Home महामुंबई विजेच्या झटक्याने अग्निशमन दलाचे तीन जवान जखमी

विजेच्या झटक्याने अग्निशमन दलाचे तीन जवान जखमी

0

महालक्ष्मी रेसकोर्स येथील रेल्वे हद्दीतील तारेवर अडकलेल्या पक्ष्याला वाचवण्यासाठी गेलेले मुंबई अग्निशमन दलाचे तीन जवान गंभीर जखमी झाले. 

मुंबई- महालक्ष्मी रेसकोर्स येथील रेल्वे हद्दीतील तारेवर अडकलेल्या पक्ष्याला वाचवण्यासाठी गेलेले मुंबई अग्निशमन दलाचे तीन जवान गंभीर जखमी झाले.

रेल्वेच्या हायव्होल्टेज केबलच्या संपर्कात आल्यामुळे ते जखमी झाले असून त्यांना मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे तिघे ३० ते ७० टक्के भाजल्याचे रुग्णालयाच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

महालक्ष्मी रेसकोर्सवरील गेट क्रमांक ६ येथील आंबेडकर नगरजवळ एका तारेवर पक्षी अडकला असल्याची तक्रार अग्निशमन दलाला शनिवारी पावणेनऊच्या सुमारास प्राप्त झाली. त्यानंतर अडकलेल्या पक्ष्याला वाचवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले.

या पक्ष्याला वाचवण्यासाठी रेल्वेच्या हद्दीतून प्रवेश करत शिडीच्या माध्यमातून वर चढून त्याला काढण्याचा प्रयत्न केला जात होता. या पक्ष्याला काढत असतानाच हे जवान रेल्वेच्या उच्चदाबाच्या केबलच्या संपर्कात आले. त्यामुळे जोरदार विजेचा झटका लागला. यात ते गंभीर जखमी झाले. संजय काळभेरे, दिनेश सबणकर आणि राजेंद्र भोजणे अशी या जवानांची नावे आहेत. हे सर्व जवान भायखळा अगिशमन केंद्राचे जवान आहेत.

या जखमी जवानांना त्वरित मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर या सर्वाना बर्न रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, ज्या पक्ष्याला वाचवण्यासाठी हे जवान गेले होते, तो पक्षी कावळा होता, घार होती की घुबड होते, याबाबत कुठेही स्पष्टता नाही.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version