Home महामुंबई ठाणे पॅनोरमा इमारतीचा स्लॅब कोसळला

पॅनोरमा इमारतीचा स्लॅब कोसळला

0

उल्हासनगर येथील कॅम्प ५मध्ये असणा-या पॅनोरमा अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्याचा स्लॅब तिस-या मजल्यावर कोसळल्याची घटना बुधवारी रात्री घडली.

उल्हासनगर- उल्हासनगर येथील कॅम्प ५मध्ये असणा-या पॅनोरमा अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्याचा स्लॅब तिस-या मजल्यावर कोसळल्याची घटना बुधवारी रात्री घडली. ही इमारत महापालिकेने पूर्ण खाली करीत सील केली आहे.

भाटिया चौक परिसरात प्रभात गार्डनमागे २४ वर्ष जुनी ५ मजली पॅनोरमा अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटमध्ये एकूण १५ कुटूंबे राहातात. बुधवारी रात्री १० वाजता चौथ्या माळ्यावरील ४०१ या सदनिकेचा स्लॅब तिस-या मजल्यावरील ३०१ या सदनिकेवर कोसळला.

सुदैवाने त्या दोन्ही सदनिकेतील कुटूंब बाहेर गेल्यामुळे ते बचावले. या कोसळलेल्या स्लॅबचा प्रचंड आवाज आल्याने इमारतीमधील रहिवाशांना लिफ्ट कोसळली असावी असे वाटल्याने त्यांनी पाहण्यासाठी घराबाहेर धाव घेतली. पण रूमचा स्लॅब कोसळल्याचे त्यांना समजताच त्यांनी त्वरीत या घटनेची माहिती अग्निशमन दल व हिललाईन पोलिसांना दिली. रात्रीच सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून या इमारतीमधील नागरीकांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले होते.

गुरूवारी सकाळी महापालिका आयुक्त सुधाकर शिंदे, सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांच्यासह हिललाईन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन वाघमारे यांनी इमारतीची पाहणी केली. पालिका आयुक्तांनी अधिका-यांना इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याचे आदेश देत इमारत सील केली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version