Home महाराष्ट्र पूरपरिस्थितीत बाधितांना श्रमजीवीचा दिलासा

पूरपरिस्थितीत बाधितांना श्रमजीवीचा दिलासा

0

श्रमजीवी संघटनेने केले पूरग्रस्तांसाठी मदतकार्य.     

वाडा- गेले दोन दिवस पावसाने संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरश: झोडपून काढले आहे. सतत कोसळणा-या मुसळधार पावसाने सर्व ठिकाणचे जीवनमान विस्कळीत झाले आहे. या पावसाने आपत्ती व्यवस्थापन करणा-या शासकीय अधिका-यांचे प्रयत्न सुरू असतानाच, त्यांच्या मदतीला श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते सहकार्यासाठी धावून गेल्याने प्रशासनाला या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी काहीसा हातभार लागला असल्याचे दिसते. श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी कालपासून ठाणे, पालघर, नाशिक आणि रायगड या ठिकाणच्या सर्व तहसील अधिका-यांशी सततचा संपर्क ठेवून होते.

ज्या ठिकाणी मदत लागेल अशा ठिकाणासाठी संघटनेची मदत पथक तयार होती. पालघरमध्ये अनेक ठिकाणी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनासोबत मदतकार्यात हातभार लावला. अन्याय अत्याचाराविरोधात सरकार विरोधात रस्त्यावरच्या लढाईत पुढे असणारी श्रमजीवी आपत्तीच्या काळात मदत कार्यातही पुढे दिसली. पालघर जिल्ह्यातील अनेक गावांचा या पावसामुळे संपर्क तुटलेला, अनेक आदिवासी पाडे देखील पाण्याखाली आलेले, मात्र प्रशासन देखील सतर्क असल्याने कोणतीही गंभीर आपत्ती अथवा मोठे नुकसान झालेले नाही. मात्र या परिस्थितीमुळे मोठी आपत्ती निर्माण होऊ शकली असती, अशी परिस्थिती होती. पालघर आपत्ती विभागाशी स्वत: विवेक पंडित यांचाही संपर्क होता. त्यांच्या सूचनेनुसार रात्री उशिरापर्यंत सर्व कार्यकर्ते कार्यरत होते.

ठाणे जिल्ह्यातील गणेशपुरीतील अकलोली परिसरात ८० घरे पाण्याखाली होती. या भागात भिवंडी तहसीलदार शशिकांत गायकवाड आणि त्यांचे सहकारी यांच्या सोबत श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या भागात जाऊन मदतकार्य केले. परिणामी कोणतीही दुर्घटना घडली नाही. या बधितांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. यावेळी केशव पारधी, जयेश पाटील, मनमोहन यादव, कैलास पाटील आदी युवा कार्यकर्ते सहभागी होते.

पालघर जिल्ह्यातील बोईसर बेटेगाव चौकीसमोर सहा ते सात फूट उंचीएवढे पाणी साठले होते. जवळ जवळ दीड हजार लोक चौकीसमोरील पेट्रोलपंपाच्या शेडमध्ये थांबले होते. त्यांना टायर टय़ूबला दोर बांधून बाहेर सुखरूप काढण्यात यश आले आहे. यावेळी संघटनेच्या मदत पथकाने हातभार लावला. यावेळी पालघर उपविभागीय अधिकारी विकास गजरे, पालघर तहसीलदार महेश सागर, बोईसर पोलीस निरीक्षक विजय शिंदे, संघटनेचे दिनेश पवार, दिलावर लाखानी, कमर खान, दाऊद जुमाणी व जितू पवार उपस्थित होते.

सर्वाना फळ व चहाची व्यवस्था करण्यात आली होती. पालघरमध्ये संघटनेचे मनीष भानुशाली यांनी वीरेंद्र नगरमध्ये तांदूळ, डाळ आणि इतर जीवनावश्यक साहित्य, थोडी रोख मदत करण्यात आली. काही ठिकाणी चटई वाटण्यात आल्या. या मदतकार्यावर श्रमजीवी संघटनेचे विजय जाधव, सुरेश रेंजड, आराध्या पंडित स्वत: लक्ष ठेवून होते.

अशाच प्रकारे प्रत्येक तालुक्यात संघटनेच्या मदत पथकांनी आपापल्या परीने प्रशासनाच्या मदतकार्यात खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला. रस्त्यावरच्या लढाईत आक्रमकपणे सरकारच्या अन्यायकारक धोरणाविरोधात दोन हात करणारी संघटना या आपत्तीमध्ये सामाजिक बंधिलकी जपत असतानाचे चित्र अनेकांना भावून टाकणारे होते.

[EPSB]

२६ जुलै २००५च्या प्रलयकारी पावसाची आठवण करून देणारा पाऊस मंगळवारी मुंबईत बरसल्यानंतर सर्वाधिक नुकसान दुकानदारांचे झाले.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version