Home टॉप स्टोरी मनसेचा मोर्चा धडकणारच!

मनसेचा मोर्चा धडकणारच!

0

पोलिसांची परवानगी नसतानाही मोर्चा काढण्यावर मनसे ठाम असून हा मोर्चा मेट्रो जंक्शन ते चर्चगेट स्थानक मुख्यालयापर्यंत काढण्यात येणार आहे.

मुंबई- पश्चिम रेल्वेवरील एल्फिन्स्टन रोड पुलावरील दुर्घटनेनंतर मनसेने आज, गुरुवारी राज्य सरकारविरोधात ‘संताप मोर्चा’चे आयोजन केले आहे. सकाळी ११.३० वाजल्यापासून हा मोर्चा मेट्रो जंक्शन ते चर्चगेट स्थानक मुख्यालयापर्यंत काढण्यात येणार आहे. रेल्वे प्रवाशांना न मिळणा-या सोयीसुविधांप्रमाणेच बुलेट ट्रेनविरोधात हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

एल्फिन्स्टन दुर्घटनेतील चेंगराचेंगरीनंतर मुंबईतील लोकल वाहतूक सुधारावी, हा या मोर्चाचा मुख्य उद्देश आहे. या मोर्चात सहभागी होण्यासाठी मनसेने सोशल मीडियावरही आवाहन केले आहे.

मात्र, अद्याप मनसेच्या या मोर्चाला पोलिसांची परवानगी मिळालेली नाही. दरम्यान, परवानगी नसतानाही मोर्चा काढण्यावर मनसे ठाम आहे. पोलिसांनी कागदोपत्री परवानगी दिली नसली तरी परवानगी नाकारलेलीही नाही.

मनसेच्या मोर्चाला परवानगी न मिळण्यामागे उच्च न्यायालयाच्या आदेशाची पार्श्वभूमी आहे. मुंबईत मोर्चासाठी आझाद मैदान ही जागा ठरवण्यात आलेली आहे. मनसे ज्या भागात मोर्चा काढणार आहे, तो परिसर अत्यंत वर्दळीचा आहे. चर्चगेट परिसरात मंत्रालय आणि इतर मोठी कार्यालये आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि इतर समस्यांमुळे मुंबईत मोर्चासाठी परवानगी दिली जात नाही.

दरम्यान, या मोर्चाला अनेक मराठी सेलिब्रिटींनीही पाठिंबा दिला आहे. राज ठाकरे यांनी पुकारलेले आंदोलन यशस्वी करण्यासाठी मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे लोकलमध्ये चढून बुधवारी मोर्चाबाबत जनजागृती करताना दिसले. खुद्द राज ठाकरे यांनीही बुधवारी फेसबुकवर पोस्ट टाकत हा मोर्चा केवळ मनसेचा नसून, सर्वसामान्यांच्या लढ्यासाठी असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे मनसेच्या या मोर्चाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ब्रिटीशही मोर्चांना परवानगी देत होते, मात्र हे सरकार परवानगी देत नाही, आमची तयारी पूर्ण; मोर्चा निघणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ– संदीप देशपांडे

[EPSB]

बेकायदेशीर मोर्चा काढल्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अटक करावी की स्थितीचे गांभीर्य राखून अटकेऐवजी राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याची कारवाई करावी, या संभ्रमात मुंबई पोलीस आहेत.

[/EPSB]

असा असेल मनसेचा मोर्चा…

» सकाळी ११.३० वाजता मेट्रो सिनेमागृह चौकात राज ठाकरे होणार दाखल
» राज ठाकरे आल्यानंतर मोर्चाला होणार सुरुवात
» महर्षी कर्वे रोड मार्गे मोर्चा होणार रवाना
» चर्चगेटच्या पश्चिम रेल्वे मुख्यालयजवळ मोर्चा येईल
» राज ठाकरे आणि विविध रेल्वे प्रवासी संघटनांच्या पदाधिका-यांचे शिष्टमंडळ पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयात जातील
» मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची घेणार भेट
» चर्चेनंतर राज ठाकरे मोर्चेकरांना संबोधित करतील

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version