Home टॉप स्टोरी …हे वागणं बरं नव्हं- शरद पवार

…हे वागणं बरं नव्हं- शरद पवार

0

एकीकडे सत्तेची गोड फळे चाखायची आणि दुसरीकडे सरकारच्या विरोधात आंदोलन करायचे, अशा शिवसेनेच्या दुटप्पी धोरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार हल्ला चढविला.

अहमदनगर- एकीकडे सत्तेची गोड फळे चाखायची आणि दुसरीकडे सरकारच्या विरोधात आंदोलन करायचे, अशा शिवसेनेच्या दुटप्पी धोरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार हल्ला चढविला. ते म्हणाले, महागाईच्या विरोधात शिवसेनेने आंदोलन करणे अभिनंदनीय आहे. पण सत्तेत राहून अशी भूमिका घेणे बरे नाही. सत्तेत राहून आंदोलन करणे बरे नाही, एक तर त्यांनी परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, नाही तर पूर्णपणे रस्त्यावर उतरले पाहिजे, असेही पवार म्हणाले.

अहमदनगर येथे एका कार्यक्रमासाठी पवार आले असताना त्यांनी शिवसेनेच्या दुटप्पीपणाचा चांगलाच समाचार घेतला. या वेळी त्यांनी भाजपा सरकावरही शरसंधान साधले. ते म्हणाले की, बुलेट ट्रेन ही काही सर्वसामान्यांची गरज नाही. ती श्रीमंतांसाठी सुरू होत आहे. त्याचा फायदा गुजरातला होणार आहे. मात्र त्याचा आर्थिक बोजा महाराष्ट्रावर पडणार आहे. याबाबत पवार यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच कर्जमाफीची घोषणा करून अद्याप त्याची अंमलबजावणी होत नसल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, भाजपच्या तीन वर्षात महागाई वाढली, रोजगार कमी झाला, शेती उत्पन्न घटले, औद्योगिक उत्पन्न घटले. याकडे दुर्लक्ष करून बुलेट ट्रेन सारख्या प्रकल्पातील आर्थिक गुंतवणूक चिंताजनक. यापेक्षा पाटबंधारे प्रकल्पाना निधी देऊन गती दिली असती तर राज्याचा फायदा झाला असता.

सरकारची कर्जमाफी म्हणजे ‘लबाडाच्या घरचे आवतण’ आहे. असले आवतण जेवल्याशिवाय काही खरे नसते. त्यामुळे कर्जमाफीचे जेवण कधी मिळेल त्याची वाट पाहावी लागेल. संपूर्ण कर्जमाफी देण्याचे जाहीर करून मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण शब्द काढून टाकला व सहा वेगवेगळे आदेश काढून अटी टाकल्या. त्यामुळे कर्जमाफी किचकट अटींची झाली आहे.

भाजपाच्या सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसचा आतून पाठिंबा आहे, असे विधान केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी केले होते. त्याबाबत विचारले असता पवार म्हणाले की, रामदास आठवले हे विनोदी गृहस्थ आहेत. संसदेत ते बोलण्यासाठी उभे राहिले की सर्वजण हसतात. त्यामुळे त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असेही पवार म्हणाले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version