Home कोलाज भाजपचा दक्षिण प्रवेश कठीणच!

भाजपचा दक्षिण प्रवेश कठीणच!

0

कर्नाटक विधानसभेत सत्ता मिळवून दक्षिणेचा मार्ग मोकळा करण्याचा भाजपचा डाव फिस्कटल्यानंतर तीन महिन्यांत पाठोपाठ अशा काही घटना घडू लागल्या आहेत की, भारतीय जनता पक्षाला दक्षिण प्रवेश मिळणे कठीण आहे, असे चित्र आहे. शत-प्रतिशत भाजप म्हणत उत्तरेपासून एकेक शिखरे पादाक्रांत केली तरी भाजपला दक्षिणेच्या प्रवेशाची किल्ली अजून सापडलेली नाही. एका चावीतून अनेक कुलपे उघडता येतील असे काही चमत्कार करण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे, पण कर्नाटकपाठोपाठ आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांतून भाजपला शिरकाव करणे कठीण असल्याचे चित्र आहे.

दक्षिणेचे प्रवेशद्वार अशी कर्नाटकची ओळख आहे. त्यामुळे तीन महिन्यांपूर्वी झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपने संपूर्ण शक्ती पणाला लावली होती. मोठे संख्याबळ असल्यामुळे सत्ता स्थापनेचा दावाही भाजपने केला. पण बहुमत सिद्ध करता येत नसल्यामुळे पुन्हा एकदा सत्तेपासून दूर राहावे लागले. तरीही थोडय़ा सहानुभूतीसह सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप सर्वाधिक जागा कर्नाटकातून मिळवेल, अशी अपेक्षा करता येईल. पण यापुढे त्यांची दक्षिण यात्रा कुठेही यशस्वी होण्याची शक्यता आजमितीस नाही.

आंध्र प्रदेशातून चंद्राबाबूंशी असलेल्या युतीचे वाटोळे झाल्यानंतर भाजपला तिथे नवा मित्र पक्ष जोडावा लागेल. तो मिळणे अर्थातच अशक्य आहे. काँग्रेस चंद्राबाबूंशी हातमिळवणी करून भाजपला शिरकाव करता येणार नाही याची पूर्णपणे खबरदारी घेणार याबाबत कोणतीही शंका नाही. चंद्राबाबूंनी काँग्रेसला हात दिला नाही तरी काँग्रेसला इथे मैदानात उतरावे लागेल. त्यामुळे तेलुगू देसमच्या विरोधी मतांचे विभाजन लीलया होऊन चंद्राबाबूंचा फायदा होईल, अशीच परिस्थिती आहे.

तेलंगणामध्येही तेलंगणा राष्ट्र समितीचे नेते आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा काहीच भरवसा नाही. त्यांची नेहमीच तळ्यात मळ्यात अशी अवस्था असते. ते नेमके कोणाबरोबर जातील याची शाश्वती नाही. पण कोणाबरोबरही गेले तरी जागावाटपात तडजोड न करता आपली नवीन प्रादेशिक अस्मिता जपत सर्व जागा आपल्याकडे राखण्याचा ते प्रयत्न करणार. तसा कर्नाटक निवडणुकीत त्यांनी भाजपला साथ देण्याचा पुसटसा प्रयत्न केला, पण त्याचा काहीच फायदा झाला नव्हता. त्यामुळे ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वाने के. चंद्रशेखर राव भाजपला मदत करतील. अर्थात भाजपला त्याचा लाभ होणार नाही.

