Home कोलाज ऐसे कैसे जाहले भोंदू?

ऐसे कैसे जाहले भोंदू?

0

राम रहीम काय किंवा रामपाल काय, स्वत:ला देवाचे अवतार समजत लोकांवर प्रभाव पाडणा-या आणि भक्तांची लुबाडणूक करणा-या, त्यांचं शोषण करणा-या अनेक बुवा-बाबांची प्रकरणं वेळोवेळी समोर आली; परंतु त्यातून काही धडा घेण्यास समाज तयार नाही. त्यात या तथाकथित बाबा-बुवांचे राजकारण्यांशी असणारे संबंध हा आणखी एक चिंतेचा विषय आहे. हे चित्र बदलण्यासाठी समाजाचाच पुढाकार महत्त्वाचा ठरणार आहे.

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीम याला दोन साध्वींवरील बलात्काराच्या वेगवेगळ्या प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने प्रत्येकी दहा वष्रे अशी ३० वर्षाची शिक्षा ठोठावली. त्यानंतर सतलोक आश्रमाचा प्रमुख रामपाल विरुद्धच्या खटल्याचा निकाल लागणार होता आणि त्याकडेही सा-यांचं लक्ष लागलं होतं. त्यानुसार हिसार न्यायालयानं रामपालची दोन प्रकरणातून सुटका केली. परंतु रामपालवर देशद्रोहासह अन्य काही आरोपांबाबतच्या खटल्यांची सुनावणी अद्याप सुरू आहे. त्यामुळे दोन प्रकरणातून सुटका झाली असली तरी तेवढय़ाने रामपाल बाहेर येऊ शकणार नाही, असं तज्ज्ञांचं मत आहे. २००६ मध्ये रामपालने एका धार्मिक पुस्तकासंदर्भात वादग्रस्त प्रतिक्रिया दिली होती. यानंतर रामपालचे समर्थक आणि एका विशिष्ट वर्गातील समर्थक यांच्यात जोरदार संघर्ष झाला. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी रामलाल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर रामलालला अटक करतानाही पोलीस, जवान आणि रामलालचे समर्थक यांच्यात मोठा संघर्ष झाला. त्यामुळे सरकारी कामात अडथळे आणणे, सामाजिक तणाव निर्माण करणे तसंच अन्य काही कारणांसाठी रामपालवर वेगवेगळ्या कलमांखाली खटला दाखल करण्यात आला होता. यानंतर रामपालच्या आश्रमातून अनेक संशयास्पद बाबी जप्त करण्यात आल्या होत्या.

राम रहीम काय किंवा रामपाल काय, स्वत:ला देवाचे अवतार समजत लोकांवर प्रभाव पाडणा-या आणि भक्तांची लुबाडणूक करणा-या, त्यांचं शोषण करणा-या अनेक बुवा-बाबांची प्रकरणं वेळोवेळी समोर आली आहेत; परंतु त्यातून समाज काही धडा घेण्यास तयार नाही, ही वस्तुस्थिती आहे. स्वत:ला देवाचा अवतार मानणारी ही मंडळी आलिशान जीवन जगत असतात. अमाप पैसा मिळवणे आणि सुखोपभोगात जीवन व्यतीत करणे, हेच यांचं अंतिम ध्येय असतं. डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीमचं निवासस्थान, त्याचं राहणीमान याविषयी नवनवीन माहिती आता उघड होऊ लागली आहे. ती पाहिली तर आश्चर्य वाटल्यावाचून राहात नाही. त्याचबरोबर अशा बुवा-बाबांच्या नादी लागून त्यांच्या चरणी आपली श्रद्धा वाहणा-या भक्तांची कीव करावीशी वाटते. त्यात या तथाकथित बाबा-बुवांचे राजकारण्यांशी असणारे संबंध हा अजून एक चिंतेचा विषय आहे. राजकीय वरदहस्तामुळेच ही मंडळी बिनधास्तपणे अशी कृत्ये करत असावीत, असं म्हणण्यास वाव आहे. अर्थात, या देशात कायद्याचं राज्य आहे आणि कायद्यासमोर सर्व समान आहेत, हा संदेश राम रहीमला ठोठावण्यात आलेल्या शिक्षेवरून स्पष्ट झालं.

