Home टॉप स्टोरी ९१व्या मराठी साहित्य संमेलनासाठी बडोद्याची निवड

९१व्या मराठी साहित्य संमेलनासाठी बडोद्याची निवड

0

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी बडोद्याची निवड करण्यात आली आहे.

नागपूर- अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी बडोद्याची निवड करण्यात आली आहे. महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

संमेलनाच्या इतिहासात बडोद्यात होणारे हे चौथे संमेलन असेल. याआधी १९०९ यावर्षी सातवे, १९२१ यावर्षी अकरावे व १९३४ मध्ये विसावे संमेलन बडोद्यात झाली आहेत. त्यावेळी अनुक्रमे का. र. कीर्तीकर, न. चिं. केळकर व ना. गो. चापेकर हे बडोद्याच्या संमेलनाचे अध्यक्ष होते. मात्र स्वतंत्र भारतात होणारे बडोद्यातले हे पहिलेच संमेलन असेल.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यासाठी दिल्लीचा प्रस्ताव स्थळ निश्चितीपूर्वी व हिवरा येथील प्रस्ताव स्थळ निश्चितीनंतर लगेचच मागे घेतला गेल्यामुळे उद्भवलेल्या पार्श्वभूमीवर मराठी वाड्मय परिषद, बडोदा यांनी हे संमेलन घेण्यास तयारी असल्याची खात्री त्यांच्यांकडून महामंडळाच्या अध्यक्षांनी करुन घेतल्यानंतर व महामंडळाच्या सदस्यांनी त्यास संमती दर्शविल्यानंतर ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी बडोद्याची निवड केल्याचे महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी कळविले आहे.

हिवरा येथील स्थळाचा प्रस्ताव काही अपरिहार्य कारणांमुळे ते मागे घेत असल्याचे त्यांचे पत्र महामंडळास १४ सप्टेंबर रोजी प्राप्त झाल्यानंतर लगेचच महामंडळाच्या घटना व नियमांनुसार पुढील कार्यवाही महामंडळाच्या अध्यक्षांनी सुरु केली.

महामंडळाची गेल्या आठवड्यात १० सप्टेंबर रोजी बैठक झाली. यात निवड समितीने प्रत्यक्ष पाहणी करुन झालेल्या स्थळांपैकी एक स्थळ बाकी असल्याने, तसेच बडोद्याच्या निमंत्रकांनी संमेलन आयोजित करण्याची तयारी दाखवल्याने हा प्रश्न आता मार्गी लागला आहे.

[EPSB]

साहित्य संमेलनाच्या स्थळाला ‘अंनिस’चा आक्षेप

बुलडाण्याच्या हिवरा आश्रमात होणा-या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्षेप घेतला आहे.

[/EPSB]

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडे ९१ व्या साहित्य संमेलनासाठी सहा ठिकाणांहून निमंत्रणे आली होती. दिल्ली आणि बडोदा या नावाला पसंती दिली जात होती. पूर्वी चार ठिकाणे मागे पडल्याने मुख्य स्पर्धा दिल्ली आणि बडोदा या दोन शहरांमध्येच झाली. शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानने पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि अमरावती या दोन ठिकाणांसाठी पाठवलेले निमंत्रण मागे पडले. तर नागपूरच्या कल्याण शिक्षण संस्थेकडून चंद्रपूर जिल्ह्यातील तळोधी या स्थळासाठी निमंत्रण पाठवण्यात आले होते; पण या नावावरही फुली मारण्यात आली आहे. विशेष म्हणजे संमेलन भरविणा-या साहित्य महामंडळाचे कार्यालय नागपूर येथील विदर्भ साहित्य संघाकडेच आहे. बडोद्यातील मराठी वाङ्मय परिषद, बुलडाणा जिल्ह्यातील हिवरा येथील विवेकानंद आश्रम, दिल्लीतील दिल्ली मराठी प्रतिष्ठान या संस्थांसह मुख्य स्पर्धा दिल्ली व बडोदा या ठिकाणांमध्येच झाली.

गणेशोत्सव संपल्यानंतर आता भाषेचा उत्सव कुठे होणार, याकडे राज्यातील साहित्य वर्तुळाचे लक्ष लागले होते. त्याआधी हिवरा आश्रम हा शुकदास महाराज यांचा असल्याने अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी येथे होणा-या संमेलनाला विरोध केला. त्यानंतर आश्रमाने स्वत:हून माघार घेतली. त्यामुळे अखिल भारतीय साहित्य महामंडळावर लवकरात लवकर नवे स्थळ शोधण्याची नामुष्की ओढवली होती.

संबंधित बातम्या….

हिवरा आश्रम येथे ९१ वे साहित्य संमेलन

हिवरा आश्रमचे साहित्य संमेलन कुणी मारले?

साहित्य महामंडळाची घुसमटीतून सुटका

९१ वे मराठी साहित्य संमेलन बुलडाण्यात होणार

मराठी साहित्य संमेलन राज्याबाहेरच

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version