दक्षिणेतील राज्य म्हटले की, त्यामध्ये दादागिरी असते ती तामिळनाडूची. गेल्या पन्नास वर्षात इथल्या स्थानिक राष्ट्रीय पक्षांनी काँग्रेस आणि भाजप किंवा पूर्वीचा जनसंघ या कोणालाही इथे वासही घेऊ दिला नाही. द्रमुक, अद्रमुक या पक्षांभोवतीच इथले राजकारण आणि सत्ताकारण फिरत राहिले. इथल्या राजकारणावर परिणाम करणारा घटक असतो तो म्हणजे तमिळी चित्रपटसृष्टीचा. चित्रपटाशी संबंधितच लोक इथे नेते होतात. अभिनेते नेते होण्याची परंपरा इथली आहे. त्यामुळे एम. जी. रामचंद्रनपासून सुरू असलेली परंपरा गेल्या तीन दशकांत जे जयललिता आणि करुणानिधी यांच्याभोवती फिरत राहिली. इथे बाकीचे पक्ष चटणी कोशिंबिरीसारखेही दिसत नाहीत, तर केळीच्या पानावर द्रमुक आणि अद्रमुक सार भाताप्रमाणे अलग थांबतात आणि वेळ आली की एकत्र येत बाहेरच्या पायसमला रस्ता दाखवतात. परंतु २०१७ आणि २०१८ या दोन वर्षात तामिळनाडूला जोरदार धक्के बसले. २०१७ मध्ये जयललिता यांचे दीर्घ आजाराने निधन झाले, तर याच वर्षी ऑगस्ट महिन्यात करुणानिधी यांचेही निधन झाले. तामिळनाडूच्या राजकारणातील महत्त्वाचे गड कोसळल्यामुळे आता हा नवा गड कोण सर करणार याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.

परिस्थितीचा फायदा उठवण्यासाठी अनेकजण तयार असतात. तमिळी राजकारणावर चित्रपटसृष्टीचा प्रभाव आहे हे लक्षात आल्यावर जयललिता यांची जागा भरून काढण्यासाठी तमिळ चित्रपटातील दोन दिग्गज उतरले. गेली अनेक वर्षे लांबून लांबून असलेल्या रजनीकांत यांनी थेट राजकारणात उडी घेतली आणि स्वत:चा पक्ष स्थापन केला. जयललितांनंतर तामिळनाडूच्या राजकारणाचा अविभाज्य भाग आपण असू असा त्यांनी देखावाही निर्माण केला. प्रसारमाध्यमांनी रजनीकांतची पसंती, त्याच्यावर होणारे विनोद आणि कोणतीच गोष्ट रजनीकांतला अशक्य नसल्याचे इतके बिंबवले की रजनी आता तामिळनाडूचा मुख्यमंत्री होणार अशा बातम्याही येऊ लागल्या. रजनीकांतच्या देशभरातील बिगर तमिळी चाहत्यांनी त्याची चांगलीच दखल घेतली आणि आपापल्या व्हॉटसअ‍ॅपवरून त्याचे मेसेजही फिरू लागले. फक्त हे मेसेज तामिळनाडूत कुठेच फिरत नव्हते आणि त्याची कोणी दखल घेत नव्हते. मीडिया आणि सोशल मीडियावर रजनीकांतला तामिळनाडूच्या भावी राजकीय पटलावरचा नायक केला असला तरी प्रत्यक्ष परिस्थिती काही वेगळीच होती. या सगळ्यात भारतीय जनता पक्षाचा शिरकाव कसा करायचा याचीच विवंचना मोदी-शाह या जोडगोळीला लागून राहिली होती. त्यामुळे रजनीकांतशी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न भाजपने केलाच. रजनीकांतने आपल्या स्टाईलने हे कमळ हवेत उडवले. रजनीकांत ओठावर सिगारेट ठेवण्यापूर्वी ती हवेत उडवतो तसेच. ते अजून हवेतच आहे.

हे कमळ रजनीच्या स्टाईलिश हातात येण्यापूर्वीच दक्षिणेतील आणखी एक सुपरस्टार कमल हसन राजकारणात उतरला. आपला नवा पक्ष स्थापन करण्यापूर्वीच कमल हसनने गाजावाजा भरपूर केला होता. त्यामुळे त्याच्या मुखातून कधी डावा विचार, तर कधी भगवा विचार बाहेर पडत होता. अशी लेफ्ट-राईट करत त्याने अखेर आपण राजकारणात उतरल्याचे चार महिन्यांपूर्वी जाहीर केले. कोणत्या राष्ट्रीय पक्षाबरोबर जाण्याचा विचारही न करता रजनीकांत पुढे आव्हान निर्माण करण्याची हवा त्याने केली. त्यामुळे भाजप आता नेमक्या कोणाला जवळ करणार रजनीकांत की कमल हसन अशा चर्चाना ऊत होता. अर्थात या चर्चाही भाजप समर्थकांकडून केल्या गेल्या असण्याची शक्यता आहे. कारण दोघांनीही भगव्या राजकारणापासून दूर राहणार असे वेगवेगळ्या शब्दांत सांगितले होते. पण दोघांनी कधी एकत्र येण्याची तर कधी परस्पर लढण्याची भाषाही केली. रजनी आणि कमल हे दोघेही चर्चेत राहिले, त्यामुळे जयललिता, त्यांच्या वारसदार मंडळींचा सर्वाना विसर पडला.