राम रहीम प्रकरणात पूर्णपणे न्यायालयीन प्रक्रिया पार पाडून सुमारे १५ वर्षानंतर निकाल जाहीर करण्यात आला. गुन्हेगाराला शिक्षा देणं हा न्यायालयाचा दोष आहे का? लोकांना संतप्त होण्याचं कारणच काय, हा मूळ प्रश्न आहे. कोणीही उठून आपले अनुयायी गोळा करावेत आणि गुन्हे करत सुटावं, अशी या अनुयायांची अपेक्षा आहे का? अशा तथाकथित धर्मगुरूंच्या बुरख्याआड लपलेल्या गुन्हेगारी चेह-यांना समाजासमोर आणून शासन केलंच जाऊ नये, अशी मागणी करणारी ही मध्ययुगीन संस्कृती आपल्याकडे कधीपासून पुन्हा रुजू लागली? राम रहीमसारखे तथाकथित धर्मगुरू अध्यात्मापेक्षाही राजकीय क्षेत्रात अधिक सक्रिय असतात, असं वेळोवेळी स्पष्ट झालं आहे. राजकारणी आणि असे बाबा यांचं साटंलोटं देशाच्या अध:पतनाला कारणीभूत ठरत असल्याचं दिसत आहे. अनेक नामवंत साधूंपासून धीरेंद्र ब्रह्मचारीसारखे अनेक बाबा राजकीय लागेबांध्यांचा वापर करून अनेक प्रकरणांमधून सहीसलामत सुटल्याची उदाहरणं आहेत; परंतु राम रहीमबाबत तसं न घडल्यामुळे तर हा संतापाचा उद्रेक झाला नाही ना, असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. कारण राम रहीमनं कॅप्टन अमिरदर सिंग यांना २००२ मध्ये पंजाबमध्ये सत्तेत येण्यासाठी मदत केली होती.

२०१४ च्या लोकसभेच्या आणि हरियाणाच्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला विजयी करण्यातही त्याची महत्त्वाची भूमिका होती. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा सिरसा येथे ‘डेरा सच्चा सौदा’मध्ये गेले होते. हरियाणात सरकारच्या स्थापनेनंतर मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि त्यांचे सहकारी मंत्री भाजपच्या आमदारांना घेऊन राम रहीमच्या आशीर्वादासाठी गेले होते. हा सगळा घटनाक्रम पाहता राजकीय आश्रयाच्या जोरावर शिरजोर झालेल्या या बाबाच्या लीला उघडकीला आल्या आणि म्हणून ‘हमारी बिल्ली..’अशा संतापातून हा िहसाचार उफाळला, असं म्हणता येतं.

केवळ राम रहीम नाही तर याआधी आसाराम बापू, रामपाल बाबा, राधे माँ अशी एकापाठोपाठ एक धर्माच्या नावावर लोकांचं शोषण करणारी प्रकरणे बाहेर येत असून देखील समाज अजूनही त्या बुवा-बाबांच्या भजनी कशामुळे लागतो, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्या समाजमनावर देव आणि धर्म या संकल्पनांचा पूर्वापार मोठा पगडा राहिला आहे. त्याचा गरफायदा घेऊन अनेक बाबा-बुवा स्वत:ला देवाचा अवतार म्हणून घोषित करतात. आपल्या अतृप्त इच्छांच्या पूर्तीसाठी कुठलीही चिकित्सा न करता लोक त्याला बळी पडतात.

देव आणि धर्म या संकल्पनांना विरोध न करतादेखील अशा बाबा-बुवांचे दावे हे चिकित्सक बुद्धीने तपासून पाहिले असता त्यामध्ये कुणालाही सहज फोलपणा दिसून येऊ शकतो. परंतु देव आणि धर्म या संकल्पनांची चिकित्सा करणे म्हणजे धर्मद्रोह अशी धारणा जाणीवपूर्वक समाजामध्ये रुजवली असल्यामुळे अशा बाबा-बुवांचं फावतं. त्यामुळे लोक अशा गोष्टींची चिकित्सा करणे टाळतात. त्यातून अशा बाबा-बुवांचं प्रस्थ वाढत जातं. मोठय़ा प्रमाणात जनता जाते अशा ठिकाणी राज्यकर्त्यांचा हस्तक्षेप वाढीस लागणे, त्या ठिकाणच्या उपक्रमांना राज्यकर्त्यांचा पािठबा निर्माण होणे हे चित्र सध्या समाजात सगळीकडे दिसून येतं. यामधून देवाच्या आणि धर्माच्या नावावर शोषण करणारे आणि राज्यसत्ता यांच्यामध्ये एक प्रकारचं साटंलोटं तयार होतं. आसाराम, रामपाल, राम रहीम या सर्व बाबांच्या साम्राज्याचा विचार केला तर त्यांना विविध पक्षांच्या सरकारांनी, भरपूर सुविधा आणि पाठबळ दिल्याचे पुरावे समोर येतात. राज्यसत्ता आणि धर्मसत्ता यांची अशा पद्धतीने युती होणे हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे.

सातत्याने १५ वर्षे हे प्रकरण लावून धरणा-या अन्यायग्रस्त महिला, तपास करणारे सीबीआयचे अधिकारी आणि अशा स्वरूपाचा निर्णय देणारे न्यायमूर्ती या सगळ्यांच्या नतिक बळातच आपल्या देशातील लोकशाहीचं भवितव्य सामावलेलं आहे, असं वाटतं. अशा काही घटनांवरून धडा घेत यापुढील काळात अशा बाबा-बुवांचं प्रस्थ निर्माण होऊ द्यायचं नसेल तर समाजाने काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. मुख्यत्वे बाबा-बुवांच्या कारभाराकडे डोळसपणे आणि चिकित्सक वृत्तीने पाहिलं जायला हवं. याशिवाय अन्य काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. त्यामधील पहिली बाब म्हणजे आपल्या देव आणि धर्मविषयक भावनांचा गरवापर करून कोणी आपलं आणि समाजाचं शोषण तर करत नाही ना, याविषयी आपण सर्वानी या देशाचे नागरिक म्हणून चिकित्सक मनोभूमिका अंगीकारणे आवश्यक आहे.

देव आणि धर्म कल्पनांची चिकित्सा केल्याने त्यातील शोषण करणा-या आणि फोल असणा-या गोष्टी गळून पडतात. त्यामुळे देव आणि धर्माची चिकित्सा करणा-या लोकांना धर्मद्रोही किंवा दुस-या धर्माचे हस्तक म्हणून हिणवणे थांवबण्याचीही तितकीच आवश्यकता आहे. याशिवाय शालेय वयापासून विद्यार्थ्यांना चिकित्सक पद्धतीने प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य द्यायला हवं. तरच उद्या मोठी झाल्यावर ही मुलं अशा भोंदुगिरीच्या कच्छपी लागणार नाहीत. तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे धर्म ही आपली खासगी बाब असून राजकारणापासून त्याला दूर ठेवणे आवश्यक आहे. धर्म आणि राजकारण यांची गल्लत करणे हे समाजाला अराजकाकडे घेऊन जातं, हेही लक्षात ठेवायला हवं. राम रहीमला न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर त्याच्या कथित भक्तांनी मोठा हिंसाचार घडवून आणला. खरं तर या कायद्याचं राज्य असणा-या देशात कुठल्याही परिस्थितीत नागरिकांनी कायदा हातात घेणे ही गोष्ट क्षम्य असू शकत नाही.

या सा-या परिस्थितीत तथाकथित बाबा-बुवांपासून समाज मुक्त करायचा असेल तर त्यासाठी सामाजिक पातळीवर व्यापक प्रमाणातील जनजागरणाची आवश्यकता आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version