Home संपादकीय विशेष लेख विनोदाचे टायमिंग साधणारे नेते

विनोदाचे टायमिंग साधणारे नेते

0

राजकारणात आणि निवडणुकीत भाषणबाजी करताना थोडेफार विनोदाचे ज्ञान असणे आवश्यक असते. प्रसंगावधान आणि स्थानिक घटनांची माहिती असणे हे महत्त्वाचे असते. आपल्याकडे जेवढे यशस्वी झालेले नेते आहेत त्यांच्याकडे या गोष्टीचे भान होते म्हणून ते यशस्वी झाले.

काही चांगले किस्से सांगतील असे वक्ते सभेसाठी जमलेल्या श्रोत्यांना नेहमीच आवडतात. ते श्रोत्यांना प्रभावित करणारे असले पाहिजेत. अश्लील आणि असंबद्ध बोलून अनेक जण खालच्या पातळीवरचा हशा घेतात पण त्याला काहीच अर्थ नसतो. गेल्या काही वर्षात राज ठाकरे यांच्या सभेला गर्दी होते, याचे कारण काहीतरी चमचमीत विनोदी ऐकायला मिळेल हेच त्याचे कारण आहे. वक्ता दशसहस्त्रेषु असला तरी तो विनोदाने जेव्हा सभा जिंकतो तेव्हा आपले विचार पटकन पोहोचवू शकतो. अन्यथा त्याला रटाळ भाषण करायला लागते. भाजपच्या यशातही विनोदाचे टायमिंग साधणारे वक्ते असणे हे एक कारण आहेच. पूर्वीच्या काळात प्रमोद महाजन, मुंडे यांच्या भाषणात अशी मिश्कीलता असायची. आजकाल नितीन गडकरी यांच्या भाषणात थोडीफार विनोदबुद्धी दिसते. पण कधी कधी विनोद निर्मितीसाठी केला जाणारा अट्टाहास अंगलट येतो आणि त्यातून आत्मक्लेशही करून घ्यावा लागतो, याचे बोलके उदाहरण म्हणजे अजित पवारांचे ‘धरण.’

महाराष्ट्राच्या राजकारणात ५० वर्ष अधिराज्य गाजवलेल्या शरद पवार यांनीही आपली विनोदबुद्धी अनेक वेळा वापरली म्हणून ते यशस्वी झाले. २०१४च्या निवडणुकीत शाई पुसून येण्याचा सल्ला देण्याचा त्यांनी केलेला विनोद अंगलट आला होता, पण अनेकवेळा त्यांचे विनोद हे मिश्कील आणि मार्मिक टिपण्णी करणारे असतात. दोन दिवसांपूर्वी कर्मवीर जयंतीनिमित्त साता-यात आलेल्या शरद पवारांनी सभागृहात अडकल्यावर हम तुम एक कमरे में बंद हो.. असे पत्रकारांना उद्देशून केलेले वक्तव्य किंवा छत्रपती उदयनराजे यांना टोकण्यासाठी केलेले कॉलरचे वक्तव्य मिश्कील होते. पण त्यांचे विनोदाचे अनेक किस्सेही सांगता येतील.

बॅ. अ. र. अंतुले यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यानंतर अचानकपणे बॅ. बाबासाहेब भोसले यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून आले. हा सगळ्यांना धक्काच होता. कारण अंतुले म्हणजे शंभर टक्के काँग्रेसनिष्ठ, इंदिरा गांधींच्या विश्वासातले होते. पण त्यांना ते प्रतिभा प्रतिष्ठान भोवले. त्यामुळे सत्तेवरून जावे लागले. त्यामुळे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून आता काँग्रेस कोणाला पाठवणार असा प्रश्न होता. जसा प्रश्न अशोकराव आदर्श प्रकरणात गेल्यानंतर होता तसाच तो प्रकार होता. यावेळी शरद पवार विरोधी पक्षात होते. काँग्रेसमध्ये नव्हते. जेव्हा बाबासाहेब भोसले यांचे नाव आले तेव्हा शरद पवारांना काहींनी विचारले की, बाबासाहेब भोसले कसे काय मुख्यमंत्री झाले हो? तेव्हा शरद पवारांनी अत्यंत मार्मिक उत्तर दिले होते. ते म्हणाले की, काँग्रेस श्रेष्ठींकडून आदेश होता की आता फक्त निष्ठावान काँग्रेसवालाच नको आहे, तर असा आमदार हुडका की त्याच्या नावात, आडनावात, किमान पत्त्यामध्ये इंदिरा, गांधी, नेहरू अशापैकी काहीतरी असेल. शे-दीडशे आमदारांच्या फाईली काँग्रेस निरीक्षकांनी चाळल्या. पण एकाच्याही नावात, आडनावात, पत्त्यात कुठे गांधी, नेहरू सापडेना. याला अपवाद ठरले ते बाबासाहेब भोसले. कारण त्यांच्या पत्त्यामध्ये नेहरूनगर कुर्ला असा उल्लेख होता. त्यामुळे त्यांना हे मुख्यमंत्रीपद मिळाले आहे. शरद पवारांच्या या वक्तव्याने सगळेजण खोखो हसत होते.

