Home महामुंबई एसएनडीटीतील पगार रखडले

एसएनडीटीतील पगार रखडले

0

मुंबई विद्यापीठाशी संलग्न कॉलेजांतील प्राध्यपकांच्या पगाराची समस्या ताजी असतानाच, आता मुंबईतील एसएनडीटी विद्यापीठातील प्राध्यापकांच्या पगाराचा प्रश्नही उजेडात आला आहे.

मुंबई- मुंबई विद्यापीठाशी संलग्न कॉलेजांतील प्राध्यपकांच्या पगाराची समस्या ताजी असतानाच, आता मुंबईतील एसएनडीटी विद्यापीठातील प्राध्यापकांच्या पगाराचा प्रश्नही उजेडात आला आहे. एसएनडीटी विद्यापीठातील नियमित आणि सीएचबी प्राध्यापकांचे पगार गेल्या सहा महिन्यांपासून झालेले नसल्याची बाब सोमवारी उजेडात आली आहे. यात विद्यापीठाशी संलग्न कॉलेजांमधील प्राध्यापकांचाही समावेश आहे. यामुळे अनेक प्राध्यापकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

दरम्यान, हा प्रश्न येत्या आठवडय़ात सोडविण्यात येणार असून, प्राध्यापकांचे पगार लवकरच सुरू होतील, असे विद्यापीठातर्फे सांगण्यात आले. श्रीमती नाथीबाई दामोदार ठाकरसी महिला विद्यापीठाशी (एसएनडीटी) संलग्न १४ कॉलेज मुंबईत आहेत. यातील बहुतांश कॉलेजांमध्ये सीएचबी धर्तीवर प्राध्यापक काम करीत असतात. या विद्यापीठाशी संलग्न कॉलेजांमध्ये १००हून अधिक प्राध्यापक काम करीत आहेत. या प्राध्यापकांचा पगार मार्च २०१७ पासून झालेला नाही. त्याचबरोबर विद्यापीठाच्या ७२ नियमित प्राध्यापकांचा पगारही झालेला नसल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. गेल्या सहा महिन्यांपासून पगार न झाल्याने अनेक प्राध्यापकांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.

अनेकांनी याप्रकरणी शिक्षण सहसंचालक विभागाकडे धाव घेतली असल्याचे कळते. पगार न झालेल्या प्राध्यापकांनी एसएनडीटीच्या कुलगुरूंकडे धाव घेतली आहे. सहा महिने पगार न झाल्याने गृहकर्जासह इतर कर्जाचे हप्ते भरण्यात अडचण येत आहे, अशी माहिती प्राध्यापकांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली. कॉलेजांनी रोस्टर नियमित न केल्याने हा फटका बसल्याचे प्राध्यापकांनी सांगितले.

लवकरच प्रश्न सुटेल
एसएनडीटीकडून शिक्षकेतर कर्मचा-यांचे पगार हे विद्यापीठ फंडातून काढण्यात येतात. हे पगार कधीही विलंबाने होत नाहीत. काही नियमित प्राध्यापकांच्या फाइल्स या नव्या शालार्थ सेवेत अपडेट करण्याचे काम सुरू असून येत्या काळात त्याचा फायदा होणार आहे. या कारणामुळे काही प्राध्यापकांचे पगार रखडले असल्याचे सांगत आता ते सुरळीत होणार असल्याचे विद्यापीठाच्या प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सीएचबी प्राध्यापकांबाबतची सुधारित नियमावली तयार करून कॉलेजांना पाठविण्यात आलेली असून या प्राध्यापकांचा प्रश्नही मार्गी लागला असून हे पगार लवकरच देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

[EPSB]

पाँडिचेरीसारख्या राज्यातही अंगणवाडी सेविकांना १९ हजार रुपये मानधन देण्यात येते.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version