Home महामुंबई निर्दोष ठरलेले तिघे नऊ वर्षानंतर दोषी!

निर्दोष ठरलेले तिघे नऊ वर्षानंतर दोषी!

0

जमिनीच्या वादातून ९४ वर्षीय वृद्धाच्या केलेल्या हत्येप्रकरणी नऊ वर्षापूर्वी सत्र न्यायालयाकडून निर्दोष ठरलेल्या तिघांना मुंबई उच्च न्यायालयाने दोषी ठरवले असल्याने त्यांना आता जन्मठेपेची शिक्षा भोगावी लागणार आहे.

मुंबई- जमिनीच्या वादातून ९४ वर्षीय वृद्धाच्या केलेल्या हत्येप्रकरणी नऊ   वर्षापूर्वी सत्र न्यायालयाकडून निर्दोष ठरलेल्या तिघांना मुंबई उच्च न्यायालयाने दोषी ठरवले असल्याने त्यांना आता जन्मठेपेची शिक्षा भोगावी लागणार आहे. राज्य सरकारने केलेल्या अपिलावर न्या. ए. ए. सय्यद व न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने नुकताच हा निर्णय दिला.

कोल्हापूरातील गडहिंग्लजमधील कलिंगा लोहार यांच्या जमिनीवर काहींनी अतिक्रमण केले होते. त्यामुळे त्यांनी याप्रकरणी न्यायालयीन लढा दिला. १९६३ सालापासून त्यांचा न्यायालयीन लढा सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला आणि अखेर ३ फेब्रुवारी २००६ रोजी त्यांना न्यायालयाकडूनच जमिनीचा ताबा मिळाला. मात्र, त्यांच्या जमिनीवर २२ जणांनी अतिक्रमण करून घरे किंवा दुकाने थाटलेली होती. ते हटत नसल्याने अखेर कलिंगा यांनी पोलीस संरक्षण मागून अनधिकृत घरे व दुकाने तोडण्याची तयारी केली. मात्र, रवींद्र इंगळे, सतीश लोहार, समीर जमादार, रियाझ काझी यांच्यासह अनेकांनी घरे, दुकाने खाली करण्यासाठी एक दिवसाची मुदत देण्याची विनंती केली. त्याप्रमाणे कलिंगा यांनी मुदत दिली.

कलिंगा हे नेहमीप्रमाणे घराजवळच्या मंदिरात पूजा करण्यासाठी गेलेले असताना या चौघा आरोपींनी त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यात ते मरण पावले. सतीश, समीर व रियाझ यांनी कलिंगा यांना धरून ठेवले आणि रवींद्रने त्यांच्यावर कोयत्याने वार केले, अशी साक्ष प्रत्यक्षदर्शी असलेला कलिंगा यांचा नातू, सुशीलने दिली होती. तशीच साक्ष कलिंगा यांच्या अन्य नातेवाइकाने दिली होती. याचा सारासार विचार करून न्यायालयाने हा निकाल दिला.

[EPSB]

नवी मुंबईला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली

नवी मुंबईला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी शनिवारी सकाळी फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया गेले.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version