माजी शिक्षणमंत्री रामकृष्ण मोरे आणि शरद पवार यांच्यात विळा-भोपळ्याचे नाते होते. एकाच पक्षात राहून असे मतभेद आणि मनभेद असता कामा नये आणि पक्षसंघटना वाढवली पाहिजे, यासाठी शरद पवारांनी पुढाकार घेतला. आळंदीमध्ये मनोमिलनाचा कार्यक्रम ठरवला. या मनोमिलनाच्या कार्यक्रमात रामकृष्ण मोरे आपल्या भाषणात म्हणाले होते की, शरद पवार आणि आमच्यात असलेले सगळे मतभेद आम्ही याक्षणी इंद्रायणीत बुडवत आहोत. त्यावर शरद पवार म्हणाले, हे मतभेद इंद्रायणी सोडून अन्य कुठेही बुडवा. कारण इंद्रायणीत बुडवलेली तुकोबाची अभंगगाथा जशी वर येते तसे ते पुन्हा वर येतील. म्हणून दुस-या कुठल्याही नदीत बुडवा पण इंद्रायणी नको. त्यामुळे सगळे उपस्थित अतिशय दाद देऊन हसले आणि ख-या अर्थाने मनोमिलन झाले. रामकृष्ण मोरे हे तुकारामांचे वंशज होते, त्यामुळे हा पंच तिथे चपखल बसला होता.

प्रमोद नवलकर जेव्हा शिवसेनेचे युतीच्या काळात मंत्री होते तेव्हा सातारा जिल्ह्याच्या दौ-यावर आले होते. तेव्हा तिथल्या शेतक-यांनी त्यांना भरपूर फिरवले. एकजण म्हणाला, साहेब यंदा भुईमुगाचं पीक मायंदाळ आलं आहे. या मायंदाळ शब्दाचा अर्थ काही केल्या नवलकरांच्या लक्षात आला नाही. त्यांनी कोणाला तरी विचारले की मायंदाळ म्हणजे नेमके काय? तर एकाने सांगितले की मायंदाळ म्हणजे भरपूर. म्हणून ते पुन्हा भुईमुगाच्या शेताकडे गेले. तर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. हा शेतकरी सांगतो आहे भुईमूग मायंदाळ आलं आहे आणि आपल्याला तो या शेतातील भुईमुगाच्या रोपटय़ांना एकही शेंग दिसत नाही. तेव्हा शेतक-याने सांगितले की, भुईमुगाच्या शेंगा या जमिनीत येतात, झाडावर नाही. शरद पवार नवलकरांचा हा किस्सा अनेक भाषणांतून सांगायचे.

राजकारणातील गंभीर प्रसंग टाळण्यासाठी विनोदाच्या शिडकाव्याने वातावरण हलके करता येते. संत रामदासांनी टवाळा आवडे विनोद असे म्हटले असले तरी राजकारणात टवाळकी करण्यापेक्षा विनोदाची पेरणी करून गटतटातील दुभंगलेल्या भिंती सांधता येतात. सभेतील प्रेक्षकांची मने जिंकता येतात. बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री झाल्यावर एका प्रशासकीय अधिका-याने त्यांची अपॉइंटमेट घेतली होती. त्यांनी दिलेल्या वेळेत ते अधिकारी हजर होते. आपल्या कामात अत्यंत कुशल असलेल्या या अधिका-याचे आडनाव वकील होते. पण बाबासाहेब आपल्या केबिनमध्ये काही लोकांशी खूप वेळ गावाकडच्या गप्पा मारत बसले होते. शेवटी त्यांनी पीएकडे चिठ्ठी पाठवली. पीए म्हणाला, वकीलसाहेब बाहेर बराचवेळ वाट पाहत आहेत. त्यावर बाबासाहेब म्हणाले की, ते वकील असले तरी मी बॅरिस्टर आहे. त्यामुळे रागावलेल्या वकिलांनीही कपाळाला हात लावला आणि राग सोडला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version