुढे कोणाही व्यक्तीची छाननी केल्यानंतरच ही उपाधी प्रदान करण्यात येणार आहे. पण परिषदेने हे लक्षात घ्यावे की संत, महाराज किंवा बाबा ही उपाधी लोकच प्रदान करतात. त्यांच्या अंधश्रद्धेतून हे घडते आणि या ‘अंध’श्रद्धेचा मार्ग राजकारणी नेतेच दाखवतात. लोकांना आपल्या मुठीत ठेवण्याचा मार्ग बुबा-बाबांच्या दिखाऊ झोपडीतून जातो यावर राम रहीमच्या ‘गुहा’मार्गाने शिक्कामोर्तब केले आहे. लोकांना अंधश्रद्धेच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी सुरू केलेली व्यापक मोहीम राजकारण्यांच्या मुळावर उठणारी होती.

म्हणूनच राजकारण्यांच्या हस्तकांकरवी त्यांची हत्या करण्यात आली असावी असे म्हणण्यास आता संशय आहे. अन्यथा त्यांचे मारेकरी केव्हाच सापडले असते. मात्र ते अजूनही पोलिसांच्या हाती सापडू नयेत यातच खरी गोम आहे. एखाद्या ‘संत’ व्यक्तीजवळ कुठल्याही स्वरूपाची रोख रक्कम अथवा त्याच्या नावावर कुठलीही संपत्ती असता कामा नये. अशी संपत्ती किंवा रोख रक्कम ही ट्रस्टच्या नावाने असायला हवी. तसेच याचा मोठा भाग हा लोककल्याणासाठी वापरला जायला हवा, अशा प्रकारचा ठराव आखाडा परिषद करणार आहे. त्यापूर्वी सार्वजनिक जीवनात वावरणा-या व्यक्तीने बुबा-बाबांच्या नादी लागू नये असा ठराव संसदेनेच करावा आणि त्याची अंमलबजावणी राज्य सरकारांनी करावी, तरच बुवा-बाबांचे स्तोम कमी होईल.

[EPSB]

रत्नागिरी काँग्रेस कार्यकारिणीबैठकीचा फज्जा

पोलीस संरक्षण, बंद खोलीत २५ कार्यकर्त्यांच्या चर्चेतून पक्ष कसा वाढणार?

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version