Home महाराष्ट्र ३० सप्टेंबपर्यंत शेतक-यांचा सातबारा कोरा करा

३० सप्टेंबपर्यंत शेतक-यांचा सातबारा कोरा करा

0

कर्जमाफी झाली नसल्याने अन्य बँका किंवा पतसंस्था शेतक-यांना कर्ज देत नाहीत. त्यामुळे शेतक-यांची आर्थिक कुचंबणा होत आहे.

अलिबाग- कर्जमाफी झाली नसल्याने अन्य बँका किंवा पतसंस्था शेतक-यांना कर्ज देत नाहीत. त्यामुळे शेतक-यांची आर्थिक कुचंबणा होत आहे. म्हणून कर्जमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी येत्या ३० सप्टेंबपर्यंत करून शेतक-यांचा सातबारा कोरा करावा, अशी मागणी आज रायगडात शिवसेनेतर्फे करण्यात आली.

शेतक-यांच्या सातबारा कोरा करावा, या मागणीसाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ अद्याप शेतक-यांना मिळालेला नाही. तसेच तातडीचे अनुदानही मिळालेले नाही या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा शिवसेनेतर्फे आज निर्वाणीचा इशारा देत आंदोलन करण्यात आले. आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांना देण्यात आले.

आमदार भरत गोगावले, मनोहर भोईर, जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई, रवि मुंढे, माजी जिल्हाप्रमुख बबन पाटील, जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, अलिबाग तालुकाप्रमुख दीपक रानवडे आदी या आंदोलनात सहभागी झाले होते. हा आमचा निर्वाणीचा इशारा असून ३० सप्टेंबपर्यंत शेतकरी कर्जमुक्त झाला नाही, तर शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पक्षाची पुढील भूमिका जाहीर करतील, असा इशारा यावेळी देण्यात आला.

राज्य सरकारने जाहीर केलेल्या निकषांनुसार रायगड जिल्हय़ात २४ हजार १४७ शेतकरी हे कर्जमाफीसाठी पात्र आहेत. त्यापैकी १७ हजार शेतक-यांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. उर्वरित शेतक-यांचे ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याचे काम सुरू आहे. ९२५ शेतक-यांनी १० हजार रुपये तातडीच्या कर्जअनुदानाची मागणी केली आहे. त्यांना लवकरच ती रक्कम मिळेल. शासनाने जाहीर केलेल्या मुदतीनुसार कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी दिले.

[EPSB]

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version