Home महाराष्ट्र गायीला आई म्हणायचे नसेल तर देशात राहायचे नाही, हे सांगणारे हे कोण?

गायीला आई म्हणायचे नसेल तर देशात राहायचे नाही, हे सांगणारे हे कोण?

0

गायीचा आपण सन्मान करतो, पण गाय कशी आई असू शकेल? ही मंडळी या संदर्भातील सावरकरांचा विचार का मांडत नाहीत, असा सवाल माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केला.

पुणे- गायीला आई म्हणायचे नसेल तर देशात राहायचे नाही, असे काही लोक सांगतात, हा अधिकार त्यांना कोणी दिला? आई ही आईच असते. गायीचा आपण सन्मान करतो, पण गाय कशी आई असू शकेल? ही मंडळी या संदर्भातील सावरकरांचा विचार का मांडत नाहीत, असा सवाल माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केला.

सामाजिक क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी पुण्यभूषण फाऊंडेशन’ (त्रिदल, पुणे) आणि पुणेकरांच्या वतीने दिला जाणारा २८ वा ‘पुण्यभूषण पुरस्कार’ ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांना ज्येष्ठ समाजवादी नेते खासदार शरद यादव यांच्या हस्ते रविवारी सायंकाळी बालगंधर्व रंगमंदिरात प्रदान करण्यात आला.

या वेळी महापौर प्रशांत जगताप, डॉ. रघुनाथ माशेलकर, ‘पुण्यभूषण फाऊडेशन’चे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई आदी उपस्थित होते. एक लाख रुपये आणि बालशिवाजीची पुण्याची भूमी सोन्याच्या फाळाने नांगरीत असलेली प्रतिमा, पुण्याच्या ग्राम देवतांसह असलेल्या या वैशिष्टय़पूर्ण स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.

पुणे शहराच्या परिसरात झालेल्या औद्योगिक विकासाने हजारोंना रोजगार मिळाले असून; येणा-या गुंतवणुकीला, औधोगिकीकरणाला मानवी चेहरा दिला की चिंता करण्याचे कारण राहणार नाही. तसेच देशात सांप्रदायिक विचार वाढणे, ही चिंतेची बाब आहे, या पार्श्वभूमीवर सतर्क राहिले पाहिजे.

सध्या देशात आणि काश्मीरमध्येही बिकट परिस्थिती आहे. सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या देशाने विविध क्षेत्रात प्रगती केली आहे; मात्र देशात विषमता आहे. अनेक भागांत शतकांपूर्वीची अवस्था आहे. आजूबाजूला पाहताना चीन, युरोपची प्रगती अधिक झालेली आढळते. तरीही आपला देश पुढे जात असल्याचे सांगितले जाते.

आदिवासी, शेतकरी, दलितांची वाईट अवस्था आहे. देशाची संपूर्ण प्रगती होण्यासाठी समतापूर्ण विकासाची गरज असल्याचे पवार यांनी सांगितले. आताच्या परिस्थितीत सत्य बोलणेही सध्या अवघड झाले आहे, लगेच भावनांना धक्का बसल्याचे सांगून वेढा घातला जातो.

लोकांच्या बोलण्यात कट्टरता आली आहे. अशा परिस्थितीत देशाला पुढे नेण्याचा विचार मांडला जात नाही. म्हणून पुण्याने नवा इन्कलाब घेऊन पुढे आले पाहिजे, असेही शरद पवार यांनी सांगितले.

साम्यवादाचे आकर्षण असलेली एक पिढी होती. मीही अपवाद नव्हतो. आजच्या काळात ही भूमिका कितपत योग्य ठरेल, याचा विचार करावा लागेल. रशियाचे तुकडे झाले. जगातल्या सर्व साम्यवादी देशांतून साम्यवाद हद्दपार झाला. चीनमध्ये साम्यवाद नावाला असला तरी त्याचा रंग वेगळा आहे.

जगात कुठेही साम्यवाद पाहण्यास मिळत नाही. गरिबीचे वाटप याऐवजी संपत्ती निर्माण करण्याची भूमिका घ्यावी लागेल, असेही शरद पवार म्हणाले.भाई वैद्य म्हणाले, वित्तीय भांडवलशाहीत कल्याणकारी भूमिका राहिली नाही. तरीही जगाच्या कानाकोप-यात समाजवादाची किरणे दिसू लागली आहेत.

आर्थिक संपन्नता वाढण्यापेक्षा मानवी विकास निर्देशांक वाढला पाहिजे. राजकीय लोकशाही टिकण्यासाठी आर्थिक व सामाजिक विकासाबरोबरच आर्थिक वितरण आणि जातीयता निर्मूलनाचे काम करावे लागेल. संविधान, समाजवाद, धर्मनिरपेक्षता पुढे न्यावी लागेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version