Home टॉप स्टोरी मुंबई महापालिकेत राजकीय भूकंप

मुंबई महापालिकेत राजकीय भूकंप

0

मुंबईत महापौर बसवण्याच्या भाजपच्या मनसुब्यांना हाणून पाडत शिवसेनेने शुक्रवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सहा नगरसेवकांना अधिकृतरीत्या शिवसेनेत प्रवेश दिला.

मुंबई- मुंबईत महापौर बसवण्याच्या भाजपच्या मनसुब्यांना हाणून पाडत शिवसेनेने शुक्रवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सहा नगरसेवकांना अधिकृतरीत्या शिवसेनेत प्रवेश दिला. या सहा नगरसेवकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे भाजप आणि मनसे या दोन्ही पक्षांना शिवसेनेने झटका दिला आहे. जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरणात राजू पेडणेकर यांचा विजय झाला आहे. त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ ८४ वरून ८५ वर गेले. तसेच मनसेचे सहाही नगरसेवक हे आता शिवसेनेचे नगरसेवक म्हणून काम करतील, अशी घोषणाही उद्धव ठाकरे यांनी केली.

दरम्यान, महापालिकेतील सत्ताकारणात मनसेच्या ७ पैकी ६ नगरसेवकांनी स्वत:चा गट तयार करून शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. राज ठाकरे यांच्या परवानगीशिवाय, त्यांना पूर्णपणे अंधारात ठेवून या नगरसेवकांनी त्यांना ‘जय महाराष्ट्र’ केला. या खेळीमुळे मनसे आणि भाजप या दोन्ही पक्षांना जबर धक्का दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा?आहे. आता शिवसेनेच्या महापौरपदाला कुठलाही धोका नसेल आणि महापौरपदाची खुर्ची मिळवण्याचे भाजपचे स्वप्न भंगल्याची चर्चा सुरू आहे.

भांडुप पोटनिवडणुकीच्या निकालानंतर शुक्रवारी मुंबई महानगरपालिकेत वेगाने राजकीय उलथापालथ दिसून आली. भांडुपमधील विजयानंतर भाजपचे पालिकेतील संख्याबळ वाढले होते. फेब्रुवारीमध्ये पार पडलेल्या पालिका निवडणुकीत शिवसेनेचे ८४, तर भाजपचे ८२ नगरसेवक निवडून आले होते. माजी उपमहापौर आणि भाजपच्या नगरसेविका शैलजा गिरकर यांचे निधन झाल्यामुळे पालिकेतील भाजपचे संख्याबळ ८१ झाले. आता प्रभाग क्रमांक ११६ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपच्या जागृती पाटील निवडून आल्यामुळे पालिकेतील भाजपचे संख्याबळ ८२ वर कायम राहिले आहे.

भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी अचानकपणे महापालिकेवर भाजपची सत्ता आणण्याची भाषा सुरू केली. संख्याबळ वाढल्याने महापालिकेत भाजपची सत्ता व महापौर येईल, असा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर धास्तावलेल्या शिवसेनेने वेगाने पावले उचलत भाजपच्या या खेळीला शह दिला. मनसेच्या सहा नगरसेवकांना गळाला लावले. या नगरसेवकांची कोकण विभागीय आयुक्तांसमोर गटनोंदणी होणार होती.

भाजपने केला शिवसेनेचा गेम
कोकण भवनातील महापालिकेतील राजकीय पक्षांच्या गटनोंदणीचे काम पाहणा-या दोन्ही अधिका-यांना मिटिंगच्या नावाखाली तत्काळ मंत्रालयात बोलावून घेतले आहे. शिवसेनेने मनसेचे नगरसेवक घेवून येणार असल्याची कल्पना देवूनही प्रादेशिक उपसंचालक (नगर परिषद प्रशासन) सुधाकर जगताप आणि तहसीलदार राजेश वैष्णव मंत्रालयात असल्याचे सांगण्यात आले. शनिवार आणि रविवार सुटीचा दिवस असल्याने ऐनवेळी मनसेच्या सहा नगरसेवकांना ‘मातोश्री’वर रितसर शिवसेनेत प्रवेश देण्यात आला.

मॉकड्रिलचे कारण देत महापालिकेचे सर्व दरवाजे बंद
मुंबईत मोठय़ा राजकीय घडामोडी सुरु असताना दुसरीकडे मुंबई महापालिकेत मॉकड्रीलचे कारण देत सर्व दरवाजे बंद करण्यात आले होते. कोणत्याही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते येथे आल्यास कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून महापालिकेचे सर्व दरवाजे बंद करण्यात आल्याचीही चर्चा होती. महापालिकेतील दरवाजे बंद केल्यानंतर तिथे अग्निशमन दलाचे जवान आणि गाडय़ाही दाखल झाल्या होत्या. मात्र, हा नेमका काय प्रकार सुरु आहे याबाबत पालिकेतील कर्मचा-यांमध्येच संभ्रम निर्माण झाला होता.

राजच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप
पोटनिवडणुकीतील पराभवानंतर शिवसेनेकडून घोडेबाजार सुरु झाला आहे. मनसेच्या ६ नगरसेवकांना प्रत्येकी ३ कोटी रुपये देऊन फोडल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला. यासंदर्भात त्यांनी लाचलुचपत विभाग, कोकण आयुक्त आणि पोलिसांकडे लेखी तक्रारही केली. तर जनताही शिवसेनेचा हा घोडेबाजार पाहात आहे. आम्ही शिवसेनेच्या या घोडेबाजाराचा पदार्फाश करु, अशी प्रतिक्रिया भाजप गटनेते मनोज कोटक यांनी दिली.

राज ठाकरे घायाळ
भाजपच्या खेळीला शह देण्यासाठी शिवसेनेच्या मास्टरस्ट्रोकमुळे मनसेला मोठा धक्का बसला. मुंबईत मनसेचे सात नगरसेवक होते. यापैकी सहा नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्याने मनसेचे मोठे राजकीय नुकसान होणार आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये राज ठाकरे यांनी सरकारविरोधात अनेक मुद्द्यांवरून आक्रमक भूमिका घेतली. एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीच्या निषेधार्थ त्यांच्या नेतृत्त्वाखाली भव्य मोचार्ही काढण्यात आला होता. यानिमित्ताने मनसेचे मोठे शक्तीप्रदर्शन पाहायला मिळाले. त्यामुळे आगामी काळात राज ठाकरे आपली गमावलेली पत पुन्हा मिळवतील, अशी चर्चा होती. याशिवाय राज यांच्या आंदोलनाने मनसेला नवसंजीवनी मिळेल, अशी भाकीतेही वर्तवण्यात येत होती. मात्र, शिवसेनेच्या अनपेक्षित

खेळीने मुंबईतील मनसेचे अस्तित्त्व होत्याचे नव्हते झाले आहे.
शिवसेनेबरोबर जाणा-या या नगरसेवकांमध्ये राज यांच्या अनेक निष्ठावान सहका-यांचा समावेश आहे. आतापयर्ंतच्या घडामोडी पाहता स्वत: राज ठाकरे यांना अगदी शेवटच्या क्षणापयर्ंत असे काही होईल, याची कल्पना नसावी. त्यांच्याकडून अधिकृतरित्या यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी या नगरसेवकांना आम्ही कोणतीही संमती दिली नसल्याचे स्पष्ट केले. मनसेच्या गोटात यामुळे मोठे निराशेचे वातावरण आहे. ज्या नगरसेवकांना राज ठाकरे यांनी ओळख मिळवून दिली, त्यांनी अशी वर्तणूक करणे, अयोग्य असल्याच्या प्रतिक्रिया मनसेच्या गोटातून ऐकायला मिळत आहेत.

भांडुप पोटनिवडणुकीनंतर हालचाली
भाजपच्या संभाव्य खेळी लक्षात घेऊन शिवसेनेने चाल खेळत मनसेच्या तब्बल ६ नगरसेवकांना फोडले. या सर्व घडामोडीत शिवसेनेचे आमदार अनिल परब आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पोटनिवडणुकीतील पराभवानंतर शिवसेनेने तत्काळ परिस्थितीचा आढावा घेतला आणि काल रात्रीच सर्व चर्चेला सुरुवात झाली. शिवसेनेने ही खेळी एवढय़ा शांतपणे खेळली की, मनसे आणि भाजपला याचा थांगपत्ताही लागला नाही.

ही तर लोकशाहीची पायमल्ली, मनसेचा आरोप
शिवसेनेने मनसेचे सहा नगरसेवक फोडल्यामुळे मनसेच्या गोटात खळबळ उडाली आहे. मनसेने निवडणूक आयुक्तांना पत्र लिहून या गटाला मान्यता देऊ नये अशी मागणी केली. तसेच ही लोकशाही पायमल्ली आहे अशी टीकाही करण्यात आली. मनसेचे सरचिटणीस शिरीष सावंत यांनी निवडणूक आयोगाला याबाबत पत्र लिहिले. या पत्रात राजकीय पक्षाकडून विविध आमिषे आणि प्रलोभणे दाखवून काही सदस्यांना वेगळा गट स्थापन करण्यासाठी प्रवृत्त करत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा गैरप्रकारामुळे लोकशाही मुल्यांची पायमल्ली होत आहे. त्यामुळे या गटाला मान्यता देऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे. तसंच या संदर्भात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी चर्चा करण्यासाठी आम्हाला वेळ देण्यात यावा अशी विनंतीही करण्यात आली.

घोडेबाजाराचा आरोप गाढवांनी करू नये : उद्धव ठाकरे
पोटनिवडणुकीतील पराभवानंतर शिवसेनेकडून घोडेबाजार सुरू झाला असल्याचा आरोप भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. याला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी घोडेबाजार करणा-यांनी गाढवाची भाषा वापरू नये असा टोला लगावला आहे.
माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी मोदी लाट ओसरली असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, भाजपला आता पोटनिवडणूक जिंकण्यासाठीही सहानुभूतीचा आधार घ्यावा लागतो. गेल्या तीन वर्षात कोणत्याही राष्ट्रीय पक्षावर ही वेळ आली नाही, ती ह्यांच्यावर आली आहे. यावेळी त्यांनी नांदेडमधील विजयाबद्दल जनतेचे कौतुक तर काँग्रेस आणि अशोक चव्हाण यांचे अभिनंदन केले. ते पुढे म्हणाले, भाजप जर आम्हाला मित्र मानत असेल तर त्यांनी आमच्या आनंदात सामील व्हावे.
फोडाफोडीच्या होणा-या आरोपावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, इतरांनी केली तर खुद्दारी आणि आम्ही केली तर गद्दारी हे कोणते राजकारण आहे. जनता सर्व काही पाहून घेईल. आता फोडाफोडी झाली नाही, आधी झाली होती. जुने सहकारी पुन्हा शिवसेनेत आले आहेत. असेही ते म्हणाले.
मराठी माणसाच्या हितासाठी आम्ही सगळे एकत्र आलो असल्याची प्रतिक्रिया मनसेतून शिवसेनेत आलेले नगरसेवक दिलीप लांडे यांनी यावेळी दिली.

शिवसेनेचा हा बार फुसकाच : शेलार
शिवसेनेने मनसेचे ६ नगरसेवक फोडल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे मुंबई शहर अध्यक्ष आशीष शेलार यांनी जोरदार टोला लगावला आहे. भाजपच्या भांडुपमधील विजयाचा एवढा धसका घेतल्याबद्दल ट्विटरवर शिवसेनेची खिल्ली उडवली आहे. ‘केवढी धावाधाव, जुळवाजुळव आणि पळवापळवी! अजूनही हा बार फुसकाच आहे म्हणा..’ असे ट्विट करून भाजप लवकरच महापौरपदावर दावा सांगेल, असे स्पष्ट केले आहे.

मनसेच्या या नगरसेवकांनी केला शिवसेनेत प्रवेश
अर्चना भालेराव (वॉर्ड १२६)
परमेश्वर कदम (वॉर्ड १३३)
अश्विनी मतेकर (वॉर्ड १५६)
दिलीप लांडे (वॉर्ड १६३)
हर्षल मोरे (वॉर्ड १८९)
दत्ताराम नरवणकर (वॉर्ड १९७)

[EPSB]

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या नांदेड महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळाले आहे.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version