Home देश विद्यापीठात अशांततेच्या नव्या संस्कृतीचा प्रसार नको

विद्यापीठात अशांततेच्या नव्या संस्कृतीचा प्रसार नको

0

भारतात असहिष्णुतेला अजिबात जागा नाही. मुक्त वातावरणात चर्चा आणि वादविवाद करण्याचे सर्वाना स्वातंत्र्य आहे. 

कोची- भारतात असहिष्णुतेला अजिबात जागा नाही. मुक्त वातावरणात चर्चा आणि वादविवाद करण्याचे सर्वाना स्वातंत्र्य आहे. विद्यापीठांनी अशांततेच्या नव्या संस्कृतीचा प्रसार न करता कायदेशीर वादविवाद करावेत, स्त्रियांना सन्मानपूर्वक वागणूक मिळावी, असे मत भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केले.

दिल्ली विद्यापीठातील हिंसाचार आणि शहीद जवानाची कन्या गुरमेहर कौर हिच्या पोस्टनंतर निर्माण झालेल्या वादानंतर राष्ट्रपती याबाबत प्रथमच बोलले.  कोची येथे के. एस. राजमणी स्मृती व्याख्यानमालेत राष्ट्रपती बोलत होते.

मुखर्जी म्हणाले, ज्या समाजात स्त्रियांना असंस्कृतपणे वागवले जाते, तो समाज सुसंस्कृत असू शकत नाही. जेव्हा स्त्रीला ठेच पोहोचवतो तेव्हा त्याची जखम संस्कृतीच्या आत्म्याला होत असते. स्त्री स्वातंत्र्य ही फक्त आपल्या राज्यघटनेची देणगी नाही, तर ती आपली संस्कृती आहे. जी आपण आजपर्यंत जगत आलो आहे.

आपल्या महिला आणि बालकांचे संरक्षण हे देशाचे प्राथमिक कर्तव्य आहे. एखाद्या समाजाचे परिक्षण हे त्यातील महिला आणि बालकांच्या स्थितीवरून होत असते. भारताने या परीक्षेत अनुत्तीर्ण होऊ नये असे मला वाटते.

राष्ट्रपती म्हणाले, प्राचीन काळात भारत एक मुक्त विचार आणि अभिव्यक्तीचा जागतिक आदर्श होता. मुक्त आणि रास्त वादविवाद हे आपल्या समाजाचे मूलभूत वैशिष्टय़ राहिले आहे. राज्यघटनेने तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा मूलभूत हक्कच आपल्या नागरिकांना दिला आहे. नालंदा आणि तक्षशिला या विद्यापीठांच्या माध्यमातून भारत एकेकाळी शिक्षण क्षेत्राचे जागतिक नेतृत्व करत होता. ही दोन ठिकाणे भारताच्या मुक्त कल्पना आणि विचाराची प्रतीकेच होती.

आपल्या उच्चशिक्षण संस्था भारताला एक ज्ञान समाज बनवण्यासाठी प्रयत्न करत आलेल्या आहेत.ही ज्ञानाची मंदिरे नवनिर्मिती आणि मुक्त विचारांची असायला हवीत. आपल्या विद्यापीठात चर्चा आणि वादविवाद घडायला हवा. त्याऐवजी आपली विद्यापीठे हिंसा आणि अशांततेत गुरफटलेली पाहायला लागणे ही एक शोकांतिका आहे.

एका शहिदाची मुलगी असणारी गुरमेहर कौर ही दिल्लीतील महाविद्यालयीन विद्यार्थिनी आहे. सोशल मीडियावर तिने अभाविपला विरोध करणारी आणि भारत-पाकिस्तान दरम्यान शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी एक मोहीम राबवली होती. त्यानंतर तिने आपल्याला अभाविपच्या कार्यकर्त्यांकडून बलात्काराची धमकी आल्याची तक्रार पोलिसात दाखल केली होती. या सर्व प्रकारानंतर त्याचे राजकारण सुरू झाले.

खेळाडूंपासून कलाकारांपर्यंत सर्वांनी याविषयी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. त्यानंतर तिच्या समर्थनार्थ दिल्लीत डाव्या चळवळीतील विद्यार्थ्यांंनी मोर्चाही काढला. मात्र ती स्वत: या मोर्चात सहभागी झाली नाही. या सर्व प्रकरणानंतर विद्यापीठ कॅम्पस हा चर्चेचा विषय झाला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version