Home संपादकीय अग्रलेख वडापाव खाऊन राबणा-या शिवसैनिकांसाठी..

वडापाव खाऊन राबणा-या शिवसैनिकांसाठी..

0

हा अग्रलेख शिवसेनेत वडापाव खाऊन निवडणुकीत दिवस-रात्र काम करणा-या कट्टर आणि अट्टल शिवसैनिकांसाठी आहे.

बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या शिवसैनिकांच्या भरोशावर एवढा मोठा पसारा वाढवला ते बाळासाहेब आज असते, तर त्यांनी कमळाबाईच्या पेकाटात लाथ घातली असती आणि शिवसेनेच्या अटीवर युती केली असती आणि त्या अटी मान्य झाल्या नसत्या तर, ‘गेले उडत’ असेही बाळासाहेबांनी म्हटले असते. १९९५चे युतीचे सरकार बाळासाहेबांच्या हिंमतीमुळे आले. ते सरकार ‘शिवसेना- भाजपा’ असे सरकार होते. आताचे सरकार ‘भाजपा-शिवसेना’ असे सरकार आहे. हा मूलभूत फरक लक्षात घेतला की, शिवसेना-भाजपा यांची युती होण्याऐवजी भाजपा-शिवसेना अशी युती होणार आणि महापालिकेत क्र. १ असताना आक्रमक शिवसैनिकांना ही दुय्यम भूमिका अजिबात नको आहे. किंबहुना शिवसैनिकांचे मत विचारले तर मुंबई शहरातील प्रत्येक शिवसैनिक भाजपाशी युती करण्याची गरज नाही, असे स्पष्टपणे सांगतोय. शेलार आणि सोमय्या शिवसेनेला माफियाचे राज्य म्हणत आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस युती होण्याची भाषा करतात. युती होणारच आहे, मग स्वच्छ चारित्र्याच्या कमळाबाईला माफियावाल्यांची युती कशी चालणार? शिवसैनिकांना हाच राग आहे. शिवसेनेच्या ताकदीवर आम्ही लढू व जिंकू शकतो, हा विश्वास असल्यामुळे वडापाव खाऊन काम करणारे शिवसैनिक, शिवसेनेच्या नेतृत्वावर चांगले संतापलेले आहेत. शिवसेना नेते सांगतात, आमचे आत-बाहेर काही नाही, जे आहे ते रोखठोक. त्यांच्या मुखपत्रातील कॉलम रोखठोक. हे रोखठोक शब्द मोदींसारखेच बोलबच्चन आहेत. नुसते बुडबुडे आहेत. शिव्याशाप आहेत. कपटीपासून विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाहीत, इथपर्यंत सर्व शिव्या देऊन झाल्या आहेत आणि संध्याकाळ झाली की, युतीच्या वाटाघाटी सुरू झालेल्या आहेत.

भाबडय़ा शिवसैनिकांना हे गणित समजत नाही. एकीकडे शिव्या द्यायच्या आणि संध्याकाळी युतीच्या वाटाघाटीला बसायचे. तिकडे सेनाप्रमुखांनी सांगायचे की, वाटाघाटी होतील, तर मुख्यमंत्र्यांशीच होतील. मग शेलार, तावडे, अनिल देसाई, बांदेकर किंवा न निवडून आलेले सुभाष देसाई यांच्या बैठका म्हणजे निव्वळ नौटंकी आहे, असे समजायचे का? शिवसैनिक म्हणतात, नुसते समजायचेच नाही, तरी ही नौटंकीच आहे आणि कट्टर शिवसैनिकांची फसवणूक आहे. सेनेच्या नेत्यांनी शिवसैनिकांच्या भावना ऐकल्या असत्या, तर युती कधीच तुटली असती. कट्टर शिवसैनिकांना असे वाटते की, फडणवीस सरकारला जीवदान देण्याची भूमिका चुकलेली आहे. सत्तेसाठी सेना लाचार का झाली? असा खरा रोखठोक प्रश्न शिवसैनिक विचारत आहेत आणि रोखठोकवाल्यांकडे त्याचे उत्तर नाही. बाळासाहेब असते तर त्यांनी हे सरकार कधीच पाडले असते. उलटे-पालटे केले असते आणि मग भाजपावाले मातोश्रीवर ‘श्रीची’ करीत धावत गेले असते. प्रमोद महाजनसुद्धा धावतच जायचे. बाळासाहेबांचा तो दरारा होता. आज नेतेच घाबरत आहेत. सरकार पाडले असते तर शिवसेना कितीतरी मोठी झाली असती. सत्तेच्या वळचणीला उभे राहण्याची गरज नव्हती. जे निवडून आले नाहीत ते रावते, सुभाष देसाई, रामदास कदम यांना सत्तेचा एवढा लोभ आहे की, त्यांनी शिवसेना नेत्यांना भरीस पाडून सरकारात घुसण्याची तयारी केली आणि उद्धव ठाकरे यांचे असे कान भरले की, सत्तेत गेलो नाही तर शिवसेना फुटेल. एकनाथ शिंदे यांच्याकडूनही सायकलला पंप मारण्याचे काम चालूच होते. ते हेच सांगायचे, सेना फुटेल या फाटाफुटीच्या भीतीने उद्धव ठाकरे घाबरले आणि जी शिवसेना अधिकृतपणे विरोधी पक्षाच्या बाकावर बसली होती. ती शिवसेना लाचार होऊन सत्तेत सामील झाली. इथेच शिवसेनेचे अवसान संपले. एकदा सत्ता स्वीकारल्यानंतर जे गुणदोष चिकटत असतात. ते सगळे गुणदोष सेनेला आपोआप चिकटले. चार फालतू खाती देऊन भाजपावाल्यांनी सेनेला गुंडाळले.

शिवसेनेत सध्या एक अंतर्गत संघर्ष सुरू आहे. हा जहाल व मवाळसारखा आहे. सत्तेसाठी लाचार असलेल्यांना भाजपाच्या समोर शिवसेनेने मवाळ भूमिका घ्यावी असे वाटते, त्यामुळेच मवाळ शब्दाच्या पलीकडचा ‘शेळपट’ हा शब्द शिवसेनेच्या आसपास फिरकत आहे. मोदी आणि नोटाबंदी या दोघांविरुद्ध सेनेने हल्ला केला आणि गृहमंत्री राजनाथ सिंग यांचा फोन आल्याबरोबर दुस-या दिवशी निवेदन बदलून शेपटय़ा घातल्या. या अंतर्गत संघर्षाचे स्वरूप असे आहे की, जे फुकटात मंत्री झालेले आहेत असे शिंदे, देसाई, रावते, कदम हे आपल्या फायद्यासाठी बाळासाहेबांच्या आक्रमक सेनेला मवाळ आणि शेळपट भूमिका घ्यायला लावतात. त्याचा कट्टर शिवसैनिकांना संताप आहे. या शिवसैनिकांच्या डोळ्यासमोर फक्त एकच मूर्ती आहे, ती बाळासाहेबांचीच. ते बाळासाहेब स्वर्गातूनही आज कट्टर शिवसैनिकांना असेच सांगत आहेत, ‘अरे! आपल्या ताकदीवर लढा, कमळाबाईच्या ओटीवर जायची गरज काय?’ शिवसेनेतील ज्येष्ठ नेते म्हणजे मनोहर जोशी, लीलाधर डाके, आजारग्रस्त असलेले सुधीर जोशी यांची सध्याची सेनेतील भूमिका अडवाणी, मुरली मनोहर यशवंत सिन्हासारखी झालेली आहे. ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशा अवस्थेत हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनाही असे वाटते की, युतीच्या भानगडीत न पडता ताकद आजमवावी. कारण २०१९च्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत भाजपावाल्यांनी युती केली नाही तर? तिथपर्यंत महाराष्ट्र भाजपावाले भरपूर माया जमवतील, समृद्धी मार्ग त्याचकरिता आहे. अशा एका प्रकल्पातून हे एक निवडणूक काढू शकतील. नागपूर मेट्रो प्रकल्प सुरूच आहे. २०१९ पूर्वी तो पुरा करायचा आहे. या एका प्रकल्पावर निवडणूक निघेल. शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची चर्चा चालू होती की, आपला नेता नेमका कुणाला घाबरत आहे? तीन ज्येष्ठ नेत्यांनी दबक्या आवाजात असे बोलल्याचे ऐकले गेले. ‘ईडीला तर घाबरत नाहीत’ पण शिवसैनिक म्हणतो आम्ही ईडीला घाबरत नाही आणि फीडीलाही घाबरत नाही. पण त्याचे ऐकतो कोण?

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version