Home टॉप स्टोरी ‘मोदींच्या भ्रष्टाचाराचे माझ्याकडे पुरावे’

‘मोदींच्या भ्रष्टाचाराचे माझ्याकडे पुरावे’

0
Rahul Gandhi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भ्रष्टचाराविषयी काही खाजगी पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी केला. 

नवी दिल्ली- माझ्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक भ्रष्टाचाराचे पुरावे असून ते मला लोकसभेत मांडायचे आहेत, मात्र हे माहीत असल्याने पंतप्रधान मला लोकसभेत बोलू देत नाहीत, असा खळबळजनक आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी केला.

संसदेचे कामकाज तहकूब झाल्यानंतर विरोधी पक्षांच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काही दिवसांपूर्वी मी बोललो, तर भूकंप हाईल, असे सुचक विधान राहुल गांधींनी केले होते. त्यानंतर त्यांनी थेट पुराव्यासह मोदींच्या भ्रष्टाचाराचा दावा केल्याने भाजपाला धडकी भरली आहे.

नोटबंदीच्या विषयावर बोलताना राहुल यांनी हा दावा केला. माझ्याकडे मोदींनी केलेल्या वैयक्तिक भ्रष्टाचाराची सखोल माहिती असून यामुळेच माझ्या लोकसभेत बोलण्याची पंतप्रधानांनी धास्ती घेतली आहे, माझ्या बोलण्यामुळे त्यांचा फुगा फुटणार आहे, यामुळेच ते मला बोलू देत नाहीत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

सर्व विरोधकांना याविषयावर चर्चा करायची असून लोकसभा अध्यक्षांशी आपली याबाबत चर्चा झाली आहे, मात्र सरकारला यावर चर्चा नको आहे. पंतप्रधानांनी बाहेर बोलू नये, सभागृहात येऊन बोलावे, चर्चा करावी आणि कोण खरे? कोण खोटे? हे जनतेलाच ठरवू द्यावे, असे आव्हानही राहुल यांनी दिले.

भाजपाने आरोप फेटाळले

दरम्यान, भाजपाने राहुल गांधींचे हे सर्व आरोप फेटाळले असून त्यांच्याकडे अशी माहिती असेल तर त्यांनी आतापर्यंत सांगायला हवी होती, हे बिनबुडाचे आरोप असून नैराश्यातून राहुल गांधी असे बोलत असल्याचे भाजपा नेते आणि संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी म्हटले आहे.

काँग्रेसचे खासदार दररोज वेलमध्ये येतात, त्यामुळे बोलू दिले जात नसल्याचे म्हणणेही चुकीचे असल्याचे कुमार म्हणाले. भाजपाचे मंत्री प्रकाश जावडेकर आणि किरेन रिजीजू यांनीही हे आरोप तथ्यहीन असल्याचे म्हटले आहे.

देशभर धाडी: ५ कोटी ६७ लाख जप्त

एकिकडे नोटाबंदीवरुन संसदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी सुरू असताना दुसरीकडे देशाच्या अनेक भागात बुधवारी अवैधरित्या साठवण्यात आलेल्या जुन्या आणि नवीन नोटा पकडण्यात आल्या. चंदीगढ, कर्नाटक, गोवा, नवी दिल्ली, गुजरात येथे बुधवारी मोठय़ा कारवाया करण्यात आल्या.

यात सुमारे ९ कोटी ४५ लाख रुपये जप्त करण्यात आले असून अंमलबजावणी संचलनालय (ईडी), प्राप्तीकर विभाग, स्थानिक पोलीस यांनी या कारवाया केल्या आहेत. याप्रकरणी एकूण १६ जणांना अटक करण्यात आली असून या सर्वाची सध्या कसून चौकशी सुरू आहे. या नोटा कुठून आणल्या? आणि यात बँकेच्या अधिका-यांचा हात आहे का? या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे.

नोटाबंदी ही राष्ट्रीय आपत्ती

मोदींनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशात राष्ट्रीय आपत्ती येणार असून याबद्दल जनता मोदींना कधीही माफ करणार नाही, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी संरक्षण मंत्री ए. के. अँटनी यांनी बुधवारी दिल्लीत केली. सहकारी बँकांवर लादलेल्या नोटाबंदीच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर निदर्शने करण्यात आली.

यावेळी कार्यकर्त्यांना संबोधतांना अँटनींनी ही टीका केली. मोदींच्या या निर्णयामुळे काळा पैसावाल्यांना पैसा पांढरा करण्याची संधी मिळणार असून देश राष्ट्रीय संकटात ढकलला जात असल्याचे ते म्हणाले. केंद्र सरकार राज्यांतील सहकार आणि कृषी क्षेत्राचा गळा घोटत असल्याचेही ते म्हणाले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version