Home टॉप स्टोरी जेठमलानी केजरीवाल यांचा खटला लढणार नाही

जेठमलानी केजरीवाल यांचा खटला लढणार नाही

0

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात दाखल केलेला मानहाणीचा खटला ज्येष्ठ वकील राम जेठमलानी लढणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

नवी दिल्ली- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात दाखल केलेला मानहाणीचा खटला ज्येष्ठ वकील राम जेठमलानी लढणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. जेठमलानी यांनी यासंबंधी केजरीवाल यांना पत्र लिहून खटला लढणार नसल्याचे सांगितले असून या खटल्यासाठी दोन कोटी रुपयांहून अधिक शुल्क अदा करण्यात यावे, असेही म्हटले आहे.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केजरीवाल आणि अन्य पाच जणांवर एका प्रकरणात १० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकला होता. हा खटला जेठमलानी लढवत होते.

सुनावणीदरम्यान जेठमलानी यांनी जेटलींविरोधात आक्षेपार्ह भाषेचा वापर केला. जेठमलानींनी अशी भाषा केजरीवाल यांच्या सांगण्यावरून वापरली का, असे स्पष्टीकरण जेटलींनी मागितले होते. जेठमलानींनी होकारार्थी उत्तर दिल्यामुळे केजरीवाल यांच्यावर मानहानीचा आणखी एक खटला भरण्यात आला.

हा खटला दाखल झाल्यानंतर केजरीवालांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले तसेच जेटली यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरली जावी अशा कोणत्याही सूचना आपण दिल्या नव्हत्या, असे त्यांनी जेठमलानी यांना पत्राद्वारे सांगितले होते. केजरीवाल यांनी असा युटर्न घेतल्यामुळे जेठमलानींनी हा खटला लढण्यास नकार दिला. तसेच हा खटला लढण्यासाठी आकारले गेलेले शुल्क अदा करण्यात यावे, असे सांगितले आहे. दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक ही रक्कम आहे.

दिल्ली सरकारने याआधी जेठमलानी यांना साडेतीन कोटी रुपये शुल्क अदा केले होते. जेठमलानी केजरीवाल यांच्यावतीने ११ वेळा न्यायालयात हजर झाले होते. दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. जेठमलानी यांच्या निर्णयाबाबत आपल्याकडे कोणतीही माहिती नाही, असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version