Home महाराष्ट्र सरकारची कर्जमाफी म्हणजे लबाडा घरचे जेवण

सरकारची कर्जमाफी म्हणजे लबाडा घरचे जेवण

0

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले आहे.

नाशिक- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले आहे. सरकारची कर्जमाफी म्हणजे लबाडाघरचे जेवण आहे. सरसकट कर्जमाफी मिळावी ही आमची मागणी आहे असे म्हणताना सरकार शेतक-यांच्या प्रश्नावर अजिबात गंभीर नसून आता सरकारला शेतक-यांची सामुदायिक ताकद दाखवण्याची वेळ आली आहे असा इशारा शरद पवार यांनी केंद्र आणि राज्य सरकारला दिला आहे. नाशिक येथे आयोजित राज्यस्तरीय शेतकरी प्रतिनिधींच्या अधिवेशनात पवार बोलत होते.

नोटाबंदीनंतर देशाची अर्थव्यवस्था उध्वस्त झाली असल्याचे म्हणत पवार यांनी केंद्र सरकारवर कडाडून हल्ला चढवला. या पार्श्वभूमीवर राज्यात आणि देशात शेतक-यांवर मोठी संकटे आली असून शेतीमालाच्या किंमतीची अवस्था बिकट झाली असल्याचे ते म्हणाले. शेतकरी उद्ध्वस्त झाला, तर देश उद्ध्वस्त होईल, देशात हाहाकार माजेल. शेतीमालाच्या किंमतीसोबत खेळणे देशाला परवडणारे नाही असे सांगत, आज बळीराजा गप्प आहे, पण उद्या जर शेतकरी रस्त्यावर उतरला तर कुणाच्या बापाला घाबरणार नाही असा इशाराही पवार यांनी सरकारला दिला आहे.

पवार आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, आज देशात आणि राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीची किंमत सगळ्यांनाच मोजावी लागत आहे. खरे तर शेतकरी आणि शेतमजुरांनाच ही किंमत जास्त मोजावी लागत आहे. इंधनाची दरवाढ करून सरकार जनतेची लूट करत आहे. महागाईने देशात उचांक गाठला आहे. संपूर्ण जगात पेट्रोल आणि डिझेलचे भाव घसरलेले असताना भारतात मात्र ते वाढत आहेत याकडेही त्यांनी शेतक-यांचे लक्ष वेधले आहे.

नोटाबंदी म्हणजे मारुतीची बेंबी
केंद्र सरकारने घेतलेला नोटाबंदीचा निर्णय म्हणजे मारुतीची बेंबी आहे, असे वक्तव्य करत या निर्णयाचा झटका सगळ्यांनाच बसला मात्र सुरुवातीला कुणी ते मान्य केले नाही. सर्वसामान्यांना २-३ दिवस रांगेत उभे राहावे लागले, मात्र सरकारशी ज्यांचे लागेबांधे आहेत अशांनी अगोदरच आपल्या नोटा बदलवून घेतल्या असा थेट आरोपही त्यांनी सरकारवर केला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version