Home देश ताजमहल भारतीय मजुरांच्या घामातून उभा

ताजमहल भारतीय मजुरांच्या घामातून उभा

0

प्रेमाचे प्रतीक समजल्या जाणा-या ताजमहालवरून राजकारण रंगले असताना आता यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाष्य केले आहे.

नवी दिल्ली- प्रेमाचे प्रतीक समजल्या जाणा-या ताजमहालवरून राजकारण रंगले असताना आता यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाष्य केले आहे. ‘ताजमहाल कोणी बांधला आणि कोणत्या कारणासाठी बांधला हे महत्त्वाचे नाही. तो भारतीय मजुरांच्या घामातून उभारला गेला, हे महत्त्वाचे आहे,’ असे आदित्यनाथ यांनी म्हटले. ‘एएनआय’ बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. याआधी गद्दारांनी बांधलेला ताजमहाल भारतीय संस्कृतीवरील कलंक असल्याचे विधान उत्तर प्रदेशमधील भाजपचे आमदार संगीत सोम यांनी केले होते.

भाजप आमदार संगीत सोम यांनी ताजमहाल भारतीय संस्कृतीवरील कलंक असल्याचे म्हटल्यामुळे मोठा वाद झाला होता. याबद्दल बोलताना, ताजमहाल भारतीय कामगारांच्या घामातून उभारण्यात आल्याचे योगी आदित्यनाथ म्हणाले. ‘पर्यटनाच्या दृष्टीकोनातून ताजमहाल महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळेच ताजमहाल परिसरात सोयीसुविधा पुरवणे आणि पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी घेणे सरकारचे कर्तव्य आहे,’ असे आदित्यनाथ यांनी म्हटले. योगी आदित्यनाथ २६ ऑक्टोबरला आग्य्राला भेट देणार आहेत. त्यावेळी ते ताजमहाललाही भेट देतील.

उत्तर प्रदेश सरकारने काही दिवसांपूर्वीच ताजमहालला पर्यटनस्थळांच्या यादीतून वगळल्याने मोठा वाद झाला होता. यानंतर रविवारी एका जनसभेला संबोधित करताना भाजप आमदार संगीत सोम यांनी, ताजमहाल भारतीय संस्कृतीवरील कलंक असल्याचे म्हटले होते. ‘ताजमहालला उत्तर प्रदेश सरकारच्या पर्यटनस्थळांच्या यादीतून वगळल्याने अनेकजण चिंतेत आहेत. आपण कोणत्या इतिहासाबद्दल बोलत आहोत? ज्या व्यक्तीने (शहाजहान) ताजमहालाची उभारणी केली, त्या व्यक्तीने त्याच्या वडिलांना कैदेत ठेवले होते. त्याला हिंदूंची कत्तल करायची होती. जर हाच इतिहास आहे, तर हे अतिशय दु:खद आहे. आम्ही हा इतिहास बदलून टाकू आणि मी तुम्हाला याची खात्री देतो,’ असे भाजपचे आमदार संगीत सोम यांनी म्हटले. यापुढे बोलताना त्यांनी मुघल बादशहा बाबर, औरंगजेब आणि अकबर यांचा उल्लेख ‘गद्दार’ असा केला होता.

संगीत सोम यांनी ताजमहालला भारतीय संस्कृतीवरील कलंक म्हटले असताना भाजपच्या इतर नेत्यांनी मात्र त्यांच्या विधानाशी फारकत घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले. उत्तर प्रदेश सरकारमधील पर्यटनमंत्री रिटा बहुगुणा जोशी यांनी सोम यांनी त्यांचे वैयक्तिक मत व्यक्त केल्याचे म्हटले होते. ‘ताजमहाल हा आपला सांस्कृतिक वारसा असून या वास्तूचा समावेश जगातील प्रसिद्ध पर्यटनस्थळांमध्ये केला जातो,’ असे जोशी म्हणाल्या होत्या. ‘सांस्कृतिक वारसा असलेल्या वास्तूंचा संपूर्ण विकास करून तिथे मूलभूत सुविधा उपलब्ध करणे ही सरकारची प्राथमिकता आहे,’ असेही त्यांनी म्हटले होते.

[EPSB]

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version