Home मध्यंतर श्रध्दा-संस्कृती श्रीकृष्णाला विसरू नका..

श्रीकृष्णाला विसरू नका..

0

श्रीकृष्ण हा सर्वात शक्तिशाली योद्धा होता. त्याने मनात आणलं असतं तर एकटयाने कौरवांचा पराभव केला असता. पण श्रीकृष्णाने शस्त्र हाती धरलं नाही. या कृतीतून संदेश दिला की, तुम्ही स्वत:चा संघर्ष करायला, स्वत: सज्ज झालात तरच मी तुमच्या पाठीशी आहे. कारण श्रीकृष्णाचा कर्मयोगावर विश्वास होता.

श्रीकृष्णाची चरित्रकथा सांगते की श्रीकृष्ण जन्माला येण्याआधीच त्याला ठार करायची तयारी झाली होती. त्यातून तो वाचला. पुढे सतत जीवावर संकटं आली. तो लढत राहिला. काही ना काही युक्ती करून वाचला. प्रसंगी पळसुद्धा काढला. पण संकटं टळावीत म्हणून स्वत:ची कुंडली घेऊन त्याने ज्योतिषी गाठला नाही, ना उपास केले.

ना अनवाणी पायाने फिरला. त्याने पुरस्कार केला फक्त ‘कर्मयोगाचा!!’ भर रणांगणात अर्जुनाने धनुष्य खाली टाकला. तेव्हा कृष्णाने, ना अर्जुनाची कुंडली मांडली, ना गंडे-दोरे बांधले. ‘तुझं युद्ध तुलाच करावं लागेल’, असं त्याने अर्जुनाला ठणकावून सांगितलं. अर्जुनाने धनुष्य खाली टाकलं.. तेव्हा श्रीकृष्णाने ते उचलून स्वत: अर्जुनातर्फे लढाई केली नाही.

श्रीकृष्ण हा सर्वात शक्तिशाली योद्धा होता. त्याने मनात आणलं असतं तर एकटयाने कौरवांचा पराभव केला असता. पण श्रीकृष्णाने शस्त्र हाती धरलं नाही. जर अर्जुन लढला तरच त्याने अर्जुनाचे सारथ्य करण्याची तयारी दाखवली. एक महान योद्धा सारथी बनला. अर्जुनाला स्वत:ची लढाई, स्वत:लाच करायला लावली.

या कृतीतून संदेश दिला की, तुम्ही स्वत:चा संघर्ष करायला स्वत: सज्ज झालात तरच मी तुमच्या पाठीशी आहे. मी तुमचा सारथी बनायला तयार आहे. पण तुम्ही लढायला तयार नसाल, तर मी तुमच्या वतीने संघर्ष करणार नाही. तुमच्या पदरात फुकट यश टाकणार नाही. कोणत्याही देवाचा-देवीचा आशीर्वाद घ्यायला जाल तेव्हा श्रीकृष्णाला विसरू नका.

अनवाणी चालत जायची गरज नाही. उपाशी राहायची गरज नाही.. शस्त्र खाली टाकू नका. प्रत्येक व्यक्तीकडे गुणांचं शस्त्र आहे. नेमकं तेच शस्त्र काढा आणि त्याचा उपयोग करून लढा. कोणताही देव-देवी तुमची लढाई लढणार नाही. तुमची स्वप्नं फुकटात पूर्ण करून देणार नाही. स्वत:ची लढाई स्वत:च लढा !!!

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version