Home क्रीडा गतविजेता जोकोविचचे ‘पॅकअप’

गतविजेता जोकोविचचे ‘पॅकअप’

0

ऑस्ट्रेलियन ओपनच्या यंदाच्या आवृत्तीत गुरुवारी धक्कादायक विजयाची नोंद झाली. गतविजेता सर्बियाचा नोवाक जोकोविचचे दुस-या फेरीतच ‘पॅकअप’ झाले.

मेलबर्न- ऑस्ट्रेलियन ओपनच्या यंदाच्या आवृत्तीत गुरुवारी धक्कादायक विजयाची नोंद झाली. गतविजेता सर्बियाचा नोवाक जोकोविचचे दुस-या फेरीतच ‘पॅकअप’ झाले. त्याला बिनसीडेड उझबेकिस्तानच्या डेनिस इस्टोमिनकडून चुरशीच्या लढतीत ६-८(१०), ७-५, ६-२, ६-७(७), ४-६ असा पराभवाचा धक्का बसला.

पुरुष एकेरीच्या दुस-या फेरीत ११७व्या स्थानी असलेल्या इस्टोमिनविरुद्ध दुसरा सीडेड जोकोविच सहज जिंकेल, असे वाटत होते. मात्र इस्टोमिनने अप्रतिम खेळ करत अविस्मरणीय विजयाची नोंद केली. पावणेपाच चाललेल्या मॅरॅथॉन लढतीत पहिला तसेच चौथा आणि पाचवा सेट जिंकत इस्टोमिनने बाजी मारली. पाचपैकी दोन सेट ‘टायब्रेकर’वर गेले. त्यात जोकोविचला हरवण्यात इस्टोमिनला यश आले.

जोकोविचला ग्रँडस्लॅम स्पर्धेत गेल्या नऊ वर्षात प्रथमच दुस-या फेरीत बाहेरचा रस्ता पकडावा लागला. २००८ विम्बल्डनमध्ये त्याला मॅरॅट सॅफिनने हरवले होते. शंभरहून अधिक रँकिंग असलेल्या टेनिसपटूकडून जोकोविच हरण्याची गेल्या सात वर्षातील ही दुसरी वेळ आहे.

गेल्या वर्षी झालेल्या रिओ ऑलिंपिकमध्ये जोकोविचला १४५व्या स्थानी असलेल्या अर्जेटिनाच्या हुआन मार्टिन डेल पोट्रोकडून पराभवाचा धक्का बसला होता.

अन्य लढतींमध्ये तिसरा सीडेड कॅनडाचा मिलोस राओनिक, नववा सीडेड स्पेनचा राफाएल नाडाल, सहावा सीडेड फ्रान्सचा गेल मॉनफिल्स, १८वा सीडेड रिचर्ड गॅस्केट, ११वा बेल्जियमचा डॉडिन गॉफिनने दुस-या फेरीचा अडथळा पार केला.

सेरेना, वोझ्नियाकीची आगेकूच

महिला एकेरीत दुस-या सीडेड अमेरिकेच्या सेरेना विल्यम्ससह १७वी सीडेड डेन्मार्कच्या कॅरोलिन वोझ्नियाकीने आगेकूच केली. विल्यम्सने बिनसीडेड चेक रिपब्लिकची ल्युसी सॅफारोवावर ६-३, ६-४ अशी सरळ सेटमध्ये मात केली.

वोझ्नियाकीने बिनसीडेड क्रोएशियाच्या डोना वेडिकला ६-१, ६-३ असे हरवले. तिसरी सीडेड पोलंडची अग्न्स्झिका रॅडवँस्काने बिनसीडेड क्रोएशियाच्या ल्युसिक-बॅरोनीचा ६-३, ६-२ असा पराभव केला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version