Home क्रीडा अश्विनसमोर वेस्ट इंडिज हतबल

अश्विनसमोर वेस्ट इंडिज हतबल

0

भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनच्या फिरकीचा चांगलाच धसका वेस्ट इंडिजने घेतलेला दिसतो. 

जमैका- भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनच्या फिरकीचा चांगलाच धसका वेस्ट इंडिजने घेतलेला दिसतो. किंग्स्टनमध्ये सुरू असलेल्या दुस-या कसोटीत अश्विनच्या (५२ धावांत ५ विकेट) प्रभावी गोलंदाजीसमोर वेस्ट इंडिजचा पहिला डाव १९६ धावांत आटोपला. पहिल्या दिवसअखेर शनिवारी डावखुरा सलामीवीर शिखर धवनच्या बदल्यात भारताने १२६ धावा करताना मोठी आघाडीची पायाभरणी केली.

शिखर धवन आणि लोकेश राहुलने ८७ धावांची सलामी देत भारताला चांगली सुरुवात करून दिली. मात्र रॉबिन चेसने धवनला (२७) बाद करत सलामी फोडली. मुरली विजयच्या जागी संधी मिळालेल्या राहुलने (खेळत आहे ७५) संधीचा फायदा उठवला. त्याने एक बाजू लावून धरताना पहिले अर्धशतक लगावले. राहुलने ‘वनडाउन’ चेतेश्वर पुजारासह (खेळत आहे १८) दुस-या विकेटसाठी ३९ धावांची नाबाद भागीदारी करताना भारताला आणखी सुस्थितीत आणले.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय यजमानांवरच उलटला. भारताच्या इशांत शर्मा आणि मोहम्मद शामी या मध्यमगती दुकलीने यजमानांना लागोपाठ धक्के दिले. अनुभवी इशांतने डावातील तिसर्या आणि वैयक्तिक दुस-याषटकात सलामीवीर क्रेग ब्राथवेट (१) आणि डॅरेन ब्राव्होला (२) लागोपाठच्या चेंडूंवर बाद केले. मार्लन सॅम्युअल्सने त्याची हॅट्ट्रिक रोखली.

दुसरा सलामीवीर राजेंद्र चंद्रिकाला (५) शामीने माघारी धाडले. ३ बाद ७ धावा अशी बिकट अवस्थेतून जरमाईन ब्लॅकवुड (६२ चेंडूंत ६२ धावा) आणि मार्लन सॅम्युअल्सने (३७ धावा) विंडिजला सावरले. या जोडीने चौथ्या विकेटसाठी ८१ धावा जोडल्या. ब्लॅकवुडच्या झटपट सातव्या अर्धशतकामध्ये ७ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश आहे. सॅम्युअल्सनेही फटकेबाजी करताना ५ चौकार आणि २ षटकार लगावले.

ब्लॅकवुडला पायचीत पकडत अश्विनने सलामी फोडली. त्यानंतर सॅम्युअल्सचाही अडसर दूर केला. स्थिरावलेले दोन्ही फलंदाज बाद झाल्यानंतर पुन्हा वेस्ट इंडिजचा डाव कोसळला. अश्विनने पहिल्या कसोटीतील दुस-या डावात ७ विकेट घेतल्या होत्या. सलग डावात त्याने पाच किंवा त्याहून अधिक विकेट घेतल्यात. अश्विनला इशांत शर्मा आणि मोहम्मद शामीची (प्रत्येकी २ विकेट) चांगली साथ लाभली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version