Home महाराष्ट्र शरद पवार भाजपला आतून पाठिंबा देतील

शरद पवार भाजपला आतून पाठिंबा देतील

0

केंद्र आणि राज्यात शिवसेना सत्तेत आहे. मात्र, शिवसेनेने पाठिंबा काढला तरी भाजपचे सरकार पडत नाही.

अमरावती- केंद्र आणि राज्यात शिवसेना सत्तेत आहे. मात्र, शिवसेनेने पाठिंबा काढला तरी भाजपचे सरकार पडत नाही. कारण शरद पवार ‘आतून’एनडीएसोबत असल्याचा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी अमरावती येथे केला.

अमरावती महापालिकेच्या वतीने आयोजित ‘स्वच्छ सेवा अभियाना’त सहभागी होण्यासाठी आठवले अमरावती येथे आले असता त्यांनी पत्रपरिषदेत ही बाब स्पष्ट केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशहिताचे निर्णय घेत आहेत. नोटबंदी, जीएसटी, रस्ते विकास, नागपूर- मुंबई समृद्धी महामार्ग, उज्ज्वला गॅस योजना, जनधन योजना अशा विविध योजनांचा पाढाच त्यांनी यावेळी वाचला. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य शासन सकारात्मक भूमिकेत असून न्यायालयाच्या अधीन राहून मराठय़ांना आरक्षण द्यावे, ही अगोदरपासून रिपाइंची मागणी आहे. केंद्र सरकार संविधान बदलविणार हे विरोधकांचे दिशाभूल करणारे वक्तव्य असल्याचा आरोप त्यांनी केला.

अधिकारी, कर्मचा-यांना पदोन्नतीत आरक्षण मिळावे, यासाठी राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. कोणत्याही कर्मचा-यांवर अन्याय होणार नाही, ही काळजी सरकार घेत असल्याची ग्वाही आठवले यांनी दिली. सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीवर भाष्य करताना त्यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेस सोडण्याचा योग्य निर्णय घेतला आहे. ते लवकरच भाजपत येणार असून रिपाइंची दारेही त्यांच्यासाठी खुली आहेत. आम्ही त्यांचे स्वागत करू, असा टोला त्यांनी लगावला.

सत्तेतून बाहेर पडण्याच्या शिवसेनेच्या धमकीला परतवून लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सक्षम असल्याचा दावाही त्यांनी केला. यावेळी अमरावतीचे महापौर संजय नरवणे, उपमहापौर संध्या टिकले, स्थायी समिती सभापती तुषार भारतीय, भाजपचे पक्षनेता सुनील काळे, महापालिका आयुक्त हेमंत पवार, रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर, माजी अनिल गोंडाणे, नगरसेवक प्रकाश बनसोड, प्रदीप दंदे, कृष्णा गणवीर आदी उपस्थित होते.

[EPSB]

पावती घेतली नाही, तर सामान चोरीला गेल्यास रेल्वे जबाबदार नाही

रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशाने सोबतच्या सामानाची नोंदणी करून त्याची रितसर पावती घेतलेली नसेल, तर हे सामान हरवल्याची जबाबदारी रेल्वेवर नाही

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version