द्रमुक नेते करुणानिधी यांचे ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात निधन झाले. त्यामुळे आता तमिळी राजकारणात आपल्याला सहजपणे शिरकाव करता येईल याचा विश्वास भारतीय जनता पक्षाला पटला. त्यामुळेच १५ ऑगस्टच्या लाल किल्ल्यावरील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चक्क तमिळी कविता म्हटली. तमिळी बांधवांना खूश करण्याचा त्यांनी चांगला प्रयत्न केला. पण तरीही दक्षिणेचे दार हे ताकद लावूनही भाजपसाठी सरकेल अशी चिन्हे नाहीत.

आज तिथली नेमकी काय परिस्थिती आहे आता पाहू. सगळ्यांनी रजनीकांतला डोक्यावर घेतला पण तामिळनाडूतील जनतेने बिलकूल नाही घेतला. तामिळनाडूच्या बाहेर रजनीच्या लोकप्रियतेचा डंका वाजला, पण तेवढा तामिळनाडूत नाही. अभिनेता म्हणून त्याला पहिली पसंती आहे, पण नेता म्हणून पसंती नाही. काय असावे याचे कारण? तर रजनीकांत हा मूळचा तमिळी नाही. तो महाराष्ट्रीय आहे. इथे तमिळी अस्मिता जागृत झालेली आहे आणि रजनीकांतला सत्तेपासून लांब ठेवण्याचा विचार करताना त्याला बाहेरचा ठरवला आहे. त्याचे मूळचे नाव शिवाजीराव रामोजीराव गायकवाड असे आहे. अशा मराठी माणसाला नाकारण्यासाठी तमिळींची लुंगी वर झालेली आहे. त्यामुळे रजनीकांतशी जवळीक करण्यासाठी आतूर झालेल्या भाजपला चांगलाच झटका बसला आहे. अचानक रजनीकांतपेक्षा कमल हसनचे पारडे जड झाले ते केवळ मूळचा तमिळी असल्यामुळे. असा विचार मराठी माणसाने केला असता, तर मुंबईत इतर भाषिक खासदार, आमदार यांची घुसखोरी झाली नसती. पण अशा परिस्थितीत भाजप दक्षिणेत पाय रोवण्यासाठी टेकू पाहते आहे, पण टाकेल तिथे पाय चिखलातच घुसतो आहे. अर्थात या चिखलातून कमळ येईलच अशी आशा नाहीच. पण सर्वात मोठी खदखद तमिळी माणसामध्ये आहे, ती मोठमोठय़ा हुद्यांवर पंतप्रधान मोदींनी गुजराती माणसांची नेमणूक केलेली आहे. एकेकाळी रिजव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरपासून अन्य मोठय़ा पदांवर असणारी दाक्षिणात्य माणसे आता दिसत नाहीत. किमान राष्ट्रपतीपदासाठी एखादे नाव येईल, असे वाटत होते. पण तिथेही निराशा झाल्यामुळे या लुंगीवाल्यांचा थयथयाट झाला. त्यांनी लुंगीडान्स सुरू केला आणि भाजप इल्ला इल्ला करत डोळे मिचकावत दुस-या हाताने शिंतोडे उडवल्यासारखी बोटे झटकायला त्यांनी सुरुवात केली. त्यामुळे भाजपला तामिळनाडूचे दार बंद झाल्याचे आज तरी चित्र आहे. केरळमध्ये भाजपला संधी नव्हतीच. तिथे काँग्रेसला एकवेळ संधी मिळू शकते, पण यूडीएफ, एलडीएफ या लाल बावटय़ांना आपल्या मैदानात कमळ फुलायला नको आहे. केरळमध्ये गेल्या पंधरा दिवसांत इतका महापूर आणि पाऊस आला की सगळीकडे चिखल चिखल झाला. हजारो कोटींचे नुकसान झाले. पण त्यांनी चिखल काढायला प्राधान्य दिले, कारण चुकून या चिखलात कमळ उगवले तर?

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version