Home महामुंबई करुणामूर्ती सिंधुताई सपकाळ जेव्हा संतप्त होतात!

करुणामूर्ती सिंधुताई सपकाळ जेव्हा संतप्त होतात!

0

करुणामूर्ती, अनाथांची माय, वात्सल्य सिंधू म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते त्या सिंधुताई सपकाळ एकदम संतप्त झाल्याचे दृश्य पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर पाहायला मिळाले. 

मुंबई- करुणामूर्ती, अनाथांची माय, वात्सल्य सिंधू म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते त्या सिंधुताई सपकाळ एकदम संतप्त झाल्याचे दृश्य पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर पाहायला मिळाले. या महामार्गावर सुसाट वेगाने धावणा-या गाडय़ा आणि मनमानी टोलवसुली करूनही रस्त्यावर आवश्यक सुविधा नसल्याचे पाहून माई संतापल्या.

त्यांनी आरआयबी टोलनाक्यांवरील कर्मचा-यांना धारेवर धरले. ही परिस्थिती बदलली नाही तर आपण याच ठिकाणी आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला. ‘देवेंद्र बेटा, तरुण पोरींचे पांढरे होणारे कपाळ वाचव रे बाबा.’ अशी सादही त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वडीलकीच्या नात्याने घातली.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून बुधवारी रात्री सिंधुताई प्रवास करीत होत्या. त्या दरम्यान त्यांच्यासमोर अनेक वाहने वाहतुकीचे नियम मोडीत अत्यंत धोकादायक पद्धतीने धावत होती. अनेक ठिकाणी रस्त्यावर आवश्यक असणा-या सुविधाही नव्हत्या. टोलनाक्याच्या जवळच एका गाडीला मोठा अपघात होता होता राहिला. त्या जीपमध्ये महिला आणि बालके मिळून २० जण होते.

उर्से टोलनाक्याजवळील हा प्रकार पाहून संयमी असलेल्या सिंधुताईंनाही शांत राहणे अवघड झाले. त्या आपल्या गाडीतून खाली उतरल्या आणि टोलनाक्यावरील कर्मचा-यांची त्यांनी चांगलीच कानउघाडणी केली. इतकेच नव्हे तर त्यांनी टोल वसूल करणा-या आयआरबी कंपनीच्या अधिका-यांना फोन करून फैलावर घेतले. त्या म्हणाल्या की, ‘‘पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आणखी किती जणांचे बळी घेणार आहात? लोक एवढे पैसे भरतात, तरीही तुम्ही त्यांना चांगली व्यवस्था देऊ शकत नाही.

सुरक्षित प्रवास देऊ शकत नाही. आतापर्यंत शेकडो जणांचे या महामार्गावर प्राण गेले आहेत. आणखी किती बळी तुम्हाला हवे आहेत? प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने येत्या आठ दिवसांत योग्य उपाययोजना केल्या नाहीत तर हजारो लोकांसह रस्त्यावर उतरून आंदोलन करेन’’, असा इशाराही त्यांनी दिला.

बेटा देवेंद्र गरीब पोरींचे कुंकू वाचव..

महामार्गावरील या प्रकारानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सिंधुताई यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही वडीलकीच्या नात्याने चार शब्द सुनावले. त्या म्हणाल्या की, बेटा देवेंद्र तू विदर्भातला आहेस.

गरिबांचे दु:ख तू पाहिलेली आहेस. अपघातामुळे तरुण मुली विधवा होत आहेत. त्यांचे कूंकू वाचव. नितीन गडकरी यांनाही माझी विनंती आहे की, त्यांनी रस्त्याची कामे वेगाने करून अपघात